"धावत जावं ध्येयाकडे आणि उगाच मिठीत घ्यावं !!
पायात रुतलेल्या काट्याला, सहज विसरून जावं !!

आठवणीत ठेवावं ते कष्ट, त्याला पुन्हा पुन्हा गिरवावं !!
कितीही घेतली भरारी तरी, मन जमिनीवर रहावं !!

वाचू नये गाथा यशाच्या , पुढच्या ध्येयाकडे पहावं !!
नवे मार्ग ,नवी दिशा , पुन्हा जिद्दीने चालावं !!

कधी विरुद्ध , कधी प्रवाहात, स्वतःला आव्हान द्यावं !!
कधी दिवसा , कधी रात्री, फक्त ध्येय समोर दिसावं !!

लोक बोलतील, लोक काय म्हणतील, सार विसरून जाव !!
मनातल्या स्वतःस एकदा तेव्हा, नक्की बोलुन बघावं !!

पांथस्थ होऊन त्या मार्गावर, क्षणभर तरी थांबावं !!
मागे वळून पाहताना , आपल्यास न विसराव !!

यश अपयशाच्या पारड्यात, ध्येय न मोजावं !!
मार्गस्थ त्या वाटेवर, मनसोक्त आयुष्य जगावं !!"

✍️ शब्दगंध (योगेश खजानदार)

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE