भाग ४
“हे कोणतं स्वप्न आहे !! काहीच कळत नाही!! सायली मला सोडून जावी आणि तिला थांबवण्याचा एवढा प्रयत्न मी करावा ?? तिचा तो चेहरा आजही डोळ्यासमोरून का जात नाहीये !!! तो स्पर्श पुन्हा पुन्हा जाणवावा !! नाही हे चूक आहे !! ज्या पायल शिवाय मी कधीही इतर कोणाचा विचारही केला नाही तिला मी आज फसवलं आहे !! पण मग सायलीच काय ?? तिच्या मनात माझ्याबद्दल काय भाव असतील आता!! मी तिचा विश्वासघात तर केला नाही ना ?? मग पायलच नाव घेताच सायली माझ्या मिठीतुन दूर का व्हावी ?? तिच्या ओठात मला तो प्रेमरस का भेटावा ?? सायली माझ्यावर प्रेमतर करत नाहीना ?? की नकळत मीही तिच्यावर प्रेम करतो आहे ?? एवढा विचार तो का व्हावा ?? इतके प्रश्न, पण उत्तर एकही माझ्याकडे का नाही ?? ” विशाल पलंगावर पडून विचार करत राहिला.
रात्रभर विचार करुन करून विशाल झोपलाच नाही. सकाळी लवकर उठून आवरून बसला. खोलीतून बाहेर येत समोर आईला बोलू लागला.
“आई !! कोणी आलं होत का ग ?” मनातल्या भावना अचानक ओठांवर याव्या तसे विशाल म्हणाला.
“एवढ्या सकाळी?? कोण येणार होत का ??” कुतूहलाने विचारू लागली.
“नाही !! कोणी नाही !!” विशाल आई समोर बसत म्हणाला.
आई आपल्या कामात व्यस्त होती. समोर ठेवलेल्या रिकाम्या चहाच्या कपकडे पाहून त्याने सदाला हाक मारली.
“सदा !! चहा !!”
विशाल हाक मारेपर्यंत सदा चहा घेऊन आला.
“हे घ्या !! तुम्हाला पाहिलं तेव्हाच चहा घेऊन यायला लागलो होतो !! म्हटलं तुम्हाला आता चहा नक्की लागेल !!” सदा हसत म्हणाला.
विशाल चहाचा कप हातात घेत समोरच्या मुख्य दरवाज्याकडे एकटक पाहू लागला. चहा कपमध्ये तसाच राहिला. सदा बाजूला उभारलेला, त्याला लक्षात येते तो मध्येच बोलतो.
“दादा चहा घ्या !! गार होईल !!”
विशाल भानावर येत चहाचा कप घेऊन आत आपल्या खोली मध्ये जातो.
“काय रे सदा!! हल्ली विशाल कुठे गुंग असतो काही कळत नाही ??कोणत्या विचारात गुंतला आहे काय माहित !!!”
“बाईसाहेब !! काल सायली येऊन गेल्यापासून हे असच चालू आहे बघा!!”
“काल सायली आली होती घरी ?? मला कसं माहित नाही मग ??”
“तुम्ही तेव्हा आत मध्ये होतात !!”
” काय झालं आहे पण ??” आई कुतूहलाने विचारते.
” ते काय माहित नाही मला !!! “
“बर ठीक आहे !!”
एवढं बोलून आई आपल्या कामात पुन्हा व्यस्त होते पण तिला सायली आणि विशालचे विचार कामात मन लावू देत नव्हते. विचारावे तरी कसे म्हणून आई गप्प राहिली. आपल्या कामात व्यस्त राहिली.
विशाल खोलीत आपल्या चित्राकडे उगाच पाहत राहिला कित्येक वेळ, आणि बडबडू लागला.
” ही पायल आहे !! नाही ही सायली आहे ! नाही ही सायली नाही !! अरे !! ही पायल नाही !! हा कोणता प्रश्न आहे ?? या चित्रात मला पायल शिवाय कधी कोण दिसलेच नाही !! मग आज या चित्राचा चेहरा मला सायली सारखा का वाटावा ?? ती सायली जीचा स्पर्श मला तिच्यात हरवून गेला. जिच्या डोळ्यात मी पाहिला आहे तो प्रेमाचा अथांग समुद्र !! फक्त माझ्यासाठी !! पण मग माझी पायल कुठे आहे?? ती पाहा त्या आठवणीत ! त्या आमच्या आठवणीच्या चित्रात ती मला स्पष्ट दिसते आहे !! पण तिचा तो स्पर्श आठवत नाही आता !! पण आठवांचा स्पर्श जाणवतो आहे मला !!! सायली ही अस्तित्व आहे की पायल ?? की हा सारा भास आहे माझा !! ते पहा !! ती सायली माझ्यापासून दूर जात आहे ! पण ती पायल आहे ना ?? नाही सायली आहे !!! थांब सायली !!” विशाल त्या चित्राला जवळ घेत म्हणाला.
थोड्या वेळाने पुन्हा विशाल खोलीतून बाहेर आला. सदाला त्याने हाक मारली. सदा समोर येताच त्याने विचारले.
“सदा कोणी आले होते का रे माझ्याकडे ??”
“नाही दादा कोणी नव्हते !!! “
“बर ठीक आहे !!! ” अस म्हणत विशाल पुन्हा खोलीत गेला.
दिवसातून कित्येक वेळा त्याने सदाला विचारले पण सदाचे उत्तर काही बदलले नाही. आई झाला प्रकार पाहत होती. विशालच्या मनाची अवस्था तिला कळली होती. विशालही समजू लागला होता. पण स्वतःला थांबवू शकत नव्हता. कित्येक वेळ उगाच बसून राहिला आणि तेवढ्यात बाहेरून सदा हाक मारू लागला.
“दादा !! बाहेर तुमचे विद्यार्थी आले आहेत !!”
विशाल जागेवरून उठला. यात नक्की सायली असणार म्हणून तो लगबगीने बाहेर जाऊ लागला. बाहेर येत समोर पाहू लागला. तेव्हा एक विद्यार्थी बोलला.
“सर ! काल आम्ही आलो नव्हतो म्हणून आज आलो आहोत !! वर्गासाठी नाही पण काही प्रश्न होते त्यांची उत्तरं विचारायची होती!! “
“बरं बरं!! विचाराना !! “
विशाल आणि ते विद्यार्थी कित्येक वेळ प्रश्न आणि उत्तरे असा संवाद करत राहिली. त्या मध्ये विशालची नजर सतत सायलीला शोधत होती. पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. अखेर विशालने त्यांना विचारलेच,
“सायली कुठे दिसत नाही ते ??”
“ती कुठे गेली कोणालाच माहित नाही !! सकाळी मी जाऊन आले पण तिच्या घरी कुलूप होत.” एक विद्यार्थीनी म्हणते.
“कुठे गेली काय माहिती ??”
“नाही !! काहीच माहीत नाही !! माझी आणि तिची पर्वापासून भेटच नाही.”
“बाकी कोणाला ??”
सर्वांनी नकारार्थी मान डोलावली.
विद्यार्थी आपल्या प्रश्नांची उत्तरे घेऊन परत गेली. पण विशालच्या मनात कित्येक विचारांचे वादळ उठले.
“काल पासून सायली कुठेच नाही ?? गेली तरी कुठे म्हणायचं ही ?? काहीच कळत नाही !! तिने जीवाचं काही बरंवाईट केलं असेल तर ?? नाही पण ती तस करणार नाही !! सायली इतकी कमकुवत नाही!! कित्येक वर्ष झालं मी तिला ओळखतो आहे !! ती सतत सोबत होती माझ्या !! पायल जेव्हा पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हाही ती सर्वात पहिले पुढे होती!! माझ्या प्रश्नाचं उत्तर होती ती !! आणि आज प्रश्नही तीच आहे !! सायली !! एकदा बोलायची संधी दे !! एकदा भेट मला !!” विशाल अंगणातल्या खुर्चीवर बसून राहिला, सायलीला आपल्या विचाराच्या विश्वात शोधत राहिला.
“विशाल ?? अरे जेवायचं नाही का रे ??” आई अचानक समोर येत विशालला बोलू लागली.
भानावर येत विशाल बोलला.
“हो आई जेवायचं आहे !!”
समोर ताट देत आई म्हणाली.
“घे !! आणि जरा पोटभर जेव !! सारखं ते चित्र नाही तर वर्ग !! “
“तू कशाला घेऊन आलीस ?? मी आलो असतो !!” विशाल ताट हातात घेत म्हणाला.
“कामात व्यस्त होतास !! म्हणून मी घेऊन आले !!”
विशाल काहीच म्हणाला नाही. आई क्षणभर शांत राहिली आणि पुढे म्हणाली.
“सकाळपासून पाहते आहे !!कामात लक्ष नाहीये तुझ? काही झालंय का ??”
“काही नाही आई !! “
“मनात असतं ते बोलून टाकावं विशाल !! नाहीतर मनात विचारांचे कित्येक डोंगर तयार होतात !! मग ते आपल्यालाच उगाच मोठे वाटायला लागतात.” आई मनसोक्त बोलत होती.
“पण ते बोलता येत नसेल तर काय करावे मग ??” विशाल.
“कोणतीच गोष्ट व्यक्त करता येत नाही असे होत नाही, एकतर आपण ती व्यक्त करताना उगाच भीती बाळगतो !! म्हणून ती तशीच आत राहते !! मनातल्या कोपऱ्यात !!”
विशाल फक्त आई कडे पाहत राहतो. आई त्याच्याकडे क्षणभर पाहते आणि आपल्या खोलीत निघून जाते. विशाल जेवण करतो आणि आपल्या खोलीत जातो. रात्रभर तो झोपतच नाही. समोरच्या चित्राना उगाच एकटक पाहत राहतो.
“आज मला भूतकाळ आणि वर्तमान यातला फरक तो कळतो आहे. पायल हा माझा भूतकाळ आहे, ते बघ त्या चित्रात ती माझ्या सोबत आहे. पण आज तिचा स्पर्श आठवणी शिवाय कुठेच नाही. ती सायली माझा वर्तमान आणि भविष्य आहे. आता मनात माझ्या कोणतेच द्वंद्व नाही. मला कळून चुकले ते सायलीचे पुन्हा पुन्हा माझ्याकडे येणे !! माझ्यावर नितांत प्रेम करणे !! पण हे कळले तरी केव्हा !! जेव्हा ती मला सोडून गेली तेव्हा !!! पण नाही, आता हा भास नाही !! आता शोध आहे तो अस्तित्वाचा !! ज्याला मी नेहमी दुर्लक्ष करत राहिलो!! नाही मला तिला शोधायला हवं !! मला तिला शोधायला हवं !!” विशाल भानावर येतो. क्षणभर शांत झोपी जातो.
सकाळच्या सूर्य किरणांनी नवी दिशा दिली. विशाल झोपेतून उठला. त्याने मनाला आज पक्क केलं होत, आज तो सायलीला शोधणारा होता. त्यामुळे तो आज लवकर आटपून बाहेर आला. आई समोरच होती तिच्याकडे पाहून तो म्हणाला.
“आई मी बाहेर जातोय !! “
“एवढ्या सकाळी !! अरे पण कुठे ??”
“सायलीला शोधायला !! तिला पुन्हा घेऊन यायला !!”
आई फक्त पाहत राहिली. विशाल मुख्य दरवाज्यातून बाहेर गेला.