दृष्टी || कथा भाग २ || MARATHI KATHA ||

भाग २

घरी पोहचताच क्षितिजने दृष्टीला फोन लावलेला असतो.
“बोल ना क्षितिज !! पोहचला तू घरी ??”
“हो !! आत्ताच आलो !! ” क्षितिज आपल्या खोलीत येत म्हणतो.
“बर जेवण केलंस की नाही अजुन ??” दृष्टी विचारते .
“नाही !! आता करणार आहे !!”
क्षितिज असे म्हणत असतानाच खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडत होतं. क्षितिज कुतूहलाने पाहतो.
“कोण आहे ??”
खोलीत कोणी आत येताना पाहून म्हणतो. आणि क्षणात बोलतो.
“आई तू !! ये ना !! “
आईकडे पहात पुन्हा फोनवर बोलतो.
“मी तुला नंतर फोन करतो !!! आणि हो ऐक उद्या सकाळी येतोय मी तुझ्याकडे !! तेव्हा तयार रहा !!!” एवढं बोलून क्षितिज फोन बंद करतो. समोर उभी आई म्हणते.
“पुन्हा दृष्टी ?? मी किती वेळा सांगितलय तुला क्षितिज !! या मुलीच्या मागे तू तुझं आयुष्य नको वाया घालू !!! “
“आई प्लीज !!! आता पुन्हा नकोस बर सुरू करू !!!” क्षितिज आईला मध्येच बोलतो.
“माझं बोलणं तुला एवढ लागत?? अरे पण मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना !! कोण कुठली अनाथ मुलगी !!! आणि त्यातही आंधळी !! काय पाहिलंस देव जाणे !!”
“नितांत प्रेम काय असत !! ते पाहिलं मी !! “
“प्रेम !! या पैश्या पुढे !! संपत्ती पुढे !! प्रेम कुठच टिकत नाही !!”
“खरंय आई !! या पैश्या पुढे प्रेम कुठेच टिकत नाही !! म्हणूनच तू बाबांना फक्त ते गरीब आहेत म्हणून सोडलं !! का तर हा पाहणारा समाज तुला नावं ठेवेन म्हणून !! “
“क्षितिज !!! काय बोलतोयस कळत का तुला !! ” आई थोडी रागात येत म्हणाली.
“नाही कळत मला आई !! पण मला एवढं कळत की हा समाज बघतो !! म्हणून खोटी आभूषण मिरवण !! खोटी नाती जपणं !! याला काय म्हणायचं ?? त्यापेक्षा मला माझी दृष्टी खूप वेगळी वाटली !! तिने माझ्याकडे काहीच मागितलं नाही आई !! ना तिला माझ्यात काही दिसलं !! तिने फक्त माझ्यावर प्रेम केलं !! अगदी हृदयातून !! “
“तुझ्याशी ना बोलण्यात अर्थच नाही!! ! वेड लागलंय तुला !!”
एवढंच बोलून आई खोलीतून बाहेर निघून जाते. क्षितिज तिला आडवतही नाही.
क्षणभर क्षितिज शांत बसून राहतो. मनात कित्येक विचारांचा गोंधळ घालत राहतो.
“दृष्टी !! जिच्या आयुष्यात दृष्टीच नाही !! ती माझी दृष्टी !! या देवाने तिची दृष्टी हिरावून घेतली ,पण आयुष्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे सांगायचं विसरला नाही तो तिला !! आणि त्याच ऐकून !! त्याला कधीच दोष न देता !! जगणारी ही दृष्टी मनाच्या कोपऱ्यात अगदी कायमच घर करून बसली आहे!! कसं सांगू मी आई तुला !! जेव्हा माझी आणि तिची पहिली भेट झाली होती, तेव्हा ती दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधत होती. समोरच्या मैदानात खेळणाऱ्या आपल्या सर्व अनाथ बांधवांना प्रोत्साहन देत होती. अस दुसऱ्यासाठी जगायला खरंच ताकद लागते. अशी ही माझी दृष्टी !! पैसा ,संपत्ती याही पेक्षा मला जगण्याची प्रेरणा देते. नात्याला नुसती दृष्टी असून भागत नाही !! तर प्रेमही असावं लागतं !! “
क्षितिज अचानक भानावर आला.त्याला काहीतरी आपल्याकडून चुकल्या सारखे वाटू लागले. तो खोलीतून बाहेर येत आईला शोधू लागला. आई समोरच होती. डोळ्यातून येणारे अश्रू क्षितिजाला कळू नये म्हणून त्याला पाहताच लगेच पुसून घेत होती.
“आई !!”
आई काहीच बोलत नाही. त्याला पाठमोरी उभा राहून आपल्या कामात व्यस्त राहते.
“आई माझं चुकलं !! मला माफ कर !!”
आई काहीच न बोलता निघून जाऊ लागते. तिला थांबवत क्षितिज पुन्हा बोलतो.
“आई !! खरंच माझं चुकलं!! मगाशी मी तुला अस बोलायला नव्हतं पाहिजे !! “
“बोलून झालं की सगळे असेच म्हणतात!! ” आई डोळ्यात आलेला अश्रू पुसत बोलते.
“आई खरंच माझं चुकलं !! “
“तुझं नाही माझंच चुकलं क्षितिज !! मी बाबांपासून का वेगळं झाले !! हे कधी मी तुला सांगितलंच नाही !! तू तुझ्या मनाला वाटेल ते तर्क लावत राहिलास !!”
क्षितिज फक्त ऐकत राहिला.
“लग्नाआधी तुझ्या बाबांनी मला खूप स्वप्न दाखवली !! कित्येक वचनही दिली !! पण लग्नानंतर मात्र तुझ्या बाबांना कोणतीच जबाबदारी नकोशी वाटू लागली !! तुझा जन्म झाला!! खिशात पैसा नाही !! बाबांना म्हटलं तर त्यांनी हात झटकून दिले !! “
“मग पुढे !!” क्षितिज कुतूहलाने विचारू लागला.
“पुढे मग मी तुझ्या बाबांना सोडायचा निर्णय घेतला !! कारण असा नाकर्ता नवरा आयुष्यात असाण्यापेक्षा आपण आपला वेगळा मार्ग निवडावा !! हे मी ठरवलं !! मग पुढे छोटा उद्योग सुरू केला !! आणि वाढत वाढत आज हे सगळं राज्य निर्माण केलं !! तुझे बाबा त्या तिथंच कायमचे राहिले!! “
“मला तू हे कधीच सांगितलं नाहीस !!”
“कारण तशी वेळच कधी आली नाही !! पण एक भीती वाटते म्हणून मी तुला बोलते !! दृष्टी डोळ्याने अधू आहे !! तिची साथ कधीच सोडू नकोस!! कारण आयुष्यात जबाबदारी बदलत जाते !! लग्नाआधी वाटणार प्रेम !! हे लग्नानंतर जबाबदारी होते.जर आयुष्यभर तिची साथ देण्याची तयारी असेल तरच तिच्यावर प्रेम कर !!”
“आई मी तुला खरंच ओळखू शकलो नाही !! मला माफ कर !! आणि मी तुला वचन देतो की मी तिची साथ कधीच सोडणार नाही !!!” क्षितिज आईचा हात हातात घेत बोलतो.
आयुष्यात आपल्यावर विश्वास ठेवून येणारी व्यक्ती ही आपली जबाबदारी असते हे क्षितिजाला कळल होत.खरतर प्रेम करणं खूप सोपं असतं पण ते निभावणं खूप कठीण असतं हेच आईला सांगायचं होत. दृष्टीला पाहता येत नाही. तिची हीच बाजू उद्या आयुष्यभर त्याला सांभाळायचं होती. क्षितिज आपल्या खोलीत गेला. आईने त्याला सांगितलेलं सगळं काही आठवून त्यावर विचार करत राहिला.
“आईच म्हणणं खरंच बरोबर आहे !! माझं हे प्रेम दृष्टी साठी आयुष्यभर असंच राहणार !! आई तुला मी वचन देतो !!”
क्षितिज डोळे मिटून कित्येक वेळ विचार करत राहतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजते.
क्षितिज डोळे उघडत फोन कोणाचा आहे हे पाहतो.
“हॅलो !! कोण !!”
“दादा मी आश्रमातून भावना बोलते आहे !!”
“बोलणं भावना !! कसा काय फोन केलास!!”
“दादा !! दृष्टी दीदी खोलीत पडली !!”
क्षितिज जागेवर उभा राहतो , गोंधळून जातो आणि भवनाला कित्येक प्रश्न विचारतो.
“कधी ?? कुठे ?? बरी. आहे ना ती ???मी येतो लगेच थांब !!”
एवढं बोलून क्षितिज जायला निघतो.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *