सर्वात प्रथम माझ्या सर्व बांधवांना “प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!” प्रजासत्ताक शब्द तसा खूप सोपा वाटतो पण प्रजा म्हणजे लोक आणि सत्ता म्हणजे अंमल. जिथे लोकांचा अंमल असतो त्याला लोकशाही म्हणातात, आणि अशाच लोकशाहीची घटना २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारतास लागू झाली. आज गेली ६९ वर्षे अशी ही लोकशाही गुण्यागोविंदाने राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार. त्यांनी लिहिलेली ही घटना साऱ्या भारताने एकमुखाने स्वीकारली.
लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून केले जायचे. शाळेतील मुलांनी केलेली महिनाभर तयारी त्या एका दिवसासाठी असायची. शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी जमा होऊन” राष्ट्रगीत” म्हणताना छाती अगदी गर्वाने भरून यायची. “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत!!” हे म्हणताना खरंच एक्याची आपुलकीची भावना मनात यायची. विविध कार्यक्रम झाल्या नंतर शाळेतर्फे गोड गोड पदार्थ वाटले जायचे. त्या गोडीची चव आजही मनात तशीच आहे. प्रजासत्ताक दीन म्हणजे साऱ्या भारतीयाची गर्वाची आणि आपुलकीची बाब. खरंच आपला देश विविधतेत एक आहे ते म्हणतात ते यासाठीच.
आज कित्येक वर्षांनंतर सुधा ती आठवण मनात तशीच आहे. आता कित्येक संकल्पणा बदलल्या आहेत एवढंच. त्यावेळी शाळेत ध्वजवंदन करताना मनात एक गर्व असायचा की मी या भारताचा एक नागरिक आहे आणि आज त्याचा अभिमान वाटतो. प्रांतवार रचना करून सर्व भारतीय एक झाले ते याच प्रजेची सत्ता स्थापन करण्यासाठी. आज भारतात कित्येक भाषा बोलल्या जातात, कित्येक धर्म आहेत, कित्येक जाती ,पोटजाती आहेत, कित्येक संस्कृती आहेत पण हा भारत एक झाला तो स्वतंत्र भारतास प्रगती पथावर नेण्यासाठी. आज भारत हा जगातील सर्वात सुंदर आणि विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. स्वतंत्र भारताचे आज जगावर एक वेगळे प्रभुत्व आहे ते याच प्रजेच्या सत्तेमुळे.
आज स्वतंत्र भारत जो उभा आहे त्यामागे त्याला स्वतंत्र करण्यासाठी झटलेल्या कित्येक क्रांतिवीरांचे योगदान आहे ज्यात स्वातंत्रवीर सावरकर आहेत, सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी , भगत सिंग , चंद्रशेखर आझाद आणि कित्येक अशा क्रांतिवीर चे नाव घ्यावे. या सर्वांनी घडवला आजचा भारत. स्वतंत्र भारतात आज आपण कित्येक स्वप्न पाहू शकतो पण यांनी फक्त एकच स्वप्न पाहिलं आणि ते म्हणजे स्वतंत्र भारत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या सर्वांना अभिवादन.
६९ वर्षानंतरही आज जेव्हा भारताची लोकशाही मजबूत आहे हे पाहिलं जात तेव्हा स्वतंत्र भारतास एक योग्य दिशा देणाऱ्या आपल्या थोर पुरुषांचे, विचारवंतांचे कौतुक वाटते. आज भारत जगात आणि अवकाशात ही अग्रेसर आहे ते याच लोकशाहीमुळे. याच लोकशाहीने आपल्याला अब्दुल कलामांन सारखे महान राष्ट्रपती दिले, ज्याचे विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतात. अटल बिहारी वाजपेयी सारखे कवी मनाचे पंतप्रधान लाभले, ज्याच्या कविता आजही कित्येक लोकांना भुरळ घालतात. आणि हीच मजबूत लोकशाहीची खरी संपत्ती आहे.
असे असले तरी भारत आजही काही ठिकाणी मागे आहे हे ही मान्य करावेच लागेल, पण सर्वांनी मिळून त्या सर्व उण्या बाजू भरून काढायला हव्यात आणि ते प्रत्येक भारतीयाच आद्य कर्तव्य आहे. आपला भारत कित्येक प्रश्नांशी लढतो आहे. महागाई , आतंकवाद , जातीयवाद अशा कित्येक गोष्टी आता समुळ नष्ट करून एका नव्या भारताची सुरुवात करण्याची गरज आज प्रत्येक भारतीयाची आहे. एखाद्याची जात पात धर्म पाहताना शाळेत असताना म्हणायचो ती प्रतिज्ञा नेहमी आठवली पाहिजे ,की ” सारे भारतीय माझे बांधव आहेत!! ” तरच समता प्रस्थापित होईल. आपण कोण हे सांगताना आम्ही सारे भारतीय आहोत ही भावना वाढली पाहिजे. तरिही आज कित्येक धर्माचे जातीचे लोक अगदी सुखाने या लोकशाहीत राहतात आणि हेच खरं यश या प्रजेच्या सत्तेच आहे. भारतीय असल्याची भावना प्रत्येकाने मनात नेहमी ठेवली पाहिजे. कारण हा देश आपला आहे आणि आपण या देशाचे नागरिक आहोत.
जय हिंद …!!
वंदे मातरम् !!!
✍योगेश खजानदार