"वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची
त्या सावलीतला मी एक पांथस्थ!!
हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी
पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज!!
कधी भेटे कोणी ,कधी मी हरवूनी
माणसातला मी उरतो इथे फक्त!!
वेगळे वेष दिसूनी, वेगळी भाषा बोलूनी
आठवणींचा पसारा राहतो आहे एक!!
कित्येक पावले चालूनी, एकांती स्वतः स भेटूनी
रात्रितल्या चांदण्या ओळखतात मला फक्त!!
थकतात पावले दोन्ही, डोळ्यात आहे पाणी
मागे वळून पाहताना होतात मग ते व्यक्त!!
खचते मन जेव्हा, पावले अबोल राहतात तेव्हा
पुढच्या वाटेस दोष देत, भांडतात तेव्हा ते शब्द!!
तरी चालतं जाताना, नव्या वाटेस भेटताना
विसरून जाते मन लगेच ते सारे दुःख!!
हा प्रवास माझा असा, सांगावा तरी कसा
वाटा बोलतात आणि मी ऐकतो त्यास फक्त!!
जणू चालत राहावे , अनुभव घेत राहावे
कारण, त्या सावलितला मी एक पांथस्थ!!"
✍ योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*