"कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस!!
सांगितले तरी त्या वेड्या मनास
ते खरं केव्हाच वाटणार नाही!!

 तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळ
ते उगाच बसून राहील!!
चाहूल कोणती होताच त्यास
लगबगीने ते धावत जाईल!!

 तुझ्याच आठवणी सांगत ते
कित्येक वेळ बोलत राहील!!
अश्रुसवे उगाच मग तेव्हा
रात्रभर चांदणे पाहिलं!!

 कधी हळूवार वाऱ्याची झुळूक
तुलाच शोधून येईल!!
तुझा गंध हरवला असा की
हा श्वासही त्यास विसरून जाईल!!

 एक चित्र तुझे मनात असे की
त्यात आठवांचे रंग भरून घेईल!!
पहावेसे वाटलेच तुला कधी तर
अलगद ते डोळे मिटून राहील!!

 अधीर झाले उगाच जेव्हा
त्यास मी समजून घेईल!!
पण ऐकलेच नाही त्या मनाने
तर ती ओढ मनात राहील!!

 कळावे कसे मनास आता
तू आता पुन्हा येणार नाहीस..!!"

 ✍️©योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*