मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी चार ओळीत उत्तर द्या या प्रश्नाला देखील आमचे बार्शीतले विद्यार्थी पुरवणी मागितल्या शिवाय राहणार नाहीत. एकंदरीतच काय तर आमच्या बार्शीकरांना बोलण्याची प्रचंड हौस. मग तो विषय कोणताही असो.मित्रां सोबत चर्चा करणे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकत्र जमल्याचा अनुभव तुम्हाला इथे आल्या शिवाय राहणार नाही. अगदी सुभाषनगरला चालु असलेली चर्चा पांडे चौकात ऐकू आली तर त्यात नवलं ते काय वाटायचं. मग त्यात राजकारण आलं , समाजकारण आलं आणि चेष्टा मस्करी तर काय विचारु नका. असं एकंदरीतच बार्शी म्हणजे स्वतःतच रमलेल छोटं शहर आहे. इथे विविध प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील आणि विरंगुळा मिळेल असे एकही ठिकाण नसले तरी तुम्हचा विरंगुळा झाल्या शिवाय राहणार नाही.
इथे भाषा जरा वेगळीच सापडते !! त्याचे पण जरा प्रकार आहेत एवढंच. काही दिवस पुण्यात राहुन आलेला एखादा बार्शीकर जर अगदीच शुद्ध आणि सात्विक बोलतोय असं वाटलं तर म्हणायचं याला पुण्याची हवा लागली मग बार्शीचा अत्यंत अभिमान असणारे काही विचारवंत त्याची चेष्टा केल्या शिवाय राहत नाहीत.. काय बेट्या बदलला तु तिकडं जाऊन असे म्हटल्यावर आपल्या रांगड्या बार्शीच्या दोन शिव्या बसल्या की यांची गाडी कुर्डूवाडी रोडचे खड्डे सहन करत बार्शीत येऊन पोहचते.
प्रेम , जिव्हाळा बार्शीत अगदी पोतं भरेल इतकं मिळेल. पण भांडण म्हटल की हम किसीसे कम नही !! ची भाषा इथे नक्कीच वापरली जाते. भाषा जरा वरच्या स्वरात असते पण त्यातही एक आपुलकी नक्कीच असते. आपले लोक आपली बार्शी याबद्दल प्रत्येक बार्शीचा माणुस भरपुर सांगेन आणि बार्शीत कधीही न आलेला माणुस कोणालाही न विचारता सारी बार्शी फिरुन येईल यात काही शंका नाही.
बाकी संध्याकाळच्या वेळी भगवंत मैदानावर विविध खाण्याच्या पदार्थावर ताव मारतं कित्येक बार्शीच्या लोकांची मने तृप्त होतात. नवविवाहित जोडप्यांच तर हे आवडीच स्थळ म्हणायला ही हरकतं नाही. अगदी खुप दिवसांनी भेटणारे मित्र ही पाणीपुरीवर ताव मारताना इथे भेटतात. काही बोलतात तर काही चेहरा 180 अंशाने फिरवुनही जातात मग हा देह फक्त बार्शीत आहे बाकी मेंदु बाहेरगावीच ठावुन आला आहे असं वाटतं बाकी हवा कुठली लागली त्याला विचारायलाच नको.
बार्शीचं वेगळेपण तस खुप सांगण्या सारखं आहे. इथे तरुण पिढी समाजकारणात मनापासून भाग घेते आणि तेच सशक्त लोकशाहीचे जिवंत उदाहरण आहे. विविध विषयांवर चर्चा होते , शिवकार्यात तर बार्शीचं कौतुक करावं तेवढं मला कमी वाटतं. एकंदरीतच काय तर बार्शी जरी छोटे शहर असले तरी त्याची विविधता खुप आहे. इथल्या भाषेची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे काही शब्द मराठी भाषेत बार्शीतल्याच लोकांनी दिले असणार हे नक्की. इथले वारे जरा वेगळ्याच दिशेने वाहतात हेही तितकेच खरे आहे. . .. !!
© योगेश खजानदार