आयुष्य जगताना कधी कळतच नाही की आपण पुढे जाताना कधी कुठे कोणी दुखावले तर नाही ना? खुप काही बोलताना कोणाला शब्दानी लागलं तर नाही ना ? की नातं टिकवताना दुसरा कोणी रूसला तर नाही ना ? कित्येक गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण कधी विचारच करत नाहीत. सुटतात काही गोष्टी ज्या पुन्हा कधी भेटतही नाहीत. खुप पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आल्या तरी वेळ निघुन गेलेली असते. मग उरतो काय तर फक्त तिरस्कार. पण असं होतं ना!! जवळच्या व्यक्तीने कितीही दुखावलं तरी तिरस्कार मात्र आपण कधी करुच शकत नाहीत, हेही तितकंच खरं असतं. पण नातं पुन्हा जुळायला वाट थोडीच पहावी लागते. ते तर कधीही जुळु शकतं. फक्त आपली भावना निर्मळ हवी. दुखावलो , रागवलो , चिडलो तरी नातं मात्र तसंच हव अगदी कधीही न तुटण्या सारखं. त्यात स्वार्थ नसावा, खोटेपणा नसावा . फक्त असाव ते एक गोड नातं. खुप विचार करावा असंही नातं काय उपयोगाचा!! नाही का??
आपल्यामुळे कोणाला त्रास तर होतं नाही ना याचाही विचार करायला हवा. कारण कित्येक गोष्टी या आपण कोणावर लादत तर नाहीत ना याचाही विचार केला पाहिजे. उगाच बळजबरी म्हणुन नातं कधीच टिकु नये त्यात समजुदारपणा हवाचं. शिवाय नातं हे एका बाजुने कधीच टिकत नाही. त्यासाठी दोन्ही बाजुने तेवढाच समतोल हवा. कारण एकाचाही तोल गेला तर नातं हे ताणलं जातं आणि त्रास दोघांनाही होतो.
पण नातं जुळवायचं म्हणजे समोरचाही नातं पुन्हा सुरू करायला तयार असावा. कारण आयुष्यात पुढे गेल्यानंतर काहींना आपला भूतकाळ नको असतो. तो खोडता तर येतं नाही पण पुन्हा समोर यावा अस नको असतं मग कराव तरी काय? जुन्या या नात्याला असंच सोडुन द्याव? तर अजीबात नाही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलत नसलो किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ आजही नसली तरी नातं हे संपत नाहीच ना. त्या नात्याची काळजी तुम्ही स्वतः घेऊच शकता. फक्त त्या व्यक्तीला आपला त्रास होता कामा नये. पण आपलं मन खरंच त्या नात्याला टिकवतं असेल जिवंत ठेवतं असेल ना तर ती व्यक्ती पुन्हा सर्व विसरून नक्कीच आपल्या आयुष्यात येईल हे नक्कीच.
शेवटी नातं हवं तरी कशाला असतं. आपलंस अस कोणीतरी वाटायला. आपल्या सोबत मनसोक्त आनंद लुटायला. कधी रडावंस वाटलं तरी सोबत जवळ बसायला. अगदी आयुष्यभराची साथ द्यायला हवी असतात ना ही नाती मग हे टिकवताना कशाला उगाच रुसायचं. झालं ते अगदी तिथेच विसरुन जायचं. कारण कधी कोणतं नातं हे कायमची आठवण होऊन जाईल ते कसं सांगायचं. पुन्हा हुरहुर कशाला काहीतरी मनात राहिल्याची. आणि कशाला गुंतागुंत या नात्याची,
नातं असावं एक सुंदर
वेलीवरच्या फुलांसारखं!!
उमलावं ते अगदी अलगद
मनातल्या भावना सारखं!!
वाटतं ना असं की नातं हे एक सुंदर वेलीसारखं असावं. उमलावी ती कळी नात्याची जणु की उघडावी दारे मनाची. नातं हे असच असतं फुलासारख नाजुक. ते उमलु द्यावं लागतं त्या विश्वासाच्या वेलीवर. तरंच त्या फुलांचा त्या नात्याचा सुगंध आनंद देऊन जातो.
सुगंध हा दरवळे असा का
मनास खेचे फुलापाखरा सारखं!!
ओढं त्या वेड्या फुलाची
पहावे त्यास वाटते सारखं!!
एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं राहतं. कारण नातं हे प्रेमच देत राहतं. अगदी कायमं. म्हणुन नातं हे आयुष्यात खुप गरजेचं असतं. मग ते नातं कोणतही असो. कारण आपल्या व्यक्ति शिवाय हे आयुष्य शेवटी अधुरच असतं.
सुकता ते वेलीवरच फुलं
आठवणचं देऊन जातं!!
राहतं काय मनातं तर
ते वेडं हातात सुगंध ठेवुन जातं…!!!
हो ना?
✍योगेश खजानदार