बंधन || अंतिम भाग || BANDHAN MARATHI STORY ||

भाग ५

विशाल आता शांत होता. त्याच्या नजरे समोर फक्त प्रिती होती. त्याला बोलावंसं वाटत होत, पण बोलता येत नव्हतं. त्याची बोलण्याची धडपड पाहून प्रिती म्हणाली.

“तू शांत हो!! काहीच बोलू नकोस !! तुला बरं व्हायचं आहे !!” प्रिती उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात तिचा हात धरत विशाल तिला नकारार्थी मान हलवून लागला. कदाचित त्याला म्हणायचं होत “अखेरच्या या क्षणात माझ्या समोरून तू कुठेही जाऊ नकोस प्रिती!!”
प्रिती पुन्हा बसली. त्याला बोलू लागली.
“अरे डॉक्टरला बोलावून आणते !! ” पुढे तिला बोलवेना ती शांत झाली.
तिच्या हातात त्याचा होत होता. तो आयुष्याची शेवटची घटका मोजत होता. चूक कोणाची यावर स्वतःशीच भांडत होता.

“नाही!! ती आज माझ्या समोर आहे !! आणि मला तिला काहीही दोष द्यायचा नाहीये !!! त्या देवाला कशासाठी भांडू मी, या शेवटच्या क्षणी की..!! आयुष्यभर त्याने मला एका खोलीत खितपत मारलं म्हणून, का आनंद मानू त्याचे की त्याने माझ शेवटचं मागणं तरी ऐकलं.!! पण मी म्हणेन आता कसला राग आणि कसलं काय!! या इतक्या वर्षात या खोलीत कधीच इतकं मोकळं वाटलं नाही, ते प्रितीच्या नुसत्या समोर पाहिल्याने वाटलं मला!! मी नाही दोष देणार कोणालाच !! ना तिच्या वडिलांना , ज्यांच्या रागाची शिक्षा आयुष्यभर मला भोगावी लागली, मग नको आता आरोप प्रत्यारोपाच हे घोंगड!! आता फक्त शांत होउन जायचं आहे !!” विशाल शेवटच्या त्या क्षणांना कित्येक मनातलं बोलत होता.

“प्रिती माझं तुझ्यावर किती प्रेम आहे !! कदाचित हे सांगायला मी उद्या नसेल !! पण माझ्या आठवणींचा पसारा तुला सगळं काही सांगून जाईल!! उरल्या माझ्या प्रेमाची हीच तुला भेट असेल !! आठवण !! अगदी कायमची!!” विशाल निशब्द झाला. क्षणांशी त्याचा संवाद संपला.
“विशाल !! विशाल !! ” प्रिती विशालला उठवत होती.
“मारिया , बघ ना विशाल उठतं नाहीये!ये विशाल !! तुझे हात किती गार पडले आहेत रे !! उठ बरं !! आपण मस्त उबदार त्या शेकोटी जवळ बसुयात !! ये विशाल!!” प्रिती भावनिक होऊन बोलू लागली.

मारिया प्रितीला सावरू लागली. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“कदाचित मी यायला उशिरच केला विशाल , पण तुझ्या असण्याची जाणीव मला नीट जगू देत नव्हती हे मात्र खरं!! मी रमले माझ्या संसारात!! पण तुझं प्रेम कधीच मी विसरले नाही!! तुझी एक सोबत तेवढी होती मला !! पण आज खऱ्या अर्थाने तू मला एकटं केलंस !! तू कुठेतरी आहेस !! सुखात आहेस कदाचित !! ही जाणीव मला जगण्यासाठी प्रेरणा देत होती!! तुझ्या या प्रितीला माफ कर विशाल!! ” प्रिती कित्येक वेळ अश्रू ढाळत होती.

“मला एकटं सोडून गेलासचं ना विशाल बेटा!! आता या म्हातारीने कोणाकडे बघून जगायचं हे तरी सांग !! मारिया!! ही तुझी हाक कानावर पडावी म्हणून माझे कान आतुर असायचे!! तुझ असणं माझ्या म्हातारीच्या जीवनाला एक आधार होता!! तू अपंग जरी होतास तरी मला तुझा आधार होता !! विशाल पुन्हा ये माझ्या बाळा !! ही मारिया तुझ्या तोंडून ती हाक ऐकण्यासाठी वाट पाहते आहे रे !! ” मारिया विशाल जवळ बसून त्याच्या चेहऱ्याकडे बघत मनाशीच कित्येक वेळ बोलत होती.

“हे बंधन झुगारून मी कदाचित मोकळा होईल असं मला वाटतं होत !! पण मी अडकलो इथेच पुन्हा!! प्रितीच्या अश्रूंमध्ये !! मारियाच्या त्या हाकेमध्ये ..!! मी अडकलो या नव्या बंधनात पुन्हा !! ज्यातून माझी कधीच सुटका नाही !! त्या प्रितीच्या प्रत्येक अश्रुत मी अडकलो!! त्या तिने लिहिलेल्या प्रत्येक कवितेत मी अडकलो!! ते अपंग होऊन त्या पलंगावर पडून त्या बंधनात राहणं किती सोप होत ना?? पण हे नवे बंध कदाचित मला आता पुन्हा नव्याने जखडून घेत आहेत !! ही बंधने कदाचित मला झुगारून देता येणार नाहीत !! कधीच नाहीत !! कारण मी उरलोय तिथेच फक्त आता !! त्या आठवणीत !! त्या नव्या बंधनात !! ” विशालची ती शांत मुद्रा खूप काही सांगून जात होती. जणू शांत तो विशाल कित्येक भाव नकळत सांगून जात होता.

“अखेरच्या क्षणात मी तुझ्या सोबत होते, यापेक्षा त्या देवाने अजून काय द्यावे मला विशाल!! माझ्या या कवितेत अखेर उरलाच तू..
उरल्या क्षणात आता
शोधू मी कुठे तुला
सावल्याही आज माझ्या
अबोल का झाल्या मला
श्वास जणू आज हे
साथ न देता तुला
आठवणीच्या या खोलीत
छळते ते का मला
सांग मनीचे आज सारे
न कोणते बंधन तुला
खूप काही ऐकायचे आहे
हृदय सांगते आज मला
खूप काही ऐकायचे आहे
हृदय सांगते आज मला!! ” पण बोलायला विशाल तू राहिलासचं कुठे !! मला एकटं सोडून गेलास !!! ” प्रिती एकटक पाहत होती.

अखेर त्या जळत्या चितेत जणू सारी बंधने जळत होती. पण ती शरीराची , मनाची बंधने तशीच होती. आठवणीत , त्या क्षणात , त्या हृदयात !! अगदी कायमची. प्रिती आणि मारिया कित्येक वेळ त्या जळत्या चितेकडे पाहत बसली होती. आपल्या विशालला शेवटचं बंधनातून मुक्त होताना पाहत होती.

*समाप्त*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *