न भेटले मज कोणी || एकांत मराठी कविता || Marathi Ekant kavita ||

न भेटले मज कोणी, न भेटलो मी कोणा !!
न बोलले मज कोणी, न बोललो मी कोणा !!
बंदिस्त घर हे दिसे, बंदिस्त मी या घरा !!
न मला कोण आठवे, न आठवलो मी कोणा !!

न नाते कोणी जपले, न जपले मी कोणा !!
न कोणी वाट पाहे, न पाहिले मी कोणा !!
अबोल घर हे दिसे, अबोल मी या घरा !!
न मला गृहीत धरले, न धरले मी कोणा !!

न प्रेम कोणी केले, न झाले मज कोणा !!
न लिहिले पत्र कोणी, न लिहिले मी कोणा !!
रिक्त घर हे दिसे, रिक्त मी या घरा !!
न मला कळले ते, न कळलो मी कोणा !!

न हाक कोणी दिली, न दिली मी कोणा !!
न कोणी हरवुन गेले, न हरवलो मी कोणा !!
उनाड घर हे दिसे, उनाड मी या घरा !!
न मला दिसले ते, न दिसलो मी कोणा !!

न साथ कोणी दिली , न दिली मी कोणा !!
न जगले कोण मजसाठी, न जगलो मी कोणा !!
एकटे घर हे दिसे, एकटा मी या घरा !!
न मला सापडे ते, न सापडलो मी कोणा !!

© योगेश खजानदार

•ALL RIGHTS RESERVED•

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *