कित्येक वर्ष झाली, मी Yogesh khajandar’s Blog (Yk’s Blog ) नावाने ब्लॉग लिहीत आहे. कित्येक कविता , कथा , काही मनातले विचार मी या ब्लॉग मार्फत मांडले. कधी लिखाण अगदी सहज झालं. तर कधी कित्येक शोधूनही काहीच भेटले नाही. माझ्या कविता वाचकांना आवडल्या , खूप लोक या ब्लॉगचे नियमित वाचकही झाले आणि या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे या एवढ्या वर्षात मला खूप काही या ब्लॉगमध्ये बोलता आले. आता इतकं लिहूनही काही माझे मित्र ,वाचक मला म्हणाले ,की तुम्ही एखाद पुस्तक का प्रकाशित करत नाहीत??.. तर त्यांना एवढच म्हणावंसं वाटतं, की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. तसचं माझ्या पुस्तकाचं ही होईल.
लिहिताना मला खूप वेळा काय लिहावं असा प्रश्न कधीच पडला नाही, कारण मनात आहे ते लिहायचं या एका विचाराने मी लिहीत रहायचो. सुरुवात केली तेव्हा छोट्या छोट्या कविता मी ब्लॉग मध्ये शेअर करत राहिलो. तेव्हा लिखाण ही एवढं चांगलं नसायचं. वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे आपसूकच लिखाण व्हायचं. सुरुवातीच्या काही काळात अगदी दोन ते तीन कडव्याची एखादी कविता व्हायची. पण पुढे लिखाण वाढत गेलं आणि आज कित्येक कविता लिहिल्या, त्यानंतर पुन्हा थोड मागे पहावसं वाटल ते त्या सुरुवातींच्या कवितेकडे. अगदी सहजच…!!
खरंतर लिखाण का करावं हा महत्त्वाचा प्रश्न खूप लोकांना पडतो, मलाही वाटायचं लिखाण का करावं?? पण मी खूप काही विचार केला नाही याचा, कारण उत्तर अगदी सहज मिळालं. मनात जे काही आहे त्याला वाट मोकळी करून द्यायची आणि त्यानंतर भेटणारा तो मनाचा हलकेपणा तो म्हणजे खरा लिखाणाचा आनंद असतो हे त्यावेळी कळलं. म्हणजे कथा अगदी आपल्यातल्या असाव्या अस वाटायचं. लिखाण थोडं अलंकारिक भाषेत असावं, पण भाव मात्र अगदी वाचकाच्या मनाला स्पर्श करून जायला हवे असं लिहायचं. आणि म्हणूनच आजपर्यंत लिखाण करताना ,कथा लिहिताना. त्यातील नायक , नायिकेचे मन ,ती व्यक्तिरेखा मी कधीतरी कुठेतरी अनुभवलेली असायची, आणि ते पात्र लिहिताना त्या व्यक्तीचा मला तिथे उपयोग व्हायचा, त्यामुळे कथा अजुन जिवंत व्हायची. असं म्हणतात की खूप पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माणसं वाचावी, या जगाला अजुन जवळून पाहिल्याचा अनुभव आपल्याला नक्कीच त्यातून भेटतो आणि त्याचा उपयोगही कधीतरी होतो.
या सगळ्या गोष्टी अनुभवताना, काही कथा लिहिताना, आपल्यातला त्या मनाला, कोणत्याही पात्रावर प्रेम करू द्यायचं नाही हा विचार मात्र मी नेहमी करायचो. म्हणजे त्या कथेला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं. नाहीतर ती कथा एकांगी व्हायची भिती असायची. पण कितीही प्रयत्न केला, तरी एखाद्या तरी पात्राच्या प्रेमात पडायचं, अगदी नकळतच , मग आपणच आपल्या लिखाणाच्या प्रेमात जर नाही पडलो तर त्या लिखाणाचा काय उपयोग … असही तेव्हा वाटायचं!! आणि तसचं झालं, खूप साऱ्या कविता मनात घर करून बसल्या. कित्येक कडवी मनात शब्दांशी झुंज करत राहिले, आणि त्यामुळेच लिखाण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करावं हे कळायला लागले.
अगदी तेव्हापासून ते आजपर्यंत लिखाण फक्त आपल्याला आनंद मिळावा या उद्देशानेच लिहीत राहिलो. एखाद्या वेळी परिस्थितीचा राग यायचा , माणसांचा राग यायचा तो या शब्दांच्या रुपात बाहेर पडू लागला. मनात कोणी घर करून बसले तर तेही हळूच कवितेतून डोकावून त्याच्यासाठी लिहिलेल्या कविता वाचू लागले. असे खूप काही शब्द बोलू लागले. जिवंत होऊ लागले. आणि मलाच विचारू लागले की, हे शब्दांच जग सत्य आहे की आभास !! पण याच उत्तर कधीच मला मिळालं नाही. कारण सत्य लिहावं तर ते आभास वाटू लागले आणि आभासाच्या मागे जावे तर सत्य दिसू लागले. पण हे बोलले काहीच नाही. कारण शब्दांचे जग तुमच्या विचारांवर ठरते हे कळू लागले.
या जगात फिरताना आपल्या जवळच्या लोकांना ते खूप जवळुन पाहु लागले .. माझ्याच लोकांना पुन्हा पुन्हा लिहू लागले …शब्द नकळत आपलेसे होऊ लागले !!!
✍️योगेश खजानदार