कथा भाग ९ || सुटका ||
श्रीधर कित्येक वेळ त्या अपंग झालेल्या मंदार केळकरकडे पाहत राहिला. त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर गाड्यांचा आवाज येऊ लागला.श्रीधर धावत खिडकी जवळ गेला, तर समोर दहा ते पंधरा लोक हातात काठ्या, चाकू, बंदूक घेऊन आले होते. श्रीधर पुन्हा धावत मंदार केळकरकडे आला आणि म्हणाला.
“चला इथून !! आपल्या मागावर लोक आलेत !! नक्की त्या देशमुखला सगळं खर खर कळलं असणार !!”
“तू कोण पण !!” मंदार श्रीधरकडे बोट करत म्हणाला.
“मी श्रीधर जोशी !! तुम्हाला इथून सोडवायला आलोय !!”
“श्रीधर जोशी ?? पण मला का ??” मंदार केळकर कुतूहलाने विचारतात.
“सगळ तुम्हाला सांगतो नंतर !! पण आता प्लीज इथून चला !! आपल्या जिवाला धोकाय !! “
“हो पण मी नाही हलू शकत जागेवरून !! जास्तीत जास्त हाताने जवळपास जाऊ शकतो !! तेही फरपटत!! ” मंदार पायांकडे पाहत म्हणाला.
“मी घेतो ना तुम्हाला माझ्या पाठीवर !! पण श्याम तू लक्ष ठेव त्यांच्यावर !! ते कुठे आलेत ते बघ !!”
“हो !! “
श्याम धावत पुन्हा खिडकीजवळ गेला. हळूच वाकून पाहू लागला. कोणीतरी एक इसम फोनवर बोलत होता.
“तुम्ही काही काळजी करू नका साहेब !! आज इथच त्या श्रीधर आणि मंदारचा मुडदा पाडतो !! त्याच्या सात पिढ्या सुद्धा शोधू शकणार नाहीत !! “
फोन ठेवत तो कंपनीच्या मुख्य दरवाजातून आत येतो. त्याच्या मागे उभे असलेले लोक त्याच्याकडे पाहू लागले.
“गण्या !! तुम्ही चौघ वरच्या मजल्यावर जावा !! भाणू तू तुझ्या पोरांना घेऊन मागच्या बाजूला जा !! आणि जिथं दिसतील तिथं डोक्यात कोयता घाला !! कळल का ? कळल ना ??”
“होय दादा !!”
“निघा निघा कामाला लागा!! “
श्याम श्रीधरला पळत येऊन लपायला सांगतो. श्रीधर धावतच समोरच्या खोलीत मंदार केळकरला घेऊन जातो. तिघेही शांत बसतात. गण्या आणि त्याचे मित्र शोधत शोधत मंदार केळकरच्या खोली जवळ येतात. पाहतात तर खोलीचा दरवाजा उघडा होता. गण्या जोरात ओरडतो,
“दादा !! म्हातारा नाही खोलीत !!”
“काय ?? साला घेऊन पसार झाला का काय ??” दादा मोठ्याने म्हणतो.
“माहीत नाही दादा !!पण वर कोणच नाही !!”
“शोधा शोधून काढा त्याला !! नाहीतर त्यो देशमुख जीव घेईल माझा !! “
सगळी पोरं त्या कंपनीत फिरू लागली. कोपऱ्या कोपऱ्यात श्रीधर आणि मंदारला शोधू लागली.
“इथ बसून काही होणार नाही !! आपल्याला वेळेत बंगल्यावर पोहचलं पाहिजे !! नाहीतर काही खर नाही !!”
“पण करायचं काय ??”श्याम हळूच विचारतो.
क्षणभर श्रीधर विचार करतो आणि म्हणतो.
“चला !! लपत लपत चला!!” हळू हळू लपत श्रीधर त्यांना बोलतो.
श्याम आणि श्रीधर सगळ्यापासून लपत मार्ग काढू लागतात. श्रीधर मंदारला पाठीवर घेऊन चालत राहतो. तेवढ्यात दादाचा फोन वाजतो. सगळे शांत होतात.
“नाही इथ श्रीधर !! पळाला तो देशमुख साहेब !!”
असे दादा म्हणताच श्रीधर श्यामला आणि मंदारला घेऊन कंपनीच्या मेन डोअर जवळ येतो. धावत धावत तो समोरची गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो. क्षणात ती गाडी चालू होते. त्या आवाजाने सगळे बाहेर पळत येतात. श्रीधर गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी होतो. दादाला हे लक्षात येताच त्याने देशमुखला फोन लावला.
“श्रीधर पळाला साहेब !! आत्ताच पळाला !! त्याच्या सोबत तो मंदार केळकर सुद्धा आहे !!”
“काय !!अरे भाडकावानो तुम्ही काय करत होतात तिथं !!”
“आम्ही शोधतच होतो पण तेवढ्यात आम्हाला चुकवून केव्हा पळाला कळलं नाही !!”
“बरं !! ते जाऊ दे आता पाठलाग कर त्याचा !! बंगल्यावर गेला तर तिथं हान भाड्याला !! ठेव फोन चल !”
देशमुख साहेब रागात फोन जमिनीवर आदळतो. आणि म्हणतो,
“दत्तू !! बंगल्यावर जायचं !! आत्ताच्या आत्ता बंगल्यावर जायचं आपल्याला !! तो श्रीधर तिथं पोहचायच्या आता त्याच्या पोरीचा आणि त्याच्या बायकोचा गेम करायचा !! त्या श्रीधरची पण समाधी आता त्याच बंगल्यात पुरायची !! चल !! चल !! त्याच्या बायकोला हिसका दाखवू !!”
देशमुख आणि जगताप दोघेही गाडी घेऊन बंगल्यावर जायला निघाले. रक्ताने भरलेले हात तसेच घेऊन जगताप बंगल्याजवळ आला. आणि देशमुखकडे पाहत म्हणाला.
“साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??”
“नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!”
“मला पण !!” जगताप मिश्किल हसत म्हणाला.
“चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!”
देशमुखने सांगताच सगळे पोर बंगल्यात घुसले. सुहासला आणि नंदाला त्यांनी एका खुर्चीला बांधलं. मात्र सायलीला काही त्यांना बांधता येईना.
“साहेब !! या पोरीला दोरीन बांधून ठेवणं लई अवघड आहे !!”
“काय पाहिजे तुम्हाला !! का आमचा तुम्ही असा छळ करताय !! ” प्रिया मध्येच बोलते.
“मला तू पाहिजे !! म्हटलं होत ना मी तुला !!” देशमुख असे म्हणताच अंगणातला पाळणा जोरजोरात हलू लागला. त्या जवळून चित्रविचित्र आवाज येऊ लागले.
ते आवाज ऐकताच देशमुख मोठ्याने ओरडला.
“ये माया ! आजुन जोर गेला नाही का तुझा ?? एकदा मेलीस अजून किती वेळा मरायचं आहे तुला ?? ये दत्ता फोन लाव त्या भाडकाव श्रीधरला फोन लाव !! ये म्हणावं आता तुझ्या बायकोला वाचवायला !! जास्त हुषार व्हायचा प्रयत्न करत होता ना !! ये म्हणावं आता !!”
देशमुखने बंगल्याच्या चारी बाजूने आपली माणसं उभी केली. त्याच्या मर्जी शिवाय कोणी तिथं फिरकू ही शकत नव्हतं.
“हे घ्या साहेब !! लावला फोन !!”दत्तू फोन देशमुखकडे देत म्हणाला.
श्रीधर मात्र जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर फास्ट गाडी चालवत होता. थोड्या पुढे जाताच त्याच्या लक्षात येत की आपल्या मागे गुंड लागलेत. त्यांना गुंगारा देत श्रीधर बंगल्याच्या दिशेने गाडी पळवत होता. फोन वाजताच त्याने फोनकडे पाहिलं. देशमुखचा फोन पाहताच त्याला आश्चर्य वाटलं, त्याने फोन उचलताच देशमुख म्हणाला,
“काय श्रीधर !! मंदार केळकरला घेऊन चालला वाटत !!”
“भाडकाव तू किती नीच आणि खालच्या थराचा आहेस हे कळलय मला !! तुझ्या सगळ्या पापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल.”
“खर का ?! आणि कोण देणार शिक्षा मला ?? तू ?? का तो लंगडा केळकर ?? कोण देणार मला शिक्षा ?? “
“जास्त माज नको करू देशमुख !!”
“ये गप्प !!आवाज नको करू !! एवढाच जोर आहेना तर ये वाचव तुझ्या बायकोला !! “
“प्रिया?? !! ये भाडकाव !! तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला सोडणार नाही मी !! “
“अस ?? मग तर लावून बघावाच लागेल !!”
एवढं बोलून देशमुख फोन कट करतो.
“देशमुख बंगल्यात शिरलाय ! आपल्याला लवकरात लवकर जाव लागेल !! “
“तिथे सुहास ??माझी बायको नंदा आहे !! “श्याम.
“बहुतेक त्यानं सगळ्यांना बंदी बनवलय !!”
“हा देशमुख सुधारणार नाही !! असच त्यानं माझ्या मायावर पण प्रयत्न केला होता !! नीच माणूस आहे तो !! ” मंदार मध्येच म्हणाला.
श्रीधर वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवू लागला. इकडे देशमुखने प्रियाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न चालू केला.
“ये प्रिया !! आजिबात घाबरु नकोस !! हे बघ माझी हो मी तुला काही कमी पडू देणार नाही. !! ये जवळ !! “
“नीच माणसा !! तुला थोडी तरी लाज आहे का रे ??”
“नाही ना !! लाज काय त्यात !! तू मला हवी आहेस !! “देशमुख जवळ येत म्हणाला.
अंगणात झोका जोरजोरात हलू लागला. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. सायली खोलीत मोठमोठ्याने वस्तू आदळू लागली. दरवाजा वाजवू लागली. तिच्या आत असलेला प्रतीक मोठमोठ्याने आईला बोलावू लागला.
“ये ! गप्प बसते का नाही तू ?? साली रांड !! त्या झोक्यात बस की गप्प !!” देशमुख मोठ्याने ओरडला.
तेवढ्यात झोका शांत झाला. सुहास मात्र सगळं समजला. आपली आणि नंदाची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला. श्रीधर,श्याम आणि मंदार केळकर येईपर्यंत आपण त्याचा प्रतिकार करावा अस त्याला वाटत होत. पण बांधलेल्या रस्सितून त्याला काही केल्या सुटता येत नव्हतं.
श्रीधर बघता बघता बंगल्या जवळ आला. गाडी त्याने थेट बंगल्याच्या गेटवर आदळली. सगळे चकित झाले. देशमुख सुद्धा आवाजाने सावध झाला आणि म्हणाला,
“काय झालं रे ??”
“साहेब !! श्रीधर आलाय !! त्या मंदार केळकरला घेऊन !!” दत्तू म्हणाला.
“हरामखोरला त्या तिथंच मारा !! जिवंत सापडला नाही पाहिजे !! पळा !!” देशमुख आवेशात म्हणाला.
देशमुख प्रियाला फरफटत त्याच खोलीत घेऊन जाऊ लागला.
“आता तुझं आणि तुझ्या नवऱ्याच काही खर नाही !! “
“सोड मला !! सोड !! अरे तू माणूस आहेस का सैतान आहेस !! ” प्रिया स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली.
“आता तुझी सुटका नाही !! ते बघ !! !”
खाली अंगणात श्रीधर ,श्याम आणि मंदारला देशमुखच्या गुंडांनी घेरल होत.
“तुला वाटतं आता तुझा नवरा जिवंत राहील??”
“श्रीधर !! श्रीधर !!” प्रिया मोठ्याने ओरडली.
“चल !! ” देशमुख तिला खेचत घेऊन चालला.
खाली अंगणात सगळे श्रीधर आणि श्यामवर तुटून पडले. झटपट करत त्यांना मारण्याचा प्रयत्न करू लागले. काहींना श्यामने एका फटक्यात लोळवल. तर काहींनी त्यांना बेदम मारल. कशीबशी त्यांच्यापासून सुटका करत श्याम आणि श्रीधर मंदारला घेऊन सुहास जवळ आले. सुहासला त्या दोरीतून मुक्त करत त्याला म्हणाले.
“कुठ गेलाय तो ??”
“त्या खोलीत ??पण श्रीधर तो झोपाळा पहिले नष्ट कर !! जाळून टाक !! त्या मायाला मुक्त कर त्यातून !! त्या नीच माणसाने तिला त्यात कैद करून ठेवलंय !! “
श्रीधर धावतच किचन मध्ये गेला. रॉकेलची बाटली झोपाळ्यावर ओतून त्याने त्याला आग लावली.
“मायाची सुटका म्हणजे ??” मंदार मध्येच म्हणाला. सुहास त्याला सावरू लागला. श्रीधर धावत खोली जवळ पळाला. दरवाजा जोरजोरात ढकलू लागला.
“ये हराम्या देशमुख !! दरवाजा उघड नाहीतर तुझं काही खर नाही !!”
“अरे निघ रे !! नाही उघडत !! “
श्रीधर धावत खिडकी जवळ गेला. जोरात हिसका देऊन त्याने खिडकी उघडली. समोर देशमुख प्रियाकडे पुढे पुढे चालून जात होता. तेवढ्यात खोलीतला पलंग अचानक हवेत फेकला गेला. अचानक सगळ्या वस्तू जागेवरून उधळल्या जाऊ लागल्या. क्षणात दरवाजा उघडला गेला. प्रिया धावतच बाहेर गेली. प्रिया बाहेर जाताच दरवाजा बंद झाला.
“ये !! ये !! माया !! तुला सोडणार नाही बरका मी !! गप निघून जा इथून !! निघून जा !!” देशमुख सगळीकडे पाहत म्हणाला.
“निघून जाऊ !! तू मेल्याशिवाय माझी सुटका कशी होणार ??”
“कोण मारणार मला !! तू ??”
असे म्हणताच देशमुख जोरजोरात हसू लागला.
“आठवत ना !! गेली कित्येक वर्ष त्या झोपाळ्यात अडकवून ठेवणारा मीच होतो ते !! “
“नीच माणसा !! तुला मी सोडणार नाही !! तुला मी सोडणार नाही !!”
खोलीतल्या सगळ्या वस्तू जागेवरून उधळल्या जाऊ लागल्या. त्या खोलीत जणू वादळ आल होत.