दृष्टी || कथा भाग १ || PREM KATHA ||

भाग १

“त्या डोंगराच्या पलीकडे सूर्य आता हळूहळू मावळतो आहे आणि त्या तिथे पलीकडे छोट्या टेकडीवर इवले इवले दिवे दिसत आहेत. बहुतेक तिथे छोटी वाडी असावी. आणि हे काय !! आकाशात तर पक्ष्यांचे थवेच्या थवे जात आहेत!! बहुतेक घराकडे जाण्याची ओढ लागली असावी. ही सांज असतेच तितकी सुंदर!! आपल्या लोकांच्या सहवासात असावं !! अशी ओढचं लावते ती !! त्या दूर पायवाटेवर खाली कोणी शेतकरी आपले गाय वासरू घराकडे घेऊन जात आहेत !! आणि गंमत म्हणजे तो निवांत पुढे चालतोय आणि ते गाय वासरू मनाने त्याच्या मागे येतायत !! मुक्या जनावरांना सुद्धा माया, प्रेम कळतं !! ” क्षितिज बोलता बोलता थांबला.

त्याला ऐकणारी दृष्टी क्षणभर शांत बसली आणि म्हणाली.

“थांबलास का सांग ना मला !! अजुन कशी आहे ही संध्याकाळ ?? त्या बुडणाऱ्या सूर्याचा रंग कसा आहे?? सांग ना ?? त्या पक्ष्यांना क्षणभर थांबायला सांग ना !! मला ना मनमोकळ बोलायचं आहे त्यांना !! क्षितिज !! बोल ना रे !!” दृष्टी उत्सुकतेने बोलू लागली होती.

क्षितिज तिचा हात हातात घेत तिला बोलू लागला.
” ही संध्याकाळ तुझ्या इतकीच सुंदर आहे दृष्टी !! “
दृष्टी गालातल्या गालात हसते आणि म्हणते.
“पण ही संध्याकाळ रंगांची उधळण करते क्षितिज !! मला तर रंग काय तोही माहीत नाही !! या नजरेला ती संध्याकाळ दिसतच नाही !!” दृष्टी उदास होत म्हणते.
“माझ्या नजरेतून तूही पहाते आहेस ना ?” क्षितिज तिच्या जवळ जात म्हणत होता.
“पण??” दृष्टी मध्येच म्हणाली.
“आता पण नाही आणि काही नाही !! क्षितिज जागेवरून उठत म्हणाला.

संध्याकाळ सरून आता रात्र झाली होती. दृष्टीला घेऊन क्षितिज आता परतीच्या वाटेवर निघाला होता. जाता जाता तिला तिच्या आश्रमात सोडायचे होते, या विचाराने त्याच्या मनात नुसता गोंधळ घातला होता. न राहवून तो म्हणाला.
“तुला मी किती वेळा सांगितलय दृष्टी, की तू त्या आश्रमात राहू नकोस म्हणून !! माझा एक फ्लॅट बंदच आहे!! तिकडे राहा म्हणून !! “
“मी तरी तुला किती वेळा सांगितलं क्षितिज की मी नाही राहू शकत रे!! मला जस कळायला लागलं तेव्हापासून मी तिथे, त्या आश्रमात राहते आहे !! तिथे माझी जिवाभावाची माणसं आहेत !! माझी एक बहिणही तिथेच आहे !तीही माझ्यासारखी अनाथ आहे!! तिला सोडून कस येऊ मी तिकडे ??”
“पण मला तू तिथे राहणं आवडत नाही !! “
“कधी आलास तर कळेल तुला !! की रक्ताच्या नात्या पलिकडे जाऊन प्रेम करणारी माणसं असतात तरी कशी !! “
“येऊ तरी कसा !! तुमची ती केअर टेकर मला नुसतं खाऊ की गिळू अस पाहत असते !! ” क्षितिज अगदी रागात येत म्हणतो.
दृष्टी क्षितिजच्या बोलण्यावर हसते. आणि बोलते.
“कोण मालती ताई !! अरे मनाने खूप चांगल्या आहेत त्या !! “
“अस तुला वाटत !! “
“अरे नाही खरंच !! एकदा भेट तू त्यांना म्हणजे कळेल !! “
“भेटायला कश्याला हवं समोरच आहेत त्या !!”
“म्हणजे ?? ” दृष्टी प्रश्नार्थक चेहरा करत विचारते.
“म्हणजे आपण पोहचलो ! आला आश्रम !!”

क्षितिज दृष्टीला कार मधून उतरायला मदत करू लागला. समोर दृष्टीची अनाथ बहीण भावना तिला पाहताच लगेच तिला घ्यायला जवळ आली. क्षितिजकडे पाहून ती हसली. दोघीही आत आश्रमात जाऊ लागल्या. क्षितिज दृष्टी आत जाई पर्यंत तिला पाहत राहिला.

दृष्टी आत येताच मालती ताई समोरच होत्या. तिला पाहून त्या बोलू लागल्या.
“दृष्टी!! “
आवाजाने दृष्टी चपापली.
“कोण ?? मालती ताई ??”
“हो मीच !! “
“बोला ना ताई !!”
“कुठे गेली होतीस दृष्टी ??”
“सूर्यास्त पहायला !!” दृष्टी म्हणाली.
“तू पाहिलास ??” मालती ताई तिला जवळच्या खुर्चीवर बसवत म्हणाल्या.
“हो !! पाहिला मी सूर्यास्त !! क्षितिजच्या नजरेतून !! “
“छान !! हे सगळं ठीक आहे दृष्टी !! पण तू हे विसरू नकोस की तू एक अंध अनाथ मुलगी आहेस ! आणि क्षितिज एक सुंदर देखणा श्रीमंत घरातला मुलगा आहे !!”
“पण क्षितिज माझ्यावर प्रेम करतो !!”
“हे वय असतच अस पोरी !! तुम्ही दोघंही तरुण आहात !! तूही सुंदर आहेस !! उद्या काही अनुचित घडू नये म्हणून तुझी काळजी वाटते!!” मालती ताई दृष्टीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या.
“माझा क्षितिज असा नाही !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !!”
“मलाही असंच हवं आहे मुली !! तुझ्या या अश्या असण्यामुळे आधीच तू खूप काही भोगलं आहेस !! तुझं भविष्य सुंदर व्हावं एवढंच वाटत मला ! “

दृष्टी नकळत मालती ताईला मिठी मारते. मालती ताई भावनाला तिच्या खोलीत घेऊन जायला सांगते. जवळ उभी भावना तिला उठवत म्हणते
“चल दृष्टी ताई !!”
हातातली काठी बाजूला ठेवून दृष्टी खोलीत जायला निघते. तेव्हा शेजारीच उभ्या काही मुली उगाच तिच्याकडे पाहून हसतात. भावना त्यांच्याकडे रागाने पाहत खोलीत जाते. दृष्टीला पलंगावर बसवून ती बाहेर निघून जाते. पलंगावर बसलेल्या दृष्टीच्या कानात मालती ताईचे ते शब्द घुमू लागतात.

“तू एक गरीब अनाथ अंध मुलगी आहेस !! आणि तो श्रीमंत घरातला मुलगा!!”

“पण माझा क्षितिज असा नाहीये !! हो मला माहितीये !! तो मला कधीच सोडून जाणार नाही !! मी अनाथ अंध मुलगी असूनही त्यानं माझ्यावर नितांत प्रेम केलं !! हे पुरेस नाही का ?? माझा क्षितिज , या आंधळ्या मुलीला जग दाखवणारा !! तिची क्षणोक्षणी दृष्टी होणारा !! मला क्षणात सोडून जाणार नाही !! नाही !! नाही !!” अचानक दृष्टी बैचेन झाली आणि तितक्यात तिच्या पर्स मधून मोबाईल फोनची रिंग वाजली. ती भानावर येतं चाचपडत चाचपडत फोन शोधते. क्षणभर शोधल्यावर फोन सापडतो.

फोन उचलत ती बोलू लागते.

“हॅलो!! कोण बोलतंय ??”

“क्षितिज बोलतोय !!!” पलीकडून आवाज ऐकू येतो.

क्रमशः …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *