कथा भाग ६ || सत्य ||
श्रीधर एकटाच त्यानंतर हॉलमध्ये शांत बसून होता. त्याच्या मनात कित्येक विचाराचं काहूर माजलं होत.
“आजपर्यंत सर्वांशी चांगलं वागुनही शेवटी ती माया मला वाईट का म्हणाली असेल !! तिलाही माझ्यात ती वासनेची नजर दिसली असेल तर यात माझी काय चूक !! मी आजपर्यंत कधीही माझ्या प्रिया शिवाय कोणत्याच स्त्रीकडे नजर वरही करून पाहिलं नाही !! पण ती काही म्हणो !! आता प्रश्न आहे माझ्या पत्नीचा !! जिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तो त्या नीच देशमुखला धडा शिकवायला हवा !! त्याला धडा शिकवायला हवाच !! माझ्या तावडी सापडला तर सोडणार नाही मी त्याला !! पण मी एक गोष्ट विसरतो आहे !! माया !!” अचानक श्रीधर भानावर आला तो थेट किचन मध्ये गेला. तिथे नंदा आणि प्रिया बोलतं बसल्या होत्या.
“नंदा !! ही माया कोण आहे ??”
अचानक श्रीधरने प्रश्न केल्याने नंदा गोंधळून गेली. तेवढ्यात मागून श्याम आला.
“साहेब ! मी सांगतो माया कोण ते !!”
श्रीधर मागे वळून पाहू लागला.
“तू !! “
“होय साहेब मी !! कारण मी तेव्हा इथेच बंगल्यात असायचो !!”
“इथेच ?? काय घडलं होत श्याम !! सांग लवकर !! “
“साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी तुमच्या सारखेच एक साहेब होते, मंदार केळकर नाव होत त्यांचं. असेच ते इथे मुंबईवरून बदली होऊन आले होते. त्यावेळी माझा बाप इथे नोकर होता. पहिले काही दिवस केळकर साहेब एकटेच होते. पुन्हा त्यांची बायको आणि एक मुलगा दोघेही इथे राहायला आले. पुढे त्या मुलाशी म्हणजे प्रतीकशी माझी चांगली मैत्री जमली. आम्ही नेहमी एकत्र असायचो. त्याच त्याच्या आई बाबांवर खूप प्रेम होत. पण एक दिवस नजर लागली या कुटुंबाला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं साहेब. त्या रात्री जे घडलं त्यानंतर माझा बाप पुन्हा कधी हसलाच नाही. पण मरताना त्याच मन कोणती गोष्ट खात होत ते सांगून गेला. या बंगला नंबर २२च खर रूप सांगून गेला साहेब. “
“काय घडलं होत त्या रात्री !! सांग श्याम ! काय घडलं होत !!”
“त्या रात्री मंदार केळकर यांची बायको माया आणि त्यांचा मुलगा प्रतीक दोघे एकटेच घरी होते. हा देशमुख साहेब त्या दिवशी सुद्धा असाच लांडग्या सारखा आला होता. मायाने त्याचा खूप विरोध. तेव्हाही माझी आई मध्ये आली आणि तीने मायाला याच्यापासून वाचवलं. मंदार केळकरांना हे कळलं आणि तेही अशेच रागात निघून गेले देशमुखला जाब विचारण्यासाठी. ते निघून गेले ते आजपर्यंत पुन्हा आलेच नाहीत. त्यांचं काय झालं ते कुठे आहेत ?? जिवंत आहेत की नाही कोणाला काही माहीत नाही. “
“कोणीच त्यांचा शोध घेतला नाही ?? मायाने सुद्धा नाही ??”
“शोध घ्यायला ती या जगात तर राहायला हवी ना ? “
“म्हणजे पुन्हा भूत ??”
“साहेब माहितेय मला तुम्ही भुताला नाहीत मानत !! पण आता तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा साहेब !! कारण !! तुम्हाला अडवून मायाने कदाचित तुमचा प्राण वाचवला आहे साहेब !! तुमचं अख्ख कुटूब” उध्वस्त होण्यापासून वाचवल आहे तिने.
“म्हणजे ??”
“म्हणजे साहेब जेव्हा केळकर साहेब रागाने निघून गेले त्यानंतर देशमुख साहेब पुन्हा थोडया वेळाने आला. त्याच्या सोबत तेव्हा जगताप पण होता. यावेळी मात्र मायाला वाचवणार कोणीच नव्हतं. माझी आई थोडया वेळासाठी घरी गेली. तेंव्हा बंगल्यात माया एकटीच आहे हे पाहून. देशमुख पुन्हा घरी आला. यावेळी मात्र मायाने दरवाजा उघडला नाही विरोध केला. पण यावेळी देशमुख सोबत जगताप ही होता. दोघांनी ताकदीने दरवाजा तोडला. आत आले. माया समोरच उभी होती. ती खोलीत गेली. दरवाजा लाऊन घेतला. पण त्यांनी हाही दरवाजा तोडला. दोघे आत गेले. तेव्हा प्रतीक धावत धावत आईकडे गेला. पण जगताप त्याला फरपटत वरच्या खोलीत घेऊन गेला. खोलीचा दरवाजा बंद करून त्याने खोलीला आग लावली. प्रतीक त्या आगीत होरपळून निघत होता. मोठ्यामोठ्याने आई बाबांना आवाज देत होता. माया देशमुखच्या तावडीतून सुटून वर पळाली. पण जगतापने तिला पुन्हा ओढत ओढत खाली खेचून आणलं. कित्येक वेळ प्रतीक ओरडत राहिला. जीवाच्या आकांताने ओरडू लागला. शेवटी त्याचा आवाज बंद झाला. ती खोली पूर्ण पेटून उठली होती. आगीचे तांडव माजले होते. ” श्याम मनातलं सगळ सांगत होता.
“पुढे काय झालं !! काय झालं सांग श्याम !!” श्रीधर त्याला विचारू लागला.
“
“पुढे काय होणार होत साहेब !! त्या नराधमांनी मायावर बलात्कार केला. ती खूप विरोध करत होती साहेब विनवण्या करत होती.
“देशमुख साहेब तुमच्या मी पाया पडते पण मला जाऊ द्या !! ” ती ओरडत होती.
“कसा जाऊ देऊ तुला !! तुझ्या नवऱ्याकडून खरेदी केलय तुला मी !! पैसा फेकला त्याच्या तोंडावर गेला तो निघून ” देशमुख मोठ्याने ओरडला. पुन्हा तिच्या शरीराचा उपभोग त्या दोघांनी घेतला. आपली वासना पूर्ण केली. जाताना तिच्या शरीरावर कित्येक वार केले. तिला जखमी केलं. आणि निघून गेले. पण आईची माया वेडीच असते ना साहेब !! माया लगेच वर प्रतीक जवळ धावत गेली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही साहेब प्रतीक तेव्हा आगीत जळून राख झाला होता. माया त्याच्या जळालेल्या शरीराला कित्येक वेळ बघत बसली. “
“पुन्हा काय झालं श्याम !! माया कुठे गेली ??” मध्येच प्रिया त्याला विचारते.
“माया रागारागात उठली !! समोरच्या खोलीत गेली. पंख्याला दोरी बांधून ती कित्येक वेळ उभा राहिली. मरणाच्या आधी मोठमोठ्याने ओरडत होती. सगळे पुरुष शेवटी सारखेच !! त्या माझ्या नवऱ्याने मला विकली!! एवढ्याश्या पैशासाठी विकली !! अरे थू रे !! तुला नवरा म्हणून तरी कशी घेऊ !! त्या लांडग्यांनी लचके तोडले रे माझे !! तुझ्या बायकोची इज्जत लुटली त्यांनी !! पण नाही !! मी सोडणार नाही !! मी तुम्हाला सोडणार नाही !! मी बदला घेणार !! काहीही झालं तरी मी बदला घेणार !! मी कोणाला सोडणार नाही !! ” श्याम समोर खोलीकडे हात करत म्हणाला.
“मग ??” श्रीधर मध्येच बोलला.
“याच खोलीत तीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं !!”
क्षणभर श्याम शांत बसला आणि पुन्हा बोलला,
“आणि हे सगळं घडत असताना माझा बाप इथेच या किचन मध्ये होता. ज्याची कल्पना त्या दोघांना ही नव्हती. आपण एका स्त्रीची इज्जत ,तिचे प्राण वाचवू शकलो नाही, आपण विरोध करू शकलो नाही , या विचारानी माझा बाप मनातून रोज मरत होता. “
पुन्हा कित्येक वेळ सगळेच शांत बसले. कोणी काहीच बोललं नाही. नंदा आणि श्याम एकमेकांकडे पाहत होते. थोड्या वेळाने नंदा प्रियाला म्हणाली.
“ताईसाहेब तुम्ही नका राहू इथ !! लवकरात लवकर मुंबईला जा !! काही झालंच नाही अस समजून विसरून जा !!”
“विसरून जाऊ ?? कोणीतरी माझ्या बायकोवर वाकडी नजर ठेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी गप्प बसू ?? मग माझ्यात आणि मंदार केळकर मध्ये फरक काय ??” श्रीधर रागात म्हणाला.
“मग काय करायचं ठरवलंय तूम्ही साहेब ?? ” श्याम म्हणाला.
“माहीत नाही !! पण आता खरच वाटतंय की मायाला न्याय मिळायला हवा. ” श्रीधर आपल्या जागेवरून उठून उभा राहिला.
त्याच्या मनात विचाराचं काहूर माजलं.
एवढं सगळं घडूनही. देशमुख साहेब मात्र अजूनही बैचेन होता. आपल्या ऑफिस मध्ये त्या रात्री एकटाच बसून होता. सारखं तो जगतापला विचारत होता.
“काय रे जगताप ?? आला का तो श्रीधर ??”
“नाही ना अजून !! मीपण केव्हाची वाट पाहतोय !!”
“बायको सोबत एवढं सगळं घडलं आणि हे अजून गप्प कसकाय जगताप ??मर्द आहे ना तो ??”
“आता आहे का नाही ते आपण गेल्यावर त्याच्या बायकोला विचारू!! काय ??”
जगताप असं बोलताच दोघेही मोठमोठ्याने हसू लागले.
“अरे पण ते नाही आल तर सगळी मेहनत फुकट जाईल ना !!”
“साहेब बाहेरून बघून येऊ का ??”
“हा जा जा !!” देशमुख साहेब मध्येच म्हणाला.
जगताप गाडी घेऊन बंगल्याकडे निघाला. थोड्या वेळाने बंगला समोर येऊन त्याने गाडी लावली. समोर पाहतो तर बंगला एकदम शांत होता. बंगल्यात पूर्ण अंधार पसरला होता. कुतूहलाने त्याने बंगल्यात प्रवेश केला. दबक्या पावलांनी तो आत जाऊ लागला. तेवढ्यात झोपाळा जोरजोरात हळू लागला.
“जगताप !! ” कोणीतरी मोठ्याने त्याला हाक मारली.
आवाजाच्या दिशेने तो चालत चालत पुढे जाऊ लागला. पुन्हा त्याला हॉलमधून हाक मारल्याचा आवाज आला.
“ये !! कोण आहे रे ?? लई माज आलाय का ?? समोर ये भाडकाव !” जगताप असे म्हणताच झोपाळ्यावर त्याला माया दिसली.
“ये जगताप !! आज मात्र तुला मी सोडणार नाही !! “
मायाला पाहून जगताप मोठमोठ्याने हसू लागला.
“कोण मारणार तू ?? अठरा वर्ष झाली !! किती अठरा !! काय बिघडवलस आमचं ??”
माया त्याच्याकडे फक्त रागाने बघू लागली.
“तू साली रांड आमचं काय वाकडं करणार !! ” असे जगताप म्हणताच वरच्या खोलीतून सायली धावतच खाली आली. जणू तिच्या अंगात शंभर हत्तीच बळ आल होत. जगतापला ती फरफटत वरच्या खोलीत घेऊन जाऊ लागली. तीच हे रूप पाहून लपून बसलेले सगळे बाहेर आले. श्रीधर तर आवाक होऊन पाहू लागला.
“सोडणार नाही मी तुला !मला चटके दिले ना तू ! सोडणार नाही मी तुला आता !! थांब माझे बाबा येऊ दे मग बघ काय करतो ते !! ” सायली विचित्र आवाज काढत बोलू लागली.
“साहेब !! सायलीमध्ये प्रतीकच भूत आहे साहेब !!” श्याम सगळ्यांना मागे करत म्हणाला.
“काहीही काय बोलतो श्याम !! ” प्रिया रडत म्हणाली.
“होय ताईसाहेब !! ती काय म्हणाली ऐकलं नाही का तुम्ही ??”
“मला चटके दिले ना तू !! सोडणार नाही मी तुला !!” अस म्हणाली ती !! ” नंदा बोलली.
“उगाच आपण या जगतापला आपल्या प्लॅन मध्ये फसवल !! ” प्रिया रडत म्हणाली.
“थांब प्रिया आता रडून नाही तर हुशारीने काम करावं लागेल !! “
“काय करायचं आपण बोल ना !! ” प्रिया काळजीने बोलू लागली.
श्रीधर बंगल्यातून बाहेर पडला. त्याने आपल्या जवळच्या दोन चार मित्रांना फोन लावला. त्यानंतर त्याने विकासला फोन लावला. घडत असलेले सगळे प्रकार त्याने त्याला सांगितले.
“हे बघ श्रीधर !! माझं मेडिकल फील्ड भूत प्रेत किंवा तत्सम गोष्टींना मान्यताच देत नाही. पण तू म्हणतोय ते जर खर असेल तर माझा एक मित्र आहे. सुहास जाधव. पॅरानॉर्मल इन्वेस्टीगॆटर आहे. हे अश्या भूत प्रेत गोष्टींवर त्याच संशोधन चालू असतं. लकीली सध्या तो पण पुण्यातच आहे ! मी नंबर पाठवतो तुला !! काय म्हणतोय ते बघ मग !!”
“हो चालेल ना ! पाठव ना ! मी करतो फोन त्याला !! हवं तर बंगल्यावर बोलूनच घेतो !!”
“हे सगळं ऐकल्यावर धावत येईल तो !!” विकास हसत म्हणाला.
“ओके !! चालेल!! “
“आणि काळजी घे श्रीधर !! हे सगळं सांगितल्या पासून काळजी वाटायली तुझी रे !! “
“काळजी नको करू !! मी करतो सगळं ठीक ” श्रीधर फोन ठेवत म्हणाला.
फोन ठेवताच त्याला बंगल्यातून मोठा आवाज झाला. तो धावतच आत गेला. पाहतो तर जगतापला घेऊन सायली खोलीत गेली होती. जगताप समोर उभा होता. नकळत तो भिंतीवर आदळला गेला. सायलीला रागाने मारायला पुढे येणार तेवढ्यात सायलीने त्याचा हात मुरगळला. जगताप मोठ्याने ओरडू लागला. पाहता पाहता सायलीने हात मोडला.
“मला चटके देतो तू !! थांब बाबा येऊ दे मग दाखवतो तुला !!”
अचानक सायली भानावर आली. जगतापला समोर बघून रडू लागली. खोलीच्या खिडकीतून प्रिया ,नंदा ,श्याम पाहत होते.
“आई !! ” सायली प्रियाला पाहून तिच्याकडे धावली.
जगतापने जोरात धावत जाऊन तिला एका हाताने पकडलं. खेचत तिला दरवाज्याकडे घेऊन जाऊ लागला.
“खबरदार मला कोणी काही केलं तर !! सगळ्यांनी मिळून मला मारायचा प्लॅन केलाय ना ?? आता मी सोडत नाही !! गेली ही पोरगी आता.!! लई माज आलाय ना तुला !! मालकाला नाही म्हणाली ना !! थांब आता तू !!” जगताप रागात प्रियाकडे पाहत म्हणाला.
जवळच असलेला हातोडा घेऊन सायलीच्या जवळ जाऊ लागला. त्याला सायली जवळ जाताना पाहून प्रिया जोरजोरात ओरडू लागली. श्रीधर धावत आला. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागला. पण काही केल्या दरवाजा उघडला जात नव्हता.
“हे घे तुझ्या पोरीला मारलं !! ” जगताप हातोडा सायलीच्या डोक्यावर फिरवत म्हणाला.
अचानक सायलीच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. क्षणात जागेवर उभी राहिली. जगताप हातोडा मारणार तोच तीने तो हातात घट्ट पकडला. जगताप हातोडा सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण एवढ्याश्या पोरीच्या हातून त्याला तो काढणं शक्य होत नव्हतं. दुसऱ्या क्षणाला सायलीने तो हातोडा सपासप जगतापच्या दुसऱ्या हातावर मारला. हातातून रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या . जगताप मोठ्याने ओरडू लागला.
“ये !! कोण आहेस तू ?? “
“काका !! मला ओळखलं नाही तुम्ही !! मी तुमचा लाडका प्रतीक ??” विचित्र आवाजात सायली बोलतं होती.
“प्रतीक ?? म्हणजे म्हणजे त्या रांडेचा पोरगा तू ??”
“कोण कोण ! माझी आई !ती माझ्यापासुन रुसलिये ना ! तिथे खाली बसली हॉलमध्ये !! नाहीतर मग त्या झोपाळ्यावर असेल ती ! !! किती बोलवलं मी पण येतच नाही ती वर!!”
“ये लांब हो माझ्यापासून ! ये लांब हो !!” जगताप मागे सरकत सरकत बोलू लागला. दोन्ही हात मोडल्याने त्याला काहीच करता येईना.
इकडे बाहेर श्यामने आणि श्रीधरने शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना दरवाजा काही केल्या उघडता येईना. तेवढ्यात श्रीधरचा फोन वाजतो. विकासने त्याला सुहास जाधवचा नंबर मेसेज केला होता. श्रीधर पटकन फोन लावतो.
“हे हाय श्रीधर !! ” सुहास फोन उचलताच म्हणाला.
“तुम्ही मला ओळखता??”
“आता जस्ट विकासच आणि माझं बोलणं झालं!! मी उद्या सकाळपर्यंत येतोय तिथे !! तोपर्यंत तुम्ही असं काहीही करू नका ज्याने तुमच्या कोणाच्या जीवावर येईल !! प्लिज श्रीधर !! तुमची केस खूप नाजूक आहे !! “
“हो नक्की !! प्लिज तुम्ही सकाळी जेवढ्या लवकरात लवकर येता येईल तेवढं लवकर या !! माझी मुलगी खूप विचित्र वागते आहे !! तिच्या जिवावर बेतू नये म्हणजे झालं!! तिला काही झालं तर मी जगू नाही शकणार !! “
“काही होणार नाही तिला !! डोन्ट वरी !! “
सुहास सकाळी लवकर पोहचण्यासाठी निघाला. पण बंगल्यातून रात्रभर जगतापच्या ओरडण्याचा आवाज येत होता.
“ये !! कोणीतरी वाचवा की रे मला !! ये !! वाचवा की !!”