बंगला नंबर २२ || कथा भाग ३ || डिनर || मराठी हॉरर गोष्ट ||

भाग ३ || डिनर ||

सकाळी ऑफीसला जायची वेळ होताच. श्याम मेन डोअर बेल वाजवतो श्रीधर धावतच दरवाजा उघडतो. समोर पहातो तर श्याम बरोबर अजून कोणीतरी स्त्री होती. श्रीधर तिच्याकडे पाहतो. पुन्हा श्यामकडे पाहत म्हणतो.

“किती उशीर रे !! आणि ही कोण??”
“ही बायको माझी !! काल ताईसाहेब आल्या ना !! म्हणून आजपासून आली. “
“आजपासून म्हणजे ??”
“अहो कामाला !!”
“आता हे कधी ठरलं ??”
“जगतापना माहीत होत !! त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला?? दोन दिवस तुम्ही एकटेच होतात म्हणून मी एकटाच येत होतो !! “
“तू ये आत !! तुला सांगतो !! सगळं लपवून ठेवतो माझ्यापासून !” श्रीधर श्यामकडे पाहत म्हणाला.
“आता काय लपवलं मी ??”
“तू जा हा आत !!” श्यामच्या बायकोकडे पहात श्रीधर म्हणाला.
ती आत निघून जाताच. श्रीधर श्यामला म्हणाला.
“माझी बायको इथे आली आहे हे का सांगितलं नाहीस मला ??”
“ते होय !! ते त्यांचं काहीतरी प्राइज होत ना म्हणून !!”
“बरं !! ठीक आहे !!”
श्रीधर श्यामकडे पाहत आत निघून गेला.

श्यामची बायको हळूच किचन मध्ये जाते. प्रिया तिथे काहीतरी करत होती. तिला पाहून ती लगेच म्हणाली.
“ताईसाहेब !! द्या इकडे !! तुम्ही कशाला करताय !! मी आले ना !!”
” हो !! पण तू आहेस तरी कोण ??”
“मी श्यामची बायको !! नंदा !!”
“अच्छा !! श्यामची बायको का !! आणि तो कुठे मग ??”
“आहे ना !! आलाय !! साहेबांन सोबत काहीतरी गुपचूप बडबड चालू आहे !!”
“आ !! गुपचूप !” प्रिया आश्चर्याने पाहत म्हणाली.

तेवढ्यात मागून श्रीधर येतो. प्रियाकडे पाहत म्हणतो.
“पटकन जेवायला द्या !! म्हणजे मी ऑफीसला निघतो !! परत तुमचं काय चालू राहू द्या गप्पा!!”
“आमच्या गप्पा ?? आणि मग तुमच्या काय चालू होत्या बाहेर गुपचूप ??”
“गुपचूप ?? “
“हो !!”
“कुठं काय ?? काही नाही !! असच जरा श्यामकडून माहिती घेत होतो.!! इथे कुठे जवळ फिरायला बाग आहे का ?? मॉल आहे का ??”
“व्हा !! मग आहे का ??”
“हो आहे ना !! इथून जवळच एक मॉल आहे !! संध्याकाळी आपण तिथेच जाऊयात फिरायला !! आणि येताना मस्त डिनर पण करून येऊयात !!”
“अरे व्हा !! कधी नव्हें ते डिनर!! “
“हो !! ” श्रीधर प्रियाकडे मिश्किल हसत म्हणाला.

नंदा या गडबडीत स्वयंपाक करत होती. पोळ्या झाल्या की तीने प्रियाला सांगितलं. प्रियाने पटपट श्रीधरला जेवायला वाढलं. श्रीधर जेवण करून ऑफिसला निघाला. जाताना प्रियाला संध्याकाळी लवकर आवरून ठेवायला सांगितलं. समोर जगताप गाडी घेऊन तयारच होते.

“काय जगताप !! आपण केव्हा येऊन थांबलात !! “
“हे काय आताच आलोय !!”
“मला उशीर नाहीना झाला??”
“नाही नाही!! “
श्रीधर आणि जगताप गप्पा मारत ऑफिस मध्ये पोहचले. घरी प्रिया नंदा सोबत गप्पा मारत घर आवरू लागली.

“ताईसाहेब संध्याकाळी तेवढं लवकर जाईल बघा मी !! “
“का ग ??”
“तस काही नाही !! पण पोर वाट बघत बसली असतात म्हणून !!” नंदा थोड चाचरतच म्हणाली.
तेवढयात श्याम किचन बाहेरून बोलला.
“ताईसाहेब वरच्या बेडरूम पण घेऊ का साफ करून ?? “
“हो घे !! आणि सायली झोपली असेल तर जास्त आवाज नकोस करू !! रात्रभर तिला नीट झोप लागली नाहीये !! सारखी दचकून उठत होती !!”
“दचकून ??” श्याम नंदाकडे पाहत म्हणाला.
“होरे !! तिला नवीन जागेत लवकर झोप लागतच नाही !! “

श्याम मान डोलवत निघून गेला. वरच्या सगळ्या बेडरूम पुसून घेऊ लागला. सायलीच्या खोलीत येताच तो मोठ्याने ओरडला. समोर त्याला सायली दिसली. पण अगदी विचित्र रुपात. ती भिंतीकडे तोंड करून कोपऱ्यात उभी होती. श्यामचा आवाज ऐकून नंदा आणि प्रिया दोघेही वर पळत आले.
“काय झालं !! ये झालं काय ??” नंदा श्यामकडे पाहत म्हणाली.
श्यामने नंदाला कोपऱ्यात बोट करून दाखवले. सायली कोपऱ्यात उभी होती. तिला पाहून प्रिया आत आली आणि म्हणाली.
“काय करावं या पोरीला काही कळत नाही !! कधी जाणार हीची झोपेत चालायची सवय कोणास ठाऊक !!”
“सायलीला झोपेत चालायची सवय आहे ??”
” होना नंदा !! मुंबई मध्ये सुद्धा अशीच करते !! म्हणून तर फ्लॅटच्या सगळ्या डोअरला रात्री मी लॉक करून झोपते!! “
“एवढं काय झालं मग ओरडायला !! ” नंदा श्यामवर खेकसत बोलली.

श्याम काहीच न बोलता आपल्या कामाला निघून गेला. प्रियाने सायलीला पुन्हा बेडवर झोपवलं. झोपवताना तिला लक्षात आल.
“सायलीला तर ताप आलाय !! ” नंदाकडे पाहत ती म्हणाली.
“बघू !!” नंदा डोक्यावर हात ठेवत पाहू लागली.
“सायली !! ये सायली बाळ !! उठ आता !!” प्रिया तिला उठवू लागली.

खूप वेळ हाक दिल्यानंतर सायली झोपेतुन जागी झाली. आईकडे पाहून रडू लागली.
“आई !! “
“काही नाही झालं बाळ !मी आहे ना जवळ !!” सायलीला मिठीत घेत प्रिया खोलीतून बाहेर आली.

नंदा तिच्या मागे मागे आली. प्रिया हातात मोबाईल घेत श्रीधरला फोन लावणार तेवढ्यात नंदा म्हणली.
“ताईसाहेब आपल्या मेन रोडला एक दवाखाना आहे तिथे घेऊन जाऊयात का सायलीला ?”
“हो चालेल चल !! ” लावलेला फोन कट करत प्रिया लगबगीने निघाली.

श्रीधर ऑफिस मध्ये आपल्या कामात व्यस्त झाला होता. आज प्रिया इकडे आली यामुळे निर्धास्त होता. आपल्या केबिन मध्ये बसून कामाविषयी चर्चा करत बसला होता.
“बाकी आपल्या प्रॉडक्ट विषयी जेवढे चांगले फीडबॅक येतील ते पाहा !! आणि कस्टमर काही नवीन सुचवत असतील तर त्याचीही नोंद करून घ्या !!”
“आपले हे प्रॉडक्ट सर मार्केटमध्ये सध्या सगळ्यात जास्त विकले जाते !! पण सीईओ साहेबांच्या मते प्रॉफिट म्हणावे तसे मिळत नाही !!” कोणी एक ऑफिसर बोलतं होता.
“मग याविषयी सुद्धा आपल्याला विचार करावाच लागेल नाही का ?? “
” हो नक्की !! “
तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडत जगताप आतमध्ये येतात आणि म्हणतात,
“जोशी साहेब सीईओ साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं आहे !! “
“मला ??”
“हो !!” जगताप एवढं बोलून आपल्या कामाला निघून गेले.
श्रीधर मनात विचार करत केबीनकडे निघाला. कशासाठी बोलावले असेल , का ?? माझं काही चुकलं तर नाहीना !! या विचारात तो केबिन समोर येतो. केबिनमध्ये पाहत येण्याची परवानगी मागतो.

“येस जोशी ! या !! “
“मला बोलावलं ते कळलं ! म्हणून लगेच आलो !! “
“हो मीच बोलावलं आहे !! “
“का साहेब ??काही चुकलं का ??”
“अरे काही चुकलं म्हणून नाही बोलावलं !! तू इकडे आलास ! ऑफिसमध्ये नवीन आलास इथल्या !! म्हणून विचारपूस करावी म्हणून बोलावलं !! “
“ओ !! ऑफिसमध्ये आता जवळ जवळ सगळ्यांशी ओळख झाली माझी !!”
“गुड !! बायको मुलगी आले ना राहायला इथे ??”
“हो !! कालच आले !! “
“यायला काही त्रास नाहीना झाला त्यांना !! “
“नाही साहेब !! ॲक्च्युली ते आलेले मला काल घरी गेल्यावर कळलं !! सरप्राइज दिलं मला त्यांनी !!”
“गुड ! ! आजचा काही प्लॅन मग ?”
“आज संध्याकाळी मॉलमध्ये फिरायला जाव म्हटलं होत !! बंगल्या जवळ आहे म्हणे तिथे !! “
“हो !! आहे जवळ !! मी नेहमी जायचो तिथे !!” देशमुख मध्येच म्हणाले.
“तुम्ही ?? “
“हो !! मी जायचो नेहमी !! बरं ते जाऊदे आज इविनिंगला या मग डिनरला आमच्या घरी सगळे !! तुझ्या बंगल्यापासून अगदी पंधरा मिनिटांवर आहे माझं घर !!”
“आज ??”
“हो !! त्या निमित्ताने घरच्याची सुद्धा ओळख होईल नाही का ??”
श्रीधर थोडा वेळ शांत राहतो आणि म्हणतो.
“ठीक आहे साहेब !! येतो नक्की !! पत्ता मी जगतापांनकडून घेईन !! येऊ मी !! “

केबिन मधुन बाहेर पडत त्याने प्रियाला फोन लावला. तिला संध्याकाळी डिनरला जायचं हे त्याला सांगायचं होत. फोन वाजताच प्रियाने फोन थोडा उशिराच उचलला.
“हॅलो प्रिया !”
“बोलना श्रीधर !”
“कुठे आहेस तू ?? आणि फोन उचलायला एवढा वेळ का लावलास ??”
“अरे मी सायलीला घेऊन इथे जवळ दवाखान्यात आली आहे !!”
“दवाखान्यात ? का काय झालं ?? आणि एकटीच कशी काय गेलीस ??”
“अरे हो हो !! एकटी नाहीये नंदा आहे माझ्या सोबत !! श्यामची बायको !! ” प्रिया श्रीधरला शांत करत म्हणाली.
“झालंय काय पण तिला ?? ” श्रीधरची चिंता वाढू लागली होती.
“थोडा ताप आलाय तिला !! बरं तू का फोन केला होतास ते तरी सांग !!”
“ते मी ! मी हे सांगायला फोन केला होता की आज आपल्याला आमचे कंपनीच्या साहेबांनी डिनरसाठी बोलावलं होत.”
“अश्या परिस्थितीत डिनर ?? ” प्रिया.
“पण आता मी त्यांना येतो म्हणून आलोय !! आता काय करू ?? “
“आता काहीच बोलू नकोस !! संध्याकाळी पाहुयात ! जास्तच वाटलं तर ठरवूया काय करायचं ते !! “
“ऐनवेळी परत नाही गेलो तर राग यायचं त्यांना !!” श्रीधर आपल्या केबिनमध्ये येत म्हणाला.
“श्रीधर सध्यातरी मला काही सुचत नाहीये बघ ! मी आधी डॉक्टरांना भेटते आणि मग बोलते तुला. “

प्रिया फोन ठेवून नंदा सोबत डॉक्टरांना भेटते.
“डॉक्टर कशामुळे ताप आला तिला ?”
“व्हायरल आहे !! काळजी करू नका !! एक दोन दिवसात कमी होईल ताप !! ” डॉक्टर प्रिस्क्रीप्शन लिहून प्रियाकडे देत म्हणाले.
“जेवायला संध्याकाळी काय देऊ तिला ??”
“साध वरण भात द्या !! आणि मी दिलेल्या गोळ्या त्यावर लिहून दिल्या आहेत तश्या देत रहा ! बाकी काळजी करण्या सारखं काही नाही !!”

डॉक्टरांनी असे म्हणता प्रियाच निम्मं टेन्शन कमी झालं होत. सायली तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. त्या तिघीही थोड्या वेळाने बंगल्यावर आल्या. सायली पुन्हा बेडवर जाऊन झोपली. प्रिया हॉलमध्ये बसून संध्याकाळी श्रीधरच्या बॉसकडे डिनरला जाव की नको याचा विचार करत होती.

सगळ्या या गोष्टीत संध्याकाळ केव्हा झाली कोणालाच कळलं नाही. प्रियाला तर काही दुसरं सुचतच नव्हत. ती सतत सायली जवळ जाऊन तिची विचारपूस करायची. खोलीत गेल्यावर तिच्या बेडजवळ बसून राहायची.
” आई !! संध्याकाळी तू आणि बाबा जा डिनरला! मी आता ठीक आहे !!”
“तुला कोणी सांगितलं डिनर बद्दल ??”
“मघाशी बाबांसोबत बोलत होतीस तेव्हा कळलं मला !!”
“पण तुला सोडून पाय निघायचा नाही बाळा माझा !!”
प्रिया सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
“मला काही झालं नाहीये !! ” सायली हळू आवजात म्हणाली.
तेवढ्यात नंदा बेडरूम मध्ये आली.

“ताईसाहेब मी निघते आता !! “
“ये नंदा ! थांब ना !! मी तासाभरात बाहेर जाऊन येते साहेबान सोबत !! तू सायली जवळ थांबशील प्लिज ??”
“नाही ताईसाहेब !! संध्याकाळ होत आली मला जाव लागेल !! “
“खरतर मला जायची आजिबात इच्छा नाहीये पण टाळता येत नाहीये म्हणून !! आम्ही लवकरात लवकर येऊ !!”
“ठीक आहे !! पण लवकर या हा !! ” नंदा नाईलाजाने बोलली.

नंदा सायली सोबत थांबायला तयार झाली की प्रिया लवकर लवकर आवरू लागली. तिने श्रीधरला पण सांगितलं. श्रीधर लवकर घरी आला. सायली सोबत काही वेळ बसला. तिची विचारपूस केली. आणि प्रियासोबत तो साहेबांकडे डिनरला गेला. जगताप यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहचताच तो बघतच राहिला. देशमुख साहेबांचा बंगला म्हणजे जणू राजमहालच होता. बंगल्यात आतमध्ये गेल्यावर मेन डोअर बेल वाजवून ते दोघे दरवाजा उघडण्याची वाट पहात थांबले. थोडया वेळाने दरवाजा उघडला असता समोर साहेबांनी श्रीधर आणि त्याची बायको बघून त्यांना आत यायचा आग्रह केला,
“अरे श्रीधर !! ये ये !! “
श्रीधर आत आला. प्रिया मागेच थांबते. क्षणभर देशमुख साहेब प्रियाकडे पाहतात. अडखळत बोलतात.
“ये ना !! “
श्रीधर आणि प्रिया घरात येतात. त्या घरात ते पहातच राहतात इतकं ते घर सुंदर होत. दोघे हॉलमध्ये बसतात. थोड्या वेळाने तिथे देशमुखांच्या पत्नी येतात. देशमुख त्यांची ओळख करून देतात. त्यांना पाहून श्रीधर आणि प्रिया त्यांच्याकडे पाहत राहतात. कारण त्या देशमुख साहेबांपेक्षा वयाने खूप मोठ्या वाटत होत्या.
“कधी आलात ??” थरथरत्या आवाजात त्या विचारतात.
“आताच आलोत !! “
“वाह छान !! इथलं वातावरण मानवल ना ?? “
“हो !! तस तर मुंबई आणि पुण्यात फारसा फरक वाटत नाही!!” प्रिया मध्येच म्हणाली.
“हो तेही आहे म्हणा !! “
देशमुख साहेब लांब बसून फक्त एकटक पाहत होते.
“चला डायनिंग टेबलवर बसुयात !! सगळी तयारी झाली आहे !! ” देशमुखांच्या पत्नी जागेवरून उठत म्हणाल्या.

चौघे डायनिंग टेबलवर बसतात. मनसोक्त गप्पा मारत मारत जेवण करतात. पण या सगळ्यात प्रियाला देशमुख साहेबांची नजर सतत तिच्या स्तनावरुन सगळया शरीरावर फिरते आहे असे वाटत होत. त्यामुळे ती थोडी अन्कम्फर्टेबल होत होती. यासगळ्या गोष्टीत तिच्या मनात सतत सायलीचा विचार येत होता. पटपट जेवण करून कधी एकदा तिथून निघते आहे अस तिला झालं होत. प्रत्येक घास तिला जड झाला होता. पण काही केल्या देशमुखांची पत्नी तिला सोडत नव्हत्या. शेवटी रात्री उशिरा दोघे घरी यायला निघाले. रस्त्यात प्रिया श्रीधरला म्हणाली,

“श्रीधर !! मला देशमुखांची नजर थोडी वाईट वाटली !! सारखं ते मलाच एकटक बघत होते अस मला वाटतं होत !! “
“नाही ग ! त्यांना तशीच सवय आहे पहायची !! ऑफिसमध्ये पण त्यांचं असच चालू असतं !!”

श्रीधर आणि प्रिया दोघेही रिक्षाने घरी येतात. खूप उशीर झाला होता त्यामुळे दोघेही पटकन घरी पोहचतात. घरात पाहतात तर सगळ्या लाइट्स बंद होत्या. मेन डोअर मधुन आत जाताच समोर नंदा त्यांना काहीतरी शोधते आहे हे दिसलं. त्या दोघांना अचानक समोर पाहून ती जवळजवळ किंचाळलीच. त्यांच्याकडे पहातच ती घाबरत म्हणाली.
“साहेब !! लवकर लवकर !!” मध्येच ती थांबली.
“काय झालं ?? नंदा ?? शुध्दीवर ये !! काय झालंय ??” प्रिया तिला मोठमोठ्याने विचारू लागली.
“ताईसाहेब !! सायली कुठे सापडत नाहीये !! “
“काय ??” श्रीधर असे म्हणून पटकन सायलीच्या खोलीत पळाला. पाहतो तर तिथे सायली नव्हती.

सगळ्या बंगल्यात सायलीला हाक मारत ते दोघे शोधू लागले. नंदा धावत बंगल्यातून बाहेर गेली.
“सायली !! कुठे आहेस तू ??” श्रीधर मोठ्याने तिला हाक मारू लागला.

प्रिया तर रडकुंडीला आली. सगळीकडे सायली सायली म्हणत पळत सुटली.
“श्रीधर ! सायली कुठेच दिसत नाही रे !! कुठे गेली ती !! त्या नंदाने तर काही केलं नाहीना माझ्या सायलीला !!”
“काहीही काय म्हणतेस!! असेल इथेच कुठेतरी शोधुयात थांब !!”
असे म्हणताच मागून त्यांच्या पैंजनाचा आवाज आला. दोघेही त्या दिशेने धावत गेले. सायलीला हाक मारू लागले. पुन्हा पायऱ्यांवरून पैंजनचा आवाज आला. दोघे पुन्हा सायलीच्या शोधात त्या आवाजाच्या मागे पळाले. पळत पळत सायलीच्या खोलीत आले. पाहतात तर काय सायली कोपऱ्यात पुन्हा उभा होती. मोठ मोठ्याने रडू लागली. पण त्या रडण्याचा आवाज विचित्र होता.
“आई !! आई !! “
“सायली !! काय झालं तुला!”
“ये बाळा इकडे ये !” प्रिया तिच्या जवळ जाताच. ती पळून लांब गेली. अचानक खाली बसली. डोळे वटारून दोघांकडे पाहू लागली.
“नाही !! नाही !! “
“काय नाही बाळा !” श्रीधर तिच्या पुन्हा जवळ जात म्हणाला. तशी ती लांब जाऊ लागली.
“नाही !! एकदा म्हटलं ना नाही म्हणून !! लांब हो!! लांब हो !! ” सायली विचित्र ओरडू लागली.
“बरं बर ! नाही येत जवळ मी !! ” श्रीधर तिथेच उभा राहत म्हणाला.
सायलीची अशी अवस्था पाहून प्रिया रडू लागली. कित्येक वेळ ती तिला जवळ येण्यासाठी मनवू लागली. पण सायलीच हे वागणं पाहून ती अजून खचून चालली . शेवटी श्रीधरने तिला खोलीतून बाहेर जायला सांगितलं. कित्येक वेळ तो तसाच सायलीच्या समोर बसून होता.
“बाळा ! असं का करतेस तू !! तुला बर नाही ना !! आई बघ बर तुझी वाट पाहतेय बाहेर !!” श्रीधर असे बोलताच सायली शांत झाली. तिच्या वागण्यात क्षणात बदल झाला. ती श्रीधरला जणू आताच समोर पाहिलं असे मीठी मारू लागली. दोघेही थोडया वेळाने खोलीतून बाहेर आले. प्रियाला तिच्याकडे पाहून रडूच आल. कसबस स्वतःला सावरत तिने सायलीला मीठी मारली.
“बाळा !! ताप वाढलाय तुझा !! ” तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रिया म्हणाली.

नंतर खूप वेळ सायली प्रियाच्या मिठीत झोपली. श्रीधर आणि प्रिया रात्रभर तिच्या बेडजवळ बसून राहिले. सायलीच्या या वागण्याचं राहून राहून प्रियाला आश्र्चर्य वाटू लागलं होत. कारण ती कधीच एवढी अग्ग्रेसिव वागली नव्हती. तिने मनातली ही शंका श्रीधरला बोलूनही दाखवली,
“तुला आजच सायलीच वागणं थोड विचित्र वाटलं नाही ??” प्रिया श्रीधरकडे पाहत म्हणाली.
“आजारी आहे ती !! त्यामुळे तिला असा त्रास झाला असावा !! एक दोन दिवसात होईल बरी ती !! नकोस जास्त काळजी करू !!” श्रीधर तिचा हात हातात घेत म्हणाला.

रात्रभर सायली श्रीधरच्या खांद्यावर डोकं ठेवून होती. दोघेही सायली जवळच बसून होते.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *