खरंतर या नावातच आपुलकी आहे.  तुम्ही इथे आलात की इथल्या लोकांशी आपसूकच एक नात होऊन जात. इथे प्रेम आहे, आपलेपणा आहे.इथल्या मातीचा रंगच जरा वेगळा आहे. कोणी याला आमची बार्शी म्हणत तर कोणी आपली बार्शी म्हणत. आपली आणि आमची, पण बार्शी आहे आपल्या सर्वांची हे बाकी खर !! मराठवाड्याच प्रवेशद्वार बार्शीला म्हटलं जातं. भगवंताची बार्शी म्हणूनही याला ओळखल जात. किती आणि काय सांगावं असही या बार्शी बद्दल वाटतं. इथल्या भाषेची गोडी खरंच खूप छान आहे , मराठवाड्याच प्रवेशद्वार असले तरी मराठवाडी बोली इथे सापडतच नाही, सोलापुरी  ही कुठे दिसत नाही पण भाषा मात्र अस्सल बार्शीची ओळख करू देते हे बाकी खर. म्हणजे जरा आक्रमक वाटेल पण मनातला गोडवा बार्शी शिवाय कुठे सापडत नाही. भगवंताच्या बार्शीची हीच खरी ओळख आहे. अगदी तुम्ही कुठेही गेलात तरी बार्शीची भाषा लोक ओळखल्या शिवाय राहत नाहीत.

  याला भगवंताची बार्शी असही म्हटल जात कारण बार्शी मधे श्रीविष्णूचे एकमेव मंदिर आहे. याची बांधणी इ.स. पुर्व १२४५ च्या दरम्यान झाली असे म्हणतात. मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. मोठ्या एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्या नंतर भाविक द्वादशीला बार्शीत भगवंताच्या दर्शनाला येतात आणि मगच उपवास सोडतात. भगवंतांची मूर्तीही आकर्षक आहे . आषाढी एकादशीला संपूर्ण शहरातून भगवंताची रथातून मिरवणूक काढली जाते. तो एक उत्सवच बार्शीत पाहायला मिळतो. तसेच भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची  बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही बार्शीची खरी ओळख.

  बार्शीची जयशंकर मिल ही सूतगिरणी आजही चालू आहे हेही वैशिष्ट बार्शी बद्दल सांगता येईन. शैक्षणिक दृष्ट्या बार्शी सर्वच बाजूने प्रगत आहे इथे शिवाजी कॉलेज , बार्शी कॉलेज, सुलाखे हायस्कूल हे नामांकित शिक्षणसंस्था आहेत. बार्शीच्या शिक्षण परंपरेत मोलाचा वाटा कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा, आजही त्याच्या शिक्षणसंस्था मधे कित्येक विद्यार्थी घडतात. दर वर्षी मामांच्या जयंती निम्मित भव्य मिरवणूक काढली जाते त्यात कित्येक सस्थेतील विद्यार्थ्याचा सहभाग असतो.

  अशी ही बार्शी खरंच खूप सुंदर आहे. व्यापार व्यवसायासाठी बार्शी ओळखली जाते. अशा कित्येक रंगांनी बार्शी रंगलेली.  तरुण पिढी इथली आजही कित्येक सामाजिक , राजकीय कार्यात सहभागी झालेली पाहायला मिळते. शिवजयंती म्हणजे बार्शीच्या तरुणाचा उत्सवच असतो. अशा कित्येक गोष्टी इथे सांगाव्या तेवढे कमीच .. कलाकार,  तसेच रसिक यांचा मेळ म्हणजे बार्शी. कित्येक कलाकार ,साहित्यिक, कवी , लेखक  बार्शीत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सामाजिक कार्यात सहभाग असतानाच स्वतच्या कला जपणं त्यांना उत्तम जमत. शॉर्टफिल्मच्या माध्यमातून , स्वतच्या लेखनाच्या माध्यमातून इथला तरुण सर्वांशी जोडला आणि  बार्शीचे नाव सर्वदूर केले याचा अभिमान नक्कीच बार्शीतल्या लोकांना आहे  हे मात्र नक्की.

असो असे कित्येक पानं उलटली तरी बार्शी बद्दल लिहाव आसच वाटत. जुन्या काही वर्षांपूर्वीची बार्शी आणि आताची बार्शी यात खूप फरक आहे हेही मात्र खर , रेल्वे narrow गेज वरून broad गेज झाली. आणि जुन्या रेल्वेच्या आठवणी देऊन गेली. नवीन रस्ते झाले पण जुन्या रस्ताची मज्जा आजही ताजी ठेवून गेली. कित्येक परिसर बदलून गेले , जुन्या रस्तांचे दिवे आता आठवणीत राहून गेले पण या बार्शीत आजही सर्व तसेच आहे . बदल झाले पण बार्शीच्या मनात ते जुने आठवणीतले सर्व तसेच ठेवून गेले. अशी ही बार्शी आजही गुलाबी थंडीत आहे !!! तशीच राहून आहे .. !!

✍योगेश खजानदार

SHARE