भाग २
सकाळच्या किरणांनी विशाल प्रितीच्या आठवणींन पासुन दुरावला. त्या उगवत्या सूर्याला त्याला म्हणावंसं वाटतं कधी कधी.
” उगाच येतोस तु उगवून पुन्हा , आणि मला माझ्या उरलेल्या क्षणांची जाणीव करून देतोस!!” विशाल पलंगावर पडून खिडकीतून येणाऱ्या सुर्यकिरणांशी जणू बोलत होता.
“काय विशाल बेटा , झाली का झोप??” मारिया खोलीत येत म्हणाली.
“हो !! ” विशाल शेजारच्या पुस्तकांकडे पाहत म्हणाला.
मारिया आपल्या कामात व्यस्त झाली. विशाल एकटक खिडकीतुन बाहेर पाहत होता. जणू ते सूर्याचं तेज त्याला खूप काही बोलत होतं.
“रोजच कसं प्रसन्न होऊन जगायचं!! आयुष्यात क्षण किती उरले हे कदाचित तितकसं महत्त्वाचं नाही . पण आपण रोज तेवढ्याच ताकदीने प्रकाशमान व्ह्यायच. अखेर जो ह्या सूर्यकिरणांनां पाहतो तो त्यांना अनुभवतो आणि जो खिडकी बंद करून घेतो त्याला याच काहीच देणंघेणं नसतं. पण या सगळ्याचा त्या सुर्यावर काहीच परिणाम होत नाही !! नाही का ??
” विशाल !! विशाल !! ” मारिया विशालकडे पाहून बोलू लागली.
विशाल आपल्याच विचारात मग्न होता. मारियाच्या आवाजाने तो भानावर आला.
“काय मारिया !! “
“तुला, चहा हवाय??” विशालच्या होकारार्थी उत्तराने मारिया खोलीतून बाहेर निघून गेली.
विशाल आज सकाळपासून पलंगावर होता. मारिया चहा घेऊन आली आणि हातात तिच्या काहीतरी आहे हे विशालने पाहिलं.
“काय आहे ते ??”
“पत्र आहे!! ” मारिया चहा विशालकडे देत म्हणाली.
“कोणाचं ??” विशाल कुतूहलाने विचारू लागला.
“प्रिती सरदेसाई!!” मारिया पत्र विशालकडे देत म्हणाली.
विशालला ते ऐकून काय बोलावं तेच कळेना. या आधी प्रितीच पत्र कधीच आल नव्हतं. आज अचानक तिचं पत्र आलं आणि विशाल निशब्द झाला.
“तूच !! तूच वाच पत्र !! ” विशाल मारियाकडे पत्र देत म्हणाला.
मारिया पत्र हातात घेत वाचू लागली.
“नमस्कार निरंजन !! ” मारिया विशालकडे पाहू लागली.
“मी निरंजन या नावाने पत्र लिहीत होतो !! ” मारिया काहीच न बोलता पुढे वाचू लागली.
“तुमचे कित्येक पत्र मला मिळाली , माझ्या लिखाणावर इतकं प्रेम करणारे कोणी वाचक आहेत ह्याचा मला खरंच खूप आनंद झाला. खूप शोधल्या नंतर मला तुमचा पत्ता मिळाला. तरी माझी एक इच्छा आहे , की मी पुढच्या आठवड्यात तुमच्याच गावी येणार आहे. तरी मला तुम्हाला भेटण्याची खरंच खूप इच्छा आहे !! माझं लिखाण मीही कधी पुन्हा एवढं वाचलं नाही जेवढं तुम्ही वाचलत. लिखाणातील कित्येक भाव तुम्ही अचूक टिपले , तुमची कित्येक पत्र वाचताना मला माझा कोणी खूप जवळचा माणुस मनातलं वाचत आहे असंच वाटायचं !! त्यामुळे मला तुम्हाला कधी भेटेल अस झाल आहे !! तुम्हालाही मला भेटावसं वाटतं असणारच !! तर भेटुयात नक्की !! ” मारिया पत्र वाचून शांत झाली.
“मला भेटायचं म्हणते !! नाही .!! मला नाही भेटायचं पण तुला !! ” विशाल अचानक अस्वस्थ झाला. खूप काही बोलू लागला.
“मारिया !! कागद आणि पेन घेऊन ये !! मला तिला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगायचं आहे !! मारिया जा ना !! घेऊन ये लवकर !!! ” विशाल उठण्याची धडपड करू लागला. आणि अचानक पलंगावरून खाली पडला.
खाली पडलेल्या विशालला सावरायला मारिया पुढे आली आणि म्हणू लागली,
“अरे !! येऊ देत ना विशाल !! त्याने काय होणार आहे !! तू नकोस एव्हढा त्रास करून घेऊ !!”
“नाही मारिया !! ती मला भेटू नये कधी !! ती आली तरी तिला सांग !! मी नाही म्हणून !! “
प्रिती विशालला भेटायला येणार या विचाराने विशाल अस्वस्थ झाला.
“कशाला येणार आहेस मला भेटायला !! निरुपयोगी मला पाहायला !! की अजून स्वतः ला त्रास करून घ्यायला !!! नको प्रिती तुला नाही सहन होणार हे !! मी एक रुबाबदार !! तुझ्यासाठी वाट्टेल ते करणारा विशाल !! असा असाहाय पहायचा आहे का तुला ?? देवा माझ्या आयुष्याचे उरले क्षण आताच का संपत नाहीत !! हे उरले क्षण खूपच त्रास देतील रे !! ” विशाल प्रितीच्या त्या पत्रास हातात घेऊन विचार करत होता.
मारिया त्याला कित्येक वेळ समजावत होती.
“मारिया !!आपण एक महिनाभर कुठे निघून जाऊया का ??”
“बेटा !! मी तुला अस काही करू देणार नाही !! “
“पण मला तिला भेटायचं नाहीये !! ” विशाल मोठ्या आवाजात बोलत होता.
“तू नकोच भेटू तिला !! एक लक्षात ठेव !! तू कदाचित लपवून ठेवशील तुझं हे दुःख आयुष्यभर तिच्यापासून !! पण जेव्हा तू जाशील आणि तिला हे सगळं कळेन तेव्हा तिला तुझा विरहापेक्षा जास्त दुःख तुझ्या या वागण्याचं होईल !! ” मारिया अगदी मनापासून सांगत होती.
विशाल मारियाच्या या बोलण्याने शांत झाला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
प्रिती सुधा निरंजला भेटायला अतुर झाली होती. कधी एकदा त्याच्या समोर जाऊन,
“तुला माझ लिखाण इतक आवडत, की तू त्या लिखाणातील माझे भाव कसे काय ओळखू शकतोस ??” हेच जणुकाही तिला विचारायचं होतं.
“आपल्या अगदी जवळच्या कोणीतरी आपल्याशी बोलल्या सारखं का वाटावं. निरंजनच पत्र आलं की ते वाचायची एवढी ती काय उत्सुकता असावी बर मला!! की पुन्हा नव्याने अजून लिखाणास सुरुवात करावी!! जणू मी माझ्या विशालला बोलते आहे हा भास का बरं व्हावा मला !! खरंच किती वेड असेल ना ते माझ मन !! ते आजही त्याचाच विचार करत !! कुठे असेल?? कसा असेल ?? काही काही माहीत नाही !! माहिती तर एकच !! त्याच प्रेम !! ” प्रिती निरंजन ला भेटण्यासाठी आतुर झाली. आपल्याच वहीच्या पानांना खूप काही सांगू लागली.