ती शेवटची संध्याकाळ तिच्या सवेत घालवायची मला संधी मिळत होती. ती होती , मी होतो , आणि समोर खळखळ करणारा तो समुद्र. खुप काही मला बोलायचं होतं, आणि खुप काही तिला मला सांगायच होतं. शब्दांची सुरूवात कुठुन करावी तेच कळेना. इतर वेळी अविरत बोलणारी ती आज शांत होती. तुझ्या सवे सर्व आयुष्य मला जगायचंय अस म्हणारी ती आज मधुनच सगळं सोडुन चालली होती. कित्येक आठवणी माझ्या मनात कोरुन ती आज शांत होती. शेवटी मीच बोललो,
“माझी आठवण येईल ना तुला ? ” तेव्हा ती एकटक माझ्या डोळ्यात पहात होती.
डोळ्यातुन अश्रुंचा थेंब ओघळुन माझ्या ह्दयात तिचा ओलावा करत होती.
“माझं लग्न दुसर्या कोणाशी व्हावं अस मला कधीच वाटतं नव्हतं, तुझ्या आयुष्यात माझं सुख आणि दुखः होतं. पण परिस्थिती आज वेगळी आहे. मी माझ्या आई बाबांना नाही दुखावु शकत.!’ ती अगदी शांत सगळं बोलुन गेली.
सगळ्याच्या सुखासाठी तिनं आपल्या प्रेमाचा बळी द्यावा. याचंच मला राहुन राहुन आश्चर्य वाटतं होतं. आई बाबांचा एवढा विचार करणारी ती आज मला शेवटची भेटायला आली होती.
“पण, माझ्या मनाचं काय? तु माझा विचार का करत नाहीस ?” माझ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती मला हे माहित होतं.
कोणत्याच बोलण्याने माझं समाधान होणारं नाही हेही तिला माहीत होतं. पण या निर्णयाने ती कोलमडून गेली होती. माझा हात हातात घेऊन ती मला सगळ विसरुन जा म्हणतं होती. मी तिच्याकडे फक्त बघत होतो.
अखेर सुर्यास्त व्हायची वेळ जवळ आली होती. तिची नेहमीची लगबग आजही तशीच दिसत होती. घरी आई वाट बघत असेल अस म्हणुन ती निघणार होती. मी आता तिला पुन्हा कधी भेटशील अस विचारणार तेवढ्यात तीच म्हणाली,
” आता पुन्हा आपण कधीच भेटणार नाहीत, तु फक्त खुश रहा , आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर, माणसाला स्वप्न पडतात, आपल हे प्रेम स्वप्नच होतं अस समज!!! जाते मी !! काळजी घे!!!'”
ती जायला निघाली, आपल्या प्रेमाला खळखळ करणार्या समुद्राचा ऊरात बुडवून ती चालली होती. पाठमोरी तिला जाताना कित्येक वेळ मी पहात होतो. ती संध्याकाळ त्या दिवशी दोन सुर्यास्त पहात होती. एक सुर्य पुन्हा नवीन सकाळ घेऊन येणार होता, पण मनाचा सुर्यास्त कायमचाच झाला होता.
” पुन्हा नव्याने सुरूवात करायला तु हवी होतीस!” अस मला तिला सांगायचं होतं. पाठमोरी जाणार्या तिला थांब म्हणायचं होतं. पण, तिला अजुन यामुळे त्रास होणार होता…
ती भेट अखेर खुप काही हिसकावून घेऊन चालली होती .. मी मात्र .. खळखळ करणार्या लाटांचा आवाज ऐकत अगदी एकटाच बसलो होतो..
त्या लाटांच्या आवाजात तिचा आवाज शोधत….