बाप्पाच्या आगमना वेळी खरतर बाप्पा पुन्हा जाऊच नये अस नेहमी वाटत राहतं. पण अनंत चतुर्थी येते आणि वरद विनायकाची जायची वेळ येते. मनातल्या भावनांना आवरत गजाननाची निरोपाची तयारी करावी लागते. हो पण बाप्पाच्या विसर्जनाला मस्त मिरवणूक काढली जाते. ढोल ताशा, लेझिम, कुठे डिजे , कुठे भक्तिपर गाणी यांनी हा आसमंत दुमदुमून जातो. “पुढच्या वर्षी लवकर या!!” ही बाप्पाला दिलेली साद वक्रतुंड नक्की ऐकतो. आणि सुरू होते बाप्पाला निरोपाची वेळ. मनात एक सल असते, पण तिथेच एक पुन्हा लवकर येण्याची ओढ असते. या द्विधा मनस्थितीत बाप्पा आपल्या पुढच्या प्रवासाला जात. जिथे पुढच्या वर्षी लवकर त्याला पुन्हा परतून यायचं आहे.
बाप्पाला निरोप देताना खरतर लहान मुलांपासून ते ज्येष्ठा पर्यंत सर्व लोकांची अवस्था एकच असते. कोणाच्या डोळ्यात पाणी येते तर कोणी अलगद आपले टिपूस गाळतो. अगदी कोणी पाहणार नाही याची दक्षता घेत. आणि ज्या उत्साहात बाप्पाला घरी आणले होते त्याच उत्साहात त्याला निरोप दिला जातो. जाता जाता बाप्पा खूप काही सांगून जातो. पुढच्या वर्षी येई पर्यंत त्याची आठवण रहावी असे करून जातो. आणि जाताना गणाधीश भक्ताला सांगतो की,
मी पुन्हा येईपर्यंत तू नक्कीच आपल्या चांगल्या सवयी वाढवण्याचा प्रयत्न करशील.
तुझ्या प्रत्येक आठवणीत माझ्या आठवणी तू जपशील.
कधीच वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्न तू करणार नाही.
सत्कर्म ही मला दिलेली खूप मोठी भेट असेल, तेव्हा पुढच्या वेळी येईल!! तेव्हा नक्कीच तू मला अशा खूप सुंदर गोष्टी देशील.
माणूस हा कर्म करतो आणि त्याच फळ त्याला नेहमी भेटतं हे कधी विसरु नकोस.
मी जरी परत चाललो असेल, तरी माझे लंबकर्न तुझी प्रत्येक साद नक्कीच ऐकणार हे लक्षात ठेव.
तुझ्या सोबत मी नेहमीच सावली बनून तुझा विघ्नहर्ता म्हणून राहील.
मनोभावे केलेली माझी पूजा तुला नक्कीच इच्छित फळ देईल.
पुढच्या वर्षी मी लवकर येईल !!
आणि तुम्हा सर्व भक्तांच्या भेटीची ओढ मलाही राहिलं !!
अस जणू सांगून बाप्पा आता निघाले आपल्या गावाला, त्यांच्या येण्याची वाट नक्कीच पाहत राहू, पण त्यांनी सांगितलेले मार्ग यावर नक्की चालू. आणि वर्षभर तिथेच त्या आठवणीत बाप्पाला जपू.
गणपती बाप्पा मोरया !! पुढच्या वर्षी लवकर या !!
✍️योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*