कथा भाग ७ || दोन दिवस ||
“सकाळ उजाडली तरी हा दत्त्या कसा आला नाही अजून ?? त्या श्रीधरन याला धरला तर नसलं ना?? जाऊन बघू का तिथं ?? नको नको !! उगाच काहीतरी वेगळाच कांड होईल!! त्यापेक्षा हळूच जाऊन बघतो नेमक चाललंय तरी काय ??” देशमुख साहेब ऑफिसमध्ये बसून विचार करत बसला होता.
विचार करता करता गाडी घेऊन तो हळूच बंगल्या जवळ आला. बाहेरूनच सगळं पाहू लागला. नेमक आत काय चालू आहे याचा अंदाज काही केल्या त्याला येतं नव्हता. शेवटी त्याने न राहून जगतापला फोन केला. पण काही केल्या तो फोन उचलत नव्हता. तस तस् त्याच इकडे टेन्शन वाढायला लागलं होत. तेवढ्यात त्याने श्याम आणि श्रीधर दोघांना बाहेर पडताना पाहिलं. ते दोघे लगबगीने बाहेर निघाले होते. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांच्यासोबत अजून कोणीतरी असल्याचं देशमुख साहेबान पाहिलं. देशमुख साहेब तिथेच लपून बसला.
“आता सायली कशी आहे ??” सुहास घरात जात जात विचारतं होता.
“खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये !! पण ती खूप विचित्र वागते आहे !! ” श्रीधर काळजीने बोलू लागला.
“डोन्ट वरी !! सगळं ठीक होईल !! “
तिघेही पटापट चालत सायलीच्या खोली जवळ आले. श्रीधरने खोलीचा दरवाजा वाजवला पण कोणच उत्तर देत नव्हतं. प्रिया खिडकीतून लक्ष ठेवून होती. ती लगेच म्हणाली.
“श्रीधर सायलीकडे बघणारे एकदा !!” प्रिया रडू लागली.
सुहास पळत खिडकी जवळ आला. त्याने आतलं चित्र पहातच तो चकित झाला. एक पन्नास साठ वयाचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या समोर सायली एकटक त्याच्याकडे डोळे वटारून बघत होती.
“सायली !! सायली नाव ना तुझं??” सुहासने विचारलं.
“नाही !! “
“मग कोण आहेस तु?? सायली अस नाही करायचं !! उठ पटकन !! हे बघ कोण आलंय !! बाबा आलेत ना !! उठ बर !!”
सायली रागाने सुहासकडे पाहू लागली. ती वाऱ्याच्या वेगाने धावत आली आणि पहाता पहाता खिडकीचा दरवाजा जोरात आदळून पुन्हा तिथे जाऊन बसली. सुहासला हाताला जोरात मार बसला. त्यामध्ये तो मागे फेकला गेला.
“सुहास !! सांभाळून !!” श्रीधर धावतच त्याला सावरायला आला.
सुहासने स्वतःला सावरलं. तो पुन्हा पळत दरवाजा जवळ गेला. आणि मोठ्याने म्हणाला.
“श्रीधर ,श्याम ! जोरात ढकला तो दरवाजा !!”
असे म्हणताच श्रीधर आणि श्याम दोघेही पळत दरवाजाला जाऊन आदळले. दरवाजा जोरात उघडला गेला. पण सुहास तेवढ्यात म्हणाला.
“श्रीधर !! आत नको जाऊस !! “
समोर सर्वांना बघून सायली मोठमोठ्याने रडायला लागली. जगताप तेवढ्यात शुध्दीवर आला. सायलीच रडणं ऐकून प्रिया धावत तिच्याकडे जाऊ लागली. पण सुहासने श्रीधरला तिला आत जाऊ देऊ नकोस म्हणून सांगितलं.
“कोण आहेस तू ??” सुहासने दरवाजा समोर एक धागा बांधला.
सायली तेवढ्यात मोठ्याने ओरडू लागते. श्रीधरला सुद्धा आता तिची ही अवस्था बघवत नाही.
“कोण आहेस तू सांग !! नाहीतर बघ !! तुझ काही खर नाही !! तुला बांधून विहिरीत टाकून देईन !!”
सुहास असे म्हणताच सायलीच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली.
“मला वाचवा !! मला वाचवा !!” मध्येच जगताप अंगात अवसान आणून बोलू लागला.
“मला चटके देतो ना !! आता मी नाही तुला सोडणार !! आई हा माणूस खूप वाईट आहे ग !! ” अचानक सायली मुलाच्या आवाजात बोलू लागली.
“कोणी त्रास दिला तुला ?? कोणी त्रास दिला सांग !! नाहीतर आम्ही तुला पकडून ठेवू !!”
सुहासच्या या वाक्याने सायली चवताळून त्याच्या बाजूने धावली. पण त्या धाग्या जवळ येताच जोरात मागे फेकली गेली.
“श्रीधर !! पटकन इकडे ये !! मला सांग तू येताना म्हणालास की यापूर्वी तुला खूप वेळा एक मुल या बंगल्यात फिरताना दिसत होत. एक गोष्ट कोणती तरी अशी असेल की त्याने तो उदास होत असेल, इथून पळून जात असेल किंवा कोणाचं नाव घेतल्याने सगळं ऐकत असेल !! आठव ती कोणती गोष्ट !! कदाचित त्यामुळे तो सायलीला सोडून जाईल !! “
श्रीधर आल्यापासून सगळं काही आठवू लागला. त्याची आणि त्या मुलाची पहिली भेट. मायाची आणि त्याची भेट त्यांच्यातील बोलणं सगळं काही तो आठवू लागला. कित्येक वेळ तो विचार करू लागला. आणि अचानक मोठ्याने ओरडला.
“हो ! त्याच्या आईबद्दल बोललो की तो निघून जायचा !!”
“गुड !! गुड ! !” सुहास पुन्हा दरवाजात आला. आणि मोठ्याने म्हणाला.
“आई कुठे आहे रे तुझी ?? हे बघ पाळण्यावर बसली आहे !!”
सुहासच्या बोलण्याने सायली अचानक उदास झाली आणि पहाता पहाता बेशुद्ध पडली. प्रतीक तिथून निघून गेला. सगळे धागा ओलांडून आत आले. प्रियाने सायलीला उचलून कित्येक मुके घेतले. सगळे तिला बाहेर घेऊन आले. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्या वेळाने नंतर सायली शुध्दीवर आली.
“आई !! काय झालं आई ??”
“काही नाही बाळा !! ” प्रिया रडत म्हणाली. नंदा प्रियाला सावरू लागली.
“आई , प्रतीक कुठ आहे ??”
सायलीच्या या प्रश्नाने सगळे चकित झाले.
“तुला कोणी सांगितलं प्रतीकबद्दल ??” श्याम मध्येच बोलला.
“तो येतो माझ्यासोबत खेळायला ! !! काल रात्री पण आला होता. थोडा वेळ खेळला मग मला झोप लागली आणि मी झोपी गेले तेव्हा कुठे गेला माहीत नाही !!”
सुहासला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या.
“तो ना !! आईला भेटायला गेलाय ! येईल हा थोडया वेळात !! सुहास तिला म्हणाला.
“म्हणजे येईल लगेच !! मलापण नेहमी म्हणतो !! थांब आलोच आईला भेटून लगेच !! हे बघ आलाच !!”
सायलीच्या या वाक्याने सगळे चकित झाले. सुहास लगेच बोलला.
“सगळे मागे व्हा !!सगळे मागे व्हा !! “
सायली दरवाजाकडे पाहून मोठ्याने हसू लागली. हसता हसता अचानक तिचा चेहऱ्यावरचा रंग बदलला. अचानक तिचं वागणं बदललं. मोठ्याने ओरडत ती वरच्या खोलीत धावत जाऊ लागली.
“बाबा येणारं आहेत !! बाबा येणार आहेत आई !! “
खोलीचा दरवाजा जोरात आदळला. सगळे धावत पुन्हा वर गेले. पाहतात तर सायली पुन्हा त्याच कोपऱ्यात जाऊन उभा राहीली होती. तिला अस पाहून नंदा , प्रिया सगळेच रडू लागले. सुहास मात्र भानावर येत श्रीधरला खाली घेऊन जात म्हणू लागला.
“श्रीधर, प्रतीकचे बाबा म्हणजे , मंदार केळकरला आपल्याला शोधायला हवं!! “
मंदारच नाव घेताच अंगणातला झोपाळा जोरजोरात हलू लागला. श्रीधर आणि सुहास धावत तिकडे गेले. समोर पाहतात तर कोणीच नव्हतं.
“तुला माया इथेच दिसली होती ना ??”
“हो इथेच !! म्हणजे माया आजही इथेच आहे !! कदाचित तिची डेड बॉडी इथेच कुठेतरी असायला हवी !! “
“म्हणजे ??”
“म्हणजे त्या देशमुखाने त्यांना इथेच कुठेतरी पुरून टाकलंय !! आणि आपल्याला ते शोधायला हवं !! पण तरीही मला हे सगळं अधुर अधूर वाटतंय !!” सुहास एवढं बोलून क्षणभर शांत राहिला. आणि पुन्हा बोलू लागला,
“माया आणि प्रतीक यांना जोडणार कारण म्हणजे आई- मुलाच प्रेम !! आणि म्हणून आईला जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत प्रतीक इथेच राहणार !! “
“एकदा बोलता बोलता ती म्हणाली होती, मी आहे म्हणून तो इथे आहे , नाहीतर केव्हाच निघून गेला असता तो !! याचा अर्थ आईच्या सुखात मुलाचं सुख आहे म्हणून आईला झालेला त्रास त्यालाही होतोय !!” श्रीधर बोलतं बोलतं शांत झाला.
“देशमुखला आपल्याला इथ आणायला हवं !! ” सुहास मध्येच बोलला.
“काहीतरी काय !! आणि असही तो भाडकाव एवढा डोक्यात बसलाय की समोर आला तर मीच त्याला कुत्र्यासारखा मारेल !!” श्रीधर रागाने म्हणाला.
“नाही श्रीधर !! त्याला शिक्षा तू किंवा मी नाही !! तर माया आणि प्रिया दोघी मिळून देतील !! पण त्या आधी आपल्याला मंदार केळकरला शोधावं लागेल !!”
“पण कसं ??”श्रीधर प्रश्नार्थक मुद्रेने सुहासकडे पाहत म्हणाला.
“तेच तर आपल्याला शोधायचं आहे !!”
श्रीधर आणि सुहास बोलतं असताना धावत श्याम येतो आणि भीत भीत म्हणतो.
“साहेब !! सायली !!”
“काय झालं सायलीला ?? काय झालं ??” श्रीधर पुढे धावत जात म्हणाला.
तिघेही खिडकी जवळ आले. पाहतात तर सायली जगतापच्या दुसऱ्या हातावर हातोडा जोरजोरात मारत होती. जगताप मोठमोठ्याने ओरडत होता. सुहास पुन्हा खोलीच्या दरवाजा जवळ आला. त्याने एक धागा बांधला आणि श्रीधर आणि श्यामला दरवाजा तोडायला लावला.
“ये प्रतीक !! सोड !! सोड त्याला !! त्याने काय केलंय तुला ??”
“चटके दिली मला ! चटके!! ” सायली विचित्र हसली.
“हे बघ आई चालली तुझी निघून, पाळण्यावर रुसून बसली! ! ” असे म्हणताच सायली धावतच सुहासच्या अंगावर आली. धाग्या जवळ अडखळली. आणि विचित्र बोलू लागली.
“खोटं बोलतो तू ! माझी आई नाही माझ्यावर रुसत !! “
“अस !! मग जा बघून तरी ये !! तोपर्यंत सायली थांबेन इथेच !!”
सायली शांत झाली. सुहास हळूच सायलीला उचलून बाहेर आला. सायली पुन्हा बेशुद्ध पडली. प्रियाने तिला पुन्हा शुध्दीवर आणलं.
“आई !! प्रतीक कुठ आहे ??” सायली सतत प्रतीकच नाव घेत होती.
“येईल तो !! तूं शांत बस !!”
“कसं शांत बसू आई ! माझा बेस्ट फ्रेंड आहे तो !! मला म्हणाला दोन दिवसांनी आपण त्या मागच्या बागेत खेळायला जाऊ !! आणि तिथं खेळतच बसू !! खेळतच बसू !! खेळतच बसू !!” सायली विचित्र हसत म्हणाली.
सुहासचे कान लगेच टवकारले. त्याने लगेच मोबाईलमध्ये कॅलेंडर पाहिलं.
“ओ नो !! ओ नो !! श्रीधर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ! वेळ खूप कमी आहे !! चला माझ्या सोबत चला !! मला आता सगळं कळलय की नेमक इथे काय घडतंय !! “
सगळे हॉलमध्ये जमा झाले. नंदा ,श्याम , सुहास ,प्रिया आणि श्रीधर सगळे आले. सायली रात्रभर जागल्यामुळे प्रियाच्या खांद्यावर तेव्हा झोपी गेली होती.
“श्रीधर ! इथ जे घडलं त्या इतिहासामध्ये आज आहे अस समज !! मायावर झालेल्या अत्याचारामुळे तिची आत्मा आजही त्याचा बदला घेण्यासाठी या बंगल्यात वावरते हे आता नाकारून चालणार नाही , आणि त्या सोबतच आपल्याला मंदार केळकरचा शोध घ्यावा लागणार आहे !! कारण प्रतीकचा जीव त्या बापात आहे आणि मायाला वाटत की मंदारने तिला विकली स्वतःच्या करिअरसाठी, त्यामुळे एकीकडे आईचा बापाबद्दल राग ! आणि दुसरीकडे मुलाचं बापावर असलेलं प्रेम !!हे सगळं एकमेकांना गुंतून ठेवतेय,पण या सगळ्यात एक माणूस असा येतो जे हे सगळं उध्वस्त करतो आणि आपल्याला काहीही करून त्या माणसाला म्हणजे देशमुखला इथे या बंगल्यात आणावं लागणार हे खर आहे !! आणि तेही दोन दिवसाच्या आत! कारण तुला माहितेय दोन दिवसांनी काय आहे ??”
“काय ??” श्रीधर कुतूहलाने विचारू लागला.
“चंद्रग्रहण !! आणि त्याच रात्री या दोन्ही प्रेतात्मा पुन्हा तिथेच जातील जिथे शेवटी त्या जाऊन थांबल्या!! आणि जाण्यापूर्वी आपला बदला पूर्ण करूनच त्या जातील आणि जर अस नाही झालं तर पुन्हा कित्येक लोकांचे बळी जातील या मायलेकराच्या क्रोधात, अशावेळी जर सायलीच्या अंगात प्रतीकच भूत राहील तर कदाचित त्यावेळी ते सायलीवर पूर्ण ताबा घेईल !! आणि सायलीला वाचवणं अवघड होईल !! “
“म्हणजे ?? तुला म्हणायचं काय आहे सुहास ??” श्रीधर प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.
“म्हणजे !सायलीचा जीव धोक्यात आहे श्रीधर !!”
“काय ??” हे ऐकतच प्रिया रडू लागली. सायली झोपेतुन उठेल म्हणून आपला हुंदका रोखु लागली.
“काहीही काय सुहास !! मी नाही मानत असलं काही !!”
“मग तुझ्या समोर जे घडतंय ते सगळं खोटं आहे अस तुला म्हणायचं आहे !!”
“हो !! कदाचित सायलीला ह्या असल्या भाकड कथा कोणीतरी सांगितल्या असतील आणि म्हणूनच सायली असलं ऐकून वेड्यासारखं करायली आहे. मी तीला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. मोठ्या सायकायट्रिष्टकडे घेऊन जाईल !! काही नाही होणार माझ्या सायलीला !!”
सुहास पुढे झाला. श्रीधरला सावरत म्हणाला.
“दुसरा कोणताच पर्याय नाहीये श्रीधर ! डॉक्टर, वैगेरे वैगेरे याच्या पलीकडे गेलं आहे हे सगळं आता !!”
“मग मी काय करू आता !! काय करू !!” श्रीधर हतबल होऊन खाली बसला.
श्याम आणि सुहास श्रीधरच्या जवळ बसले. नंदा आणि प्रिया सायलीला घेऊन किचन मध्ये गेल्या. खूप वेळ विचार केल्यावर श्रीधर उठला. आणि म्हणाला. “बसून चालणार नाही. आपल्याकडे फक्त दोन दिवस आहेत. आपल्याला आता सर्वात पहिले मंदार केळकरच काय झालं याचा शोध लावायला हवा !! त्याने खरंच मायाला त्या नीच माणसाच्या हवाली केलंय का तेही पहावं लागेल, आणि त्यासाठी आधी मला ऑफिसमध्ये जाव लागेल. ऑफिस फाईल मधुन मला त्याची माहिती काढायला हवी. शेवटी त्याच काय झालं ते शोधावं लागेल !!”
“पण नक्की तू करणार तरी काय आहेस ??”
“आपल्याला जाळ टाकावं लागणार !! त्या नीच माणसासाठी !!”
“नक्की काय करायचं ते तरी सांगा साहेब ??”श्याम मध्येच बोलला.
“आधी आपण सगळे !! काही घडलच नाही अस वागुयात !! मी आता नेहमी प्रमाणे ऑफीसला जातो!! तोपर्यंत इथली काळजी तुम्हां दोघांना घ्यावी लागेल !! “
“ठीक आहे !! मीही या बंगल्याच्या आवारात नेमक मायाचं प्रेत कुठे पुरल असेल याचा अंदाज घेतो!! कारण त्याच रात्री आपल्याला ते उरलेले प्रेताचे अवशेष जाळावे लागतील. त्याशिवाय त्यांना संपूर्ण मुक्ति मिळणार नाही. “
“ठीक !! आणि श्याम तू घरात काळजी घेशील ना ??”
“होय साहेब !! नक्की !! “
“चला मग !! लागुयात कामाला !!”
तिघेही आपल्या कामाला लागले. प्रिया आणि नंदाला विश्वासात घेऊन सांगितलं. नंतर श्रीधर टापटीप आवरून बंगल्याच्या बाहेर पडला. त्याला बाहेर तेव्हा लपून बसलेल्या देशमुख साहेबान पाहिलं. त्याच्या मनात विचार आले,
“हा एवढा आवरून निघतोय म्हणजे !! इथे तर काही नाही झालं !! म्हणजे दत्तू नक्की कुठतरी दारू ढोसून पडला असणार!! आता घरी जाऊ का ?? पण नको !! तो कोणीतरी एक माणूस आलाय की घरी !! ती प्रिया थोडीच एकटी असणार !! त्यापेक्षा ऑफिस मध्ये जातो म्हणजे या बावळट श्रीधरला माझा संशय येणार नाही !! “
लांबून बंगल्यात डोकावून बघण्याचा प्रयत्न करणारा देशमुख गाडी फिरवून पुन्हा ऑफिस मध्ये जातो. काहीच नाही घडलं या आविर्भावात वागतो. थोड्या वेळाने श्रीधर येताना त्याला दिसला. आपलं त्याच्याकडे लक्ष नाही असे तो पाहू लागला.
“गुड मोर्निग साहेब!!”
“गुड मॉर्निंग !! ” देशमुख तुटक बोलला.
“आज सकाळपासून जगतापांचा फोन लावतोय लागत नाहीये !! “
देशमुख चपापला आणि सावरत म्हणाला.
“मीही लावतोय पण कुठे गेलाय कोणास माहीत !! काही काम होत का ??”
“ऑफिसबद्दलच काम होत !”
“मला तरी काही भेटला नाही ! भेटला किंवा कॉल आला तर नक्की सांगतो तुला कॉल करायला !!”
“धन्यवाद साहेब ! नक्की सांगा !!”
श्रीधर आपल्या केबिनमध्ये जाऊ लागला. त्याला जाताना पाहून देशमुख मनातल्या मनात हसला. कित्येक विचार करत बसला.
“म्हणजे त्या प्रियाने याला काहीच सांगितलं नाही तर!! मला वाटलं होत येतंय मला मारायला !! पण नाही आल!! असुदे मला बरंच झालं !! म्हणजे आता मला रान मोकळं झालं !! आज नाही तर उद्या ती प्रिया येईलच माझ्या मिठीत !! सोडतो का काय तिला !!!” देशमुख गालातल्या गालात हसला.