पाहता पाहता २०१८ वर्ष संपत आले. दिवस सरत जातात मग त्यात नवीन ते काय, असेही वाटू लागले. पण येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी गतवर्षीच्या काही गोष्टी सोबत घेऊनच या नवर्षात पदार्पण करावं लागत हेही सांगु लागले. नववर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे एवढेच जर असते, तर त्याचे एवढे कुतूहल वाटले नसते. पण येत्या वर्षात सोबत कित्येक नवनवीन गोष्टी येतात त्याच कुतूहल असतं. खरतर आयुष्य जगताना आपण विसरून जातो काळ, वेळ आणि बरंचं काही. पण हे लक्षात येतं ते या नववर्षाच्या पूर्वसंध्येला. म्हटलं तर विशेष अस काही घडत नाही. सरत्या वर्षाला निरोप देण्यातही काही अर्थ नाही असही काही लोक म्हणतील, मग येत्या वर्षाच ते कौतुक काय ?? होना !! पण असो, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येत्या वर्षाचा फक्त रात्रीच्या मद्यधुंद पार्टी करण्यासाठीच उपयोग आहे असाही समज चुकीचा ठरतो. गतवर्षीच्या मध्यरात्री जागून पार्टी करणे हा आपणच नववर्ष साजरे करण्याचा केलेला विकृतपणा आहे. पण यापलीकडे जाऊन या नववर्षाच्या स्वागता करिता काही विचारही आपण करायला हवे असे वाटते. गतवर्षीच्या तुलनेत येत्या वर्षाचा संकल्प तेवढाच चांगला असावा हीच अपेक्षा.
१.गतवर्षीच्या आठवणी.
सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे. कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या पाहिजेत. काही तारखा, काही महिने या आपल्याला कधीही न विसरता येतील अशा असतात. त्यातील गोडवा पुन्हा एकदा नक्की पहावा . यामुळे येत्या वर्षात आपल्या सोबत एक नवी उमेद , एक नवी आशा भेटेल. त्यातूनच नवीन काही शिकावं आणि येत्या वर्षात वाईट गोष्टीची पुनरावृत्ती टाळावी हे उत्तम.
२. झालेले बदल.
सरत्या वर्षात अश्या काही गोष्टी घडून जातात, की त्याचा प्रभाव आपल्या जीवनशैली मध्ये दिसतो. अशा गोष्टींचा, घटनांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते. अशा गोष्टींमुळे येणाऱ्या परिस्तिथीला सामोरे जाण्याची तयारी आपल्याला करता येते. वाईट असो किंवा चांगले, बदल हे नक्कीच आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सरत्या वर्षाचा अभ्यास करताना या गोष्टींचाही विचार नक्की करावा.
३.अपूर्ण गोष्टी.
सरत्या वर्षात केलेले संकल्प खरंच आपण पूर्ण केले आहेत का? याचा विचार एकदा नक्की करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. नक्की आपण हे संकल्प , ध्येय गतवर्षात कितपत पूर्ण करू शकलो याचा अंदाजही आपल्याला होतो. आपले मार्ग आपण नीट समजून घेत आहोत का ?? याचाही अंदाज आपल्याला होतो. त्यामुळे येत्या वर्षात आपल्याला काय करायचं याचा आराखडा तयार करता येतो.
४.गतवर्षीच्या कामाचा आलेख.
दरवर्षी आपण करत असलेल्या कामाचा एक आलेख पाहायला हवा. त्यात नक्की आपण आपल्या कामात यशस्वी होतो आहोत की आपला आलेख उतरता आहे हे कळतं. त्याप्रमाणे आपण केलेल्या कामाचा एक आलेख पाहण्याचा प्रयत्न नक्कीच नववर्षाच्या पूर्वसंध्येला करायला हवा. त्यामुळे येत्या वर्षात आपल्या समोर किती आवाहन आहेत हे कळत. काही पूर्ण झालेल्या गोष्टींचा आनंदही होतो. तर राहून गेलेल्या गोष्टींचा येत्या वर्षात पुन्हा एक संकल्प केला जातो. नक्कीच जाणारे वर्ष हे नुसते सेकंदाला पाहत बसणे एवढेच नसते हे मात्र खरे. त्यामुळे गतवर्षीच्या कामाचा आलेख करणही खूप महत्त्वाचे असते.
५.वाईट अनुभव.
प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात. गतवर्षीच्या वाईट आठवणी, अनुभव हे त्याचं वर्षात सोडून द्यावे हेच उत्तम. येत्या वर्षात त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात होता कामा नये. येत्या वर्षात नवीन संकल्पातून पुढे जात राहायचे. काही नाती अबोल होतात त्यांना पुन्हा आपलेसे करायचे. काही वाईट अनुभव गतवर्षात सोडून द्यायचे. कारण येत्या वर्षाला आनंदाने जवळ करायचे.
६.संकल्प.
नवीन वर्ष म्हटले की नवनवीन संकल्प करण्याची जणू प्रथाच पडली आहे. खरंतर या खूप छान गोष्टी आहेत. कोणी रोज व्यायाम करण्याचे संकल्प करतात, कोणी दारू , सिगारेट सोडण्याचे संकल्प करतात, कोणी नवीन घर घेण्याचे. असे कित्येक संकल्प लोक करतात. चांगल्या गोष्टी या अशातूनच सुरू होतात. त्यांना फक्त एक कारण हवं असतं. संकल्प करणे यातूनच आपले आपल्या ध्येयावर कीती प्रेम आहे हे कळते. ठीक आहे काही संकल्प पूर्ण होतही नाहीत, पण त्याची सुरुवात तरी झाली यातच आनंद असतो. संकल्प मोडला तरी तो पुन्हा करायचा, यातूनच आपल्याला जे साध्य करायचे आहे ते होते. त्यामुळे येत्या वर्षात एकतरी चांगला संकल्प करायलाच हवा.
७. नववर्षाचे ध्येय.
सरत्या वर्षात काही गोष्टी राहून गेल्या पण त्या पूर्ण नक्की करायच्या या ध्येयाने प्रेरित होऊन नववर्षात पदार्पण करायला हवं. येत्या वर्षात आपल्या समोर कित्येक ध्येय असावी. नवनवीन संकल्प करताना आपण आपल्या डोळ्या समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करतो आहोत ना याचा विचार करायला हवा. येत्या वर्षात पूर्वीच्या चुका टाळायला हव्या. मागच्या वर्षाचा आलेख डोळ्यासमोर ठेवून नव्याने ध्येयपूर्तीसाठी नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे.
८. positive energy.
सरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही शिकायला मिळाले आणि त्यातून सकारात्मक शक्ती मिळाली या एका विचाराने, पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी. आयुष्य सरत जात. त्यात हे असे क्षण पुन्हा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सकारात्मक शक्ती घेऊन येणाऱ्या या काळास सामोर जायला हवं आणि यातूनच येणारे प्रत्येक नवीन वर्ष आपल्यास अजुन चांगली उमेद, चांगले संकल्प, ध्येय घेऊन येतात.
त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचा गंभीर विचार करत बसण्यापेक्षा अगदी हलके जरी गतवर्षाकडे पाहिले तरी नववर्षाचे ध्येय आपल्याला मिळून जातात. अगदी कित्येक तास विचार करायला हवा असही काही नाही. फक्त आपण मागच्या वर्षी जे काम केलं त्याहूनही अधिक जोमाने येत्या वर्षात करू या संकल्पातुनच नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे .. कारण वर्ष सरत जातात पण जात नाहीत त्या आठवणी…त्यामुळे येत्या वर्षाचे स्वागत अगदी जोरात करायला हवे .. पण मद्यधुंद होऊन नाही तर .. ध्येय समोर ठेवून .. !!!
✍️©योगेश खजानदार