मनाचा गोंधळ || MANACHA GONDHAL ||

Share This:

कधी शब्द सुचत नाहीत तर कधी स्वतः मनात घोळतात. याच नक्की होते तरी काय हेच कधी समजत नाही. तुम्ही तासन् तास लिहायचं म्हणून बसता आणि एक ओळही लिहून होत नाही आणि कधी कधी स्वतः शब्द मनात कोरले जातात. मला आजही कित्येक कविता लेख लिहिताना याचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही. कधी कधी तासन् तास बसून लिहिलेल्या ओळी मनास भावत नाहीत आणि कधी कधी सहज सुचलेल्या चारच ओळी मनात घर करतात. असे होत तरी काय की मनातले खेळ समजु शकत नाही. भावना मनातल्या खुप काही बोलतात. तर कधी बोलायचं म्हटल तरी शब्द सुचत नाहीत. कदाचित लिहिण्यासाठी त्या भावना भेटत नाहीत. उरतात कधी नुसते शब्द आणि कधी कधीं नुसत्या ओळी..

मनातल्या भावना आज
सहज कोऱ्या कागदावर आल्या!!
कधी नुसत्या भावना होत्या
कधी नुसत्या ओळी आल्या!!

म्हणजे नक्की म्हणायचं तरी काय मला तेच कधी कळतं नाही. आणि कधी न बोलता ही सर्व काही त्या ओळी बोलून गेल्या. माझ्या मनातल्या खुप काही गोष्टी मी अशाच व्यक्त झालो. कित्येकदा त्या मनास भिडल्या पण कित्येकदा नुसत्या ओळीच राहिल्या. मग लिहावं तरी का आणि कशासाठी हा प्रश्न मनी राहिला. मी समजलो का तुला प्रश्नही कधी मनात आला. आणि कधी न लिहिता ही सर्व काही बोलला. अस लिहिताना का होत? मी आज कित्येक वर्ष झाले ब्लॉग मार्फत किंवा कविता , लेख मार्फत लिहिण्याचा व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. पण तो कित्येक मनाला भिडला हा प्रश्न कधी स्वतःला ही मी विचारला नाही. मी फक्त लिहीत राहिलो. व्यक्त होत राहिलो. असं म्हणतात की लेखणी हे समोरच्याला व्यक्त करून सांगण्याच सर्वात सुंदर साधन आहे. पण ही लेखणीही जर व्यर्थ ठरत असेल तर लिहावं तरी का असा प्रश्नही मनात आला.

कुठे बंदिस्त कवाड या मनाचे
लेखणी तु व्यक्त केलेस!!
घुसमटलेल्या विचारांचे
किती तु शब्दांनी खेळ केलेस!!

मग कुठे अधुरे राहिले हे शब्द नी समोरचे मन कधी समजुच शकले नाही. आज मागे वळून पाहताना मला कित्येक प्रश्न हेच पडतात. मी का व्यक्त झालो आणि कोणासाठी. माझी लेखणी अधुरीच राहिली त्या मनासाठी जिथे शब्द पोहोचलेच नाहीत. कधी कधी लिहिलेलं सगळं व्यर्थ वाटतं. पण तरीही मनातले ते विचार शांत बसूच देत नाहीत आणि पुन्हा लेखणी हातात येते. होतो विचारांचा नुसता गोंधळ आणि शब्द हे आपोआप कागदावर कोरले जातात. माहीत असतं हे सगळं व्यर्थ आहे पण ते तरी लिहिले जातात कोणासाठी तर बंद झालेल्या कवाडावर जाऊन निरर्थक पडण्यासाठी. कधी कधी मला वाटतही की ते शब्दही आता माझा तिरस्कार तर करतं नसतील ना? की व्यर्थ लिहीत बसलेल्या माझ्या मनातल्या विचाराशी भांडत तर नसतील ना? की लिहितोस तू इतका की समोरच्या मनाला साधं समजूनही सांगता येत नाही. मग आरे बंद कर तो व्यर्थ प्रयत्न तुझ्या लेखणीत तेवढी धमक ही साधी नाही.

लेखणी तुझी व्यर्थ बडबडत असते
नसेल त्याला अर्थ काही!!
दे फेकून ती कागदांची आठवण
ज्यात जळेल फक्त तुझे मन!!

वाटतं तेव्हा द्यावं फेकून ते लिखाण वहीत बंदिस्त केलेलं त्या धगधगत्या आगीच्या ज्वाळांत आणि मनाला सांगावं तुलाही असाच जळाव लागेल. पण तुझ्या ज्वाला दिसतं मात्र नाहीत रे.!! घुसमट होईल तुझी पण तुझ्या कागदाची किंमत ती काय रे?? मन कोणते ते बंदिस्त कवाडात आपल्याच विश्वात रमलेले येईल का रे तुझ्या मनातल्या ज्वाला शांत करायला?? नाही ना ?? मग जळत रहा कायमच अगदी शेवटपर्यंत !! कारण तुला दुसरी चीता च नाही जळायला!

शब्दही साथ सोडतील तुझी
अशी कशी रे कवाड मनाची!!
जळून गेली मनात सारी व्यथा
अशी कोणती साथ आपल्यांची??

शेवटी एवढंच लिहावस वाटतं

किती विचार आणि किती लिहावे
व्यर्थ सारे वाहून जावे.!!
नसेल अंत या लिखाणास कुठे तर
स्वतःस का मग जाळून घ्यावे?

अखेर….!!!!!

✍योगेश खजानदार