खरंच खुप छान लिहिता तुम्ही !! एका माझ्या मित्राचा मला काही दिवसा पुर्वी फोन आला. ‘तुमच्या कवितेतुन मला माझी सखी , माझी ती मिळाली! !’ मला दोन मिनिटे काय बोलाव तेच कळेना. अखेर काही वेळ त्याच्याशी बोलनं झाल्यावर मनात एकच ओळ घोळत होती ‘तुमच्या कवितेतुन मला माझी सखी, माझी ती मिळाली!’ मनाला खुप आनंद झाला. आपल्या लिखाणातून कोणाला तरी स्वतःचा आनंद शोधता आला. त्यानंतर कित्येक वेळ मी स्वतःच्या वहीतील कविता वाचत बसलो. आपण जे लिहितोय ते प्रत्येकाच्या मनात आहे. यात कित्येक वाचक आपला आनंद शोधतात दुखः पाहतात अगदी स्वतःला हरवून जातात.
‘पण खरंच तुमच्या कवितेतील ती आहे तरी कोण??’ असा कित्येक वेळा प्रश्न विचारल्या नंतर मी निरुत्तरीत होतो. काय सांगावं की मनातली सखी, की सत्यातील एक सोबती. की फक्त मनाची कल्पना. ‘तुम्ही लिहिलेल्या कवितेतील ती सखी खरंच खुप छान असणार!!’ नाहीतर कोण लिहित एवढं कोणासाठी. असे असंख्य प्रश्न मला ब्लाॅगवर लिहिताना विचारले जातात. एका वाचकाने तर मला माझ्या कवितेतील तिला भेटण्याची इच्छाच व्यक्त केली. अखेर कस तरी तो विषय बाजुला केला. आणि कवितेतील ती अखेर कवितेतच राहिल हे सांगुन विषय टाळला.
पण मनाला भावली ती एका माझ्या ब्लॉग वाचकाची प्रतिक्रया. आईशी भांडण झालं म्हणुन तो तिला कित्येक दिवस बोलतच नव्हता. माझ्या आई बद्दल लिहिलेल्या एका छोट्या लेख मधुन त्याला त्याची चुक लक्षात आली. तो कित्येक वेळ आपल्या आई आणि त्याच्या नात्याबद्दल बोलत बसला. मला ऐकुन खरंच खूप छान वाटलं. असे कितीतरी वाचक आपलं मनोगत मांडतात. स्वतःला व्यक्त करतात. अगदी प्रेयसी, मित्र , नाती , समाज असे कित्येक ठिकाणी आपली लेखणी कुठेतरी माणसाच्या मनात घरं करतेय याचा आनंद मिळतो.
पण या सर्वान पासून एक लक्षात आलं परके लोक अगदी जे मला कधी ओळखतही नव्हते ते आपले झाले. त्याना आपल्या भावना कळाल्या याच विशेष वाटलं. जवळचे लोक जेवढं आपुलकीने मनातल सगळं सांगत नाहीत तेवढे हे सांगतात हेही जाणवून आलं. अखेर मनाच्या भावना त्यानीच ओळखल्या आणि या लिखाणातुन मी आनंद शोधायला गेलो आणि सापडले ते हीच माणसं.
असे कितीतरी अनुभव येतात जेव्हा आपण नियमित लेखन करतो. कोणाला भावना व्यक्त करताना शब्दच सापडले नाहीत तर त्याचे शब्दही होतो. कोणाच्या डोळ्यातील अश्रू होतो. पण एक लेखन करणारा फक्त मनातुन लिहितो. कोणाला ते कळत तर कोणाला नाही. कधी आपलेच दुरावतात तर कधी परक्यानाही आपल्या भावना कळतात आणि असंच असतं ज्याच्यासाठी लिहावं त्याला ते कधीच कळत नसतं. जसं प्रेयसीचा राग प्रियकराला कधीच कळत नाही. आईची माया काळजी लेकराला कधीच मोजता येतं नाही तसंच लेखन करणार्याच्या मनातले भाव कधीच ओळखता येत नाहीत. ते अनंत असतात. फक्त ते समजावे लागतात. मनापासून आपले म्हणावे लागतात. शोधावे लागतात ते शब्द जे मनातुन कागदावर लिहिलेले असतात.
✍योगेश खजानदार