Share This:

ब्लॉक..!! कदाचित नात्यांमधे बोलण्यास काहीच नाही उरल्यावर शेवटचा पर्याय म्हणजे ब्लाॅक. सोशल नेटवर्किंगवर बोलताना कित्येक वेळा याचा अनुभव सगळ्यानाच येतो. का होतं असं? कोणीतरी आपल्याला का ब्लाॅक करत याचा विचार कित्येक जण करतात. कोणीतरी नको असेल!! किंवा एखाद्याचा त्रास होतं असेल तर अंतिम पर्याय म्हणुन खुप लोक याचा वापर करतात. तिने मला ब्लाॅक केल, तिने माझा नंबर रिजेक्ट लिस्ट मधे टाकला असे खुपदा ऐकायला मिळाले. म्हणुनच यावर थोडा विचार करुन लिहावंस वाटलं. साधारणपणे आपल वागणं, बोलणं याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.

एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल किंवा बोलण्यास उत्सुक नसेल तर जबरदस्तीने बोलणे चुकीचेच. कित्येक लोकांना मी एकतर्फी खुप मेसेजेस, काॅल करताना पाहिलं. समोरची व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नसतानाही यांचा हा प्रकार चालुच असतो. त्यावेळी खरंच अशा लोकांनी आपल्या वागण्याचा विचार करणं गरजेच असतं. नात्याची सांगता जर ब्लाॅक या शेवटच्या पर्यायाने होणार असेल तर उपयोग तरी काय अशा गोष्टींचा. यापेक्षा आपल्या आयुष्यात असणाऱ्या लोकांकडे लक्ष दिले पाहिजे. कित्येक लोक आपल्याशी बोलण्यास उत्सुक असतात हे आपल्याला कळलं पाहिजे. कित्येक वर्षांची नाती मी या एका शब्दांत संपताना पाहिली. काहीना खुप वाईट वाटलं. तर काहीना त्या नात्यातुन सुटका झाल्याचा आनंद झाला. मी म्हणेन अनोळखी व्यक्तीचा त्रास होत असेल तर हा पर्याय उत्तमच. पण कित्येक वर्षाची नाती या एका शब्दात संपणार असतील तर नक्कीच ब्लॉक करणार्‍या व्यक्तीनेही विचार करावा की हा शेवटचा निर्णय होऊ शकतो का. कित्येक मित्राना या शेवटच्या निर्णयाच दुख करतानाही पाहिलं आहे.

नाती संपत नसतात जी जवळची असतात. अबोल राहुन किंवा ब्लॉक करुनही प्रश्न सुटत नसतात. मनात कितीही करुन नाती ब्लॉक करता नाही येतं. मग उरतो फक्त पश्चात्ताप. मी त्यावेळी बोलो असतो/बोले असते तर बरं झालं असतं. किंवा मी त्यावेळी नात्याला अजुन वेळ दिला असता तर बरं झालं असतं अस कित्येकाना वाटत असतं. ब्लाॅक हा शेवटचा पर्याय होऊच शकत नाही. खरंतर मी इथे ब्लॉक याचा अर्थ फक्त सोशल नेटवर्किंग पुरता नाही सांगितला. अबोल राहन, नात तोटुन टाकणं यालाही ब्लाॅकच म्हणतात ना. मग आठवणीचा पुर मनातच येतो आणि उरतो तो फक्त गालांवरचा ओलावा अगदी कायमचा पण हे फक्त आपल्या लोकांसाठी. अनोळखी व्यक्तीसाठी किंवा नात्यांमधे जबरदस्ती किंवा आपलंच खरं करणार्‍यासाठी ब्लाॅक उत्तमच.

पाहिलं तर चांगला उपयोग आणि आपल्या लोकांनसाठी पाहिलं तर खुप वाईट उपयोग होतो याचा. पण ज्याने त्याने आपल्या विचारांनी याचा उपयोग करावा. वाईट लोकांशी संपर्क नकोच त्यासाठी उत्तमच पण आपल्याच लोकांसाठी जरा वाईटच असा काहीसा अनुभव यातुन येतो. पण मी म्हणेन वाईट गोष्टी ब्लाॅकच करा पण आपल्याच जवळच्या नात्याना ब्लॉक करताना थोडा विचार नक्की करा… !!

✍योगेश खजानदार