भाग ५
त्रिशाला भेटून आल्यानंतर कित्येक वेळ समीर तिच्या आठवणीत रमून गेला. त्याच्या नजरे समोरून तिचा चेहरा हटतच नव्हता. त्याच्या मनात कित्येक विचार येऊ लागले.
“आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ?? तो अपंग आहे हे कळल्यावर त्रिशा त्याला नकार देऊ शकली असती !! पण तिने तस केलं नाही फक्त बाबांच्या शब्दासाठी !! बाबांवराच्या प्रेमा साठी !! पण त्यानंतर सुद्धा ती प्रेम देतच राहिली !! मंदार आज तिच्यामुळे जिवंत आहे !! आणि मी पाहिलं आहे, त्रिशाही त्याच्यावर तेवढंच प्रेम करते आता !! पण या सगळ्यात मी आजही तिथेच आहे!! नाही का ?? माझ्या आठवणीत त्रिशा आजही तशीच आहे !”
समीर विचारांच्या तंद्रीत असतो. अचानक मेसेज टोन वाजते. तो मेसेज त्रिशाचा असतो.
” समीर , तुला आज भेटून खरंच खूप छान वाटलं !! मंदार ही तुझ खूप कौतुक करत होता. खरंच खूप Thanks. मंदार आज खूप दिवसांनी मनसोक्त बोलला.!! उद्या मी संध्याकाळी निघते आहे !! आपण एअरपोर्टवरच भेटुयात !! गुड नाईट !!”
समीर मेसेज वाचल्यानंतर ‘ठीक आहे, उद्या नक्की भेटू!!’ असा रिप्लाय करतो.
“खरंतर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आणि त्याचा परिणाम आजही समीर भोगतो आहे !! त्याला वाटलं मी त्याला फसवल !! पण कधी कधी वेळ अशी येते की, आपल्या मनात नसतानाही आपल्या हातून घडायचं नसतं ते घडून जातं !! त्यावेळी समीरला मी सांगितलं असतं तर, कदाचित आज चित्र काही वेगळं असतं, नाही का ?? पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी !! समीर गेला आणि आयुष्यात मंदार आला !! मंदार तसा मनाने खूप छान !! त्या व्हीलचेअरच्या बंधनात तो अडकून पडला आहे !! आणि त्याला माझ्याशिवाय कोणीच सोबत नाही !! आज तस पाहिलं तर माझ्या मनाचा झुकाव मंदारकडे जास्त जात आहे !! तो माझा नवरा आहे म्हणून नाही !!तर त्याला सर्व काही माहीत असूनही तो माझ्यावर तेवढंच प्रेम करतो म्हणून !! आणि हीच गोष्ट मला त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा घेऊन येते !!” त्रिशा समीर निघून गेल्यावर आपल्या खोलीत बसून होती. मनात मंदार आणि समीर यांच्या विचारांचं काहूर माजलं होतं.
तेवढ्यात मंदार खोलीत येतो. थोडा धडपडत असतो. त्रिशा त्याला सावरून घेते. मंदार त्रिशा जवळ आल्यावर म्हणतो.
“आज समीरला मी मनातलं सगळं बोललो !!”
त्रिशा त्याच्याकडे बघत राहते. आणि म्हणते ,
“मग काय म्हणाला तो ??”
“डोळ्यातल्या अश्रूंशिवाय दुसर काहीच म्हणाला नाही तो !!”मंदार त्रिशाच्या डोळ्यात पहात म्हणाला.
क्षणभर थांबला आणि म्हणाला ,
“नकळत त्याच्यावर अन्याय झाला अस वाटत नाही तुला ?? दोष तुझाही नाही ना त्याचाही नाही !! पण ??” मंदार बोलता बोलता गप्प झाला.
“मंदार मला सगळं कळतंय !! त्याच्यावर अन्याय झाला आणि त्याची गुन्हेगार मी आहे हे मान्य आहे मला !!”
“मला तस नव्हतं म्हणायचं त्रिशा !!” मंदार तिला जवळ करत म्हणाला.
“तुला वाटत असेल की मी तुझ हे बोलणं ऐकून त्याच्याकडे निघून जावं !! पण तस काही होणार नाहीये !! ” त्रिशा मनातलं बोलली.
” तो तुझ्यावर मनापासून प्रेम करतो !!”
“तुझ नाही माझ्यावर प्रेम ?? ” त्रिशा एकदम बोलते . मंदार गप्प राहतो.
“आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे मंदार !!” त्रिशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
त्रिशा असे म्हणताच मंदारने तिला मिठी मारली. दोघे कित्येक वेळ एकमेकांच्या मिठीत राहिले.
पाहता पाहता रात्र सरून गेली. त्रिशा आणि मंदार परत पॅरिसला जाण्यासाठी तयारी करू लागले. समीरही आपल्या लिखाणात व्यस्त झाला. संध्याकाळी त्रिशाला भेटायचं हे कित्येक वेळा मनात घोकत होता.
“खरंतर प्रेमाची व्याख्या काय लिहावी हेच मला कधी कळल नाही !! पण मंदारला भेटल्यानंतर मी प्रेम काय असतं हे कधीच विसरू शकत नाही !! प्रेम हे आयुष्यभर सोबत राहण्यात असतंच !! पण प्रेम हे ती व्यक्ती आपल्या सोबत नसतानाही असतं !! प्रेम रंग बघत नाही !! रूप बघत नाही !! बघत ते फक्त समोरच्या व्यक्तीचा आनंद !! आणि गेली दहा वर्ष माझ्या कथेत या भावनेची कमीच राहिली !! ते लिखाण मनाला भावत होत पण मनाशी बोलत नव्हतं !! ” समीर लिहित राहिला कित्येक वेळ मनातलं सगळं मनसोक्त मांडत राहिला. आणि तेवढ्यात घड्याळात पाच वाजल्याची बेल झाली.
घड्याळात पाहताच समीर जागेवरच उभा राहिला. पटापट आवरू लागला. त्रिशाला भेटायला जायचं हे लिहिण्याच्या नादात त्याच्या लक्षातच राहील नाही. तो आवरत राहिला. इकडे फोन सारखा वाजत होता. कोणाचा होता हेही त्याने पाहिलं नाही. पाहता पाहता पाचाचे साडे पाच वाजले. समीर आवरून बाहेर जाण्यासाठी दार उघडणार तेवढ्यात बेल वाजते. समीर घाई गडबडीत दरवाजा उघडतो तर समोर आकाश असतो. लगेच तो म्हणतो ,
” किती फोन केलेत बघ !! उचलत का नाहीयेस??”
“सॉरी यार !! पण मी थोडा घाईत आहे !! तू कसकाय इथे ?”
“तुला घेऊन जायला आलोय !! बाहेर मस्त बसुयात कुठे तरी!! घेऊयात मस्त एक एक ड्रिंक !! ” आकाश हसत म्हणतो.
“नाही रे !! मला एअरपोर्टवर जायचयं !! पावणे सहा झालेत !! कार आणली आहेसना चल पटकन !! ” समीर बोलत बोलत आकाशला खेचतच घेऊन जातो.
दोघेही कारमध्ये बसतात. समीर त्याला सगळं सांगतो. त्रिशाला भेटायची ओढ समीरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रत्येक क्षण त्याला खूप मोठा असल्या सारखा वाटत होता. बघता बघता दोघेही एअरपोर्टवर पोहचतात .समीर अक्षरशः पळतच जातो. आकाश कार पार्किंग होईपर्यंत समीर गेलेला असतो.समीर समोरच्या घड्याळात पाहतो. सहा वाजून गेलेले असतात. समीर हताश होऊन बसतो. स्वतःला दोष देत राहतो.
“आज कित्येक वर्षांनंतर मी त्रिशाला म्हटलं होत, की मला तुला भेटायचं आहे !! पण तेही मला नीट जमलं नाही !! तिला काय वाटलं असेल !! मी मुद्दाम आलो नाही !! की मला तिला पुन्हा भेटायचं नाही !! काय वाटलं काय असेल तिला!! ती आजही खूप प्रेम करते माझ्यावर !! माझं चांगलं व्हावं एवढंच वाटत राहतं तिला !! पण आज मी असा वागलो याचा काय परिणाम झाला असेल तिच्या मनावर !” समीर हताश होऊन विचार करत बसला. समोरच्या घड्याळात पाहात बसला.
“तुझी उशिरा यायची सवय काही जायची नाही बघ समीर !! ” हताश समीरकडे पाहत कोणीतरी बोलत होते.
समीर वळून पाहतो तर ती त्रिशा होती. तिला पाहून समीर उठतो आणि म्हणतो.
“त्रिशा !! तू इथेच ?? सहाला फ्लाईट होती ना तुझी!!”
“होती !! पण सहाला नाही सात वाजता आहे !! ” त्रिशा समीरकडे हसत पाहत म्हणते.
“म्हणजे !! ” समीर विचारतो.
“मला माहित होत तुला उशीर होणार. म्हणून मुद्दाम मी तुला लवकर यायला सांगितलं होत !! कारण मला आपली ही भेट मिस करायची नव्हती !!” त्रिशा समीरकडे पाहत म्हणाली.
समीर फक्त ओठातल्या ओठात हसत प्रतिसाद देत राहिला.
“मंदार ??” समीर म्हणाला.
“बसलाय वेटींग रुममध्ये!!”
“पुन्हा कधी भेटणार ??”
“असच केव्हा तरी !! ” त्रिशाला ही तो प्रत्येक क्षण जड वाटू लागला.
“तुझ्या शिवाय हे जग खूप रिकाम वाटत होत !! पण आता नव्याने सुरुवात करावी अस वाटू लागलंय !!” समीर शेजारच्या फुलांकडे पाहत म्हणाला.
“मलाही तुझ्याकडून हेच हवं आहे समीर !! नव्याने सुरुवात कर !! ” त्रिशा भरल्या आवजात बोलत होती.
दोघेही कित्येक वेळ शांत राहतात. आणि तेवढ्यात फ्लाईट ची announcement होते. त्रिशा जायला निघते. मागे मंदार व्हीलचेअर वरून येताना दिसतो. समीरला पाहून म्हणतो,
“समीर!! बर झाल तू आलास !! मला ना ऑटोग्राफ हवा आहे या पुस्तकावर ! काल बोलण्याच्या नादात राहूनच गेलं!”
“माझा ऑटोग्राफ !!” समीर हसत म्हणतो.
“हो !! ” मंदार पुस्तक त्याच्याकडे देतो.
समीर पुस्तक घेतो. त्याच मागच्या वर्षी लिहिलेलं “नकळत” हे पुस्तक होत ते. त्यावर ऑटोग्राफ घेऊन मंदार पुढे निघून जातो. जाताना पुन्हा भेटुयात अस ठणकावून समीरला सांगतो.पण त्रिशाचा पाय काही निघता निघत नव्हता. अखेर शेवटची announcement झाल्यानंतर ती निघते. जाताना समीरला बोलते.
“तुझी काळजी घे !! पुढच्या वेळी भेटू तेव्हा मला माझा जुना समीर हवा आहे !! कॉलेज मधला !! ” त्रिशा एवढं बोलून समीरला घट्ट मिठी मारते.
जाणाऱ्या त्रिशाला कित्येक वेळ समीर पाहत बसतो. कार पार्किंग करून आलेला आकाश धावत येतो. स्वतःत गुंग झालेल्या समीरकडे पाहत म्हणतो.
“भेटली ??”
समीर फक्त होकारार्थी मान हलवतो. पाठमोऱ्या जाणाऱ्या तिला आठवतो. आपल्या नव्या आयुष्याची भरारी घेण्यास निघतो. समीर नव्याने जगण्यास निघतो, त्याच जुन्या समीरला भेटण्यास निघतो, जिथे भेट झाली होती त्याची आणि त्रिशाची, त्याच त्रिशाला उगाच म्हणतो,
“भेट व्हावी तुझी नी माझी
नकळत एका वाटेवरी
सोबतीस यावी पुन्हा तू तेव्हा
ओढ कोणती माझ्या मनी
थांबशील तू क्षणभर जेव्हा
वेळ थांबेल क्षणभर जरी
जगून घेईल मी आयुष्य सारे
राहील एक आठवण मनी
सांग नव्याने सारे काही
प्रेमाची ती सुरुवात जरी
लांब तिथे तू असशील जेव्हा
इथे असेल चित्र तुझे मनी
भेट व्हावी तुझी नी माझी
नकळत एका वाटेवरी ..!!”