असंख्य वेदनांचा त्रास मी पहाता पहाता विसरुन गेले जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बाळा तुला पाहिलं. तुझे भिरभिरणारे डोळे फक्त मला पहात होते आणि मीही फक्त तुला पाहत होते. ती तुझी आणि माझी पहिली भेट. त्या पहिल्याच भेटीतले तुझे ते मला आपलेसे करने आणि आई म्हणून मी तुला मिठी मारने खरंच खुप मनाला आनंद देऊन गेले. पण बाळा आईपण इथेच संपले नाही त्याची तर ती सुरुवात होती.
तु लहान होतास माझ्या हातात आनंदाने रहात होतास. माझ्याकडे पाहुन तुझ्या कुतुहल मनाला एक शांतता होती. माझी आई आहे जवळ तेव्हा तुला या जगाची भिती नव्हती. हळूहळू तु रांगत चालायला लागलास या आईच्या जवळ येण्यासाठी धडपड करायला लागलास. मलाही तुझ्या कित्येक आठवणींच गाठोडं भरायचं होतं आणि ही तर खरी सुरुवात होती. मला आठवतं तु पहिला शब्द ‘आई’ म्हणाला होतास. तेव्हा माझ्या मनाला काय आनंद झाला होता, ते कसं मी सांगु!. तुझ्या खोड्या वाढतं होत्या सोबत तु आता घरभर पळायला लागला होतास. एक आई म्हणुन माझ्या डोळ्यात हे सगळं मी साठवुन घेतं होते.
पुढे तु शाळेत जायला लागलास तेव्हा बाळा मी तुझा एक फोटो काढुन ठेवला होता. तो आजही माझ्या खोलीत आहे. कारण ते तुझ या जगास पहाण्याच पहिलं पाऊल होतं. या आईच्या पंखातुन बाहेर पडुन या जगात मुक्त फिरायच ते एक पाऊल होतं आणि तिथुनच पुढे या जगात एक माणुस म्हणुन तु कसा असावास याचे संस्कार तुझ्यावर होने गरजेचं होतं. एक आई म्हणुन मला जिजाऊ व्हायचं होतं, एक आई म्हणुन मला राधामाता व्हायचं होतं. एक आई म्हणुन मला माझं बाळ घडवायचं होतं. तुला शिवरायांचे , राम,कृष्णांचे संस्कार द्यायचे होते एका आईची ती एक परिक्षाच होती.
पण बाळा हे सगळं मला फक्त तुझ्याचसाठी करायचं होतं. पुढे तु उच्चशिक्षणात पास झालास तेव्हा तु पहिले माझ्या पायांवर मस्तक ठेवले होतेस तो तुझा स्पर्श आजही माझ्या पायास जाणवतो. एक आई म्हणून मला एक माणुस घडवायचा होता आणि तुझ्या रुपात मी तो पाहु शकत होते. आई होनं खरंच छान असतं हे तेव्हा मला जाणवलं होतं. पण बघता बघता माझं बाळ मोठं झालं होतं. त्या माझ्या बाळाच्या आयुष्यात आता एक नवीन कोणीतरी आलं होतं. त्याची काळजी करणारं त्याला आपलंस करणारं. पण या आईला त्याचा ही आनंद झाला होता कारण माझं बाळ आता मोठं झालं होतं.
या आईपणात वर्ष सरुन जातात. बघता बघता बाळ मोठे होतात. आणि या आईच म्हातारपण येतं. केस पांढरे होतात तर हात ही थकुन जातात पण थकतं नाही ते आईपपण तिच्यातील ते प्रेम. आजही ते तुझ्यासाठी तसेच आहे. एक आई म्हणुन तु आजही माझा तो लहान बाळच आहेस अस वाटतं. माझे हात थकुन गेलेत पण माझं बळ तु आहेस हे मला माहिती आहे. माझे डोळे कमजोर झालेत पण तुझ्या डोळ्यातुन हे जग मला दाखवशील हेही मला बाळा माहितेय. हे वय थकुन जातं रे!! पण आईपण नाही! ते सतत वाहत असतं नदी सारख.
कारण बाळा ,
असंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते!! कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते!! पहिला घास भरवणारी ती काळजी करणारीही ती आईच असते!! बोटं धरुन चालवणारी तिचं जगात जगायला शिकवणारी आईच असते!! आई असते या देवाचंच दुसर रुप म्हणुनच जगात प्रेमरुपी ईश्वर ती आईच असते!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*