भाग ३
” अरे होरे सदा !! त्या तिथे सायकलच वाटते!!”
सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या आईला बोलू लागले.
“लता सदाच्या दुर्बिणीच प्रश्न सुटला! मी ही माझी सायकल विकून त्याला दुर्बीण घेऊन देणार आता!!
“आहो पण ती सायकल तुम्हाला तुमच्या शाळेत असताना बक्षीस म्हणून मिळाली आहे!!” सदाची आई एकदम म्हणाली.
“मुलाच्या स्वप्नासमोर मला हे बक्षीस काही नाही लता !! आणि या बक्षिसांने दिली की साथ तब्बल २५ वर्ष !! आता या सायकलने ते चंद्र नी तारे सदासाठी जवळ येतील!!” बाबा सायकलकडे पाहत म्हणाले.
“पुन्हा एकदा विचार करा!! तुम्हाला ही सायकल किती प्रिय आहे माहितेय मला !! “”
“आता फक्त दुर्बीण आपल्या सदासाठी!!”
सायकल !! सदाच्या स्वप्नांचा रस्ता सोपा करण्यासाठी विकायची, पण हे करावं लागणारच ना !! नाहीतर मग सदाला ते चंद्र जवळून कसे पाहता येतीन. सायकल !! कामावर जाताना रोज पुसायचो मी तिला !! खूप साथ दिली मला तिने!! लता आणि मी पहिले याचं सायकल वर गेलो होतोत फिरायला!! कशी डौलाने दिसतेय पाहा ती माझी सोबतीन सायकल…!! बाबांच्या मनात विचारांचा काहूर होता. रात्रभर नुसता विचार मनाला भंडावून सोडत होता. अशाच विचारात सकाळचं उन सरवत्र पसरलं. घरात लगबग सुरू झाली.
“लता आज जाऊन येतो त्या राजू सायकलवाल्याकडे पाहतो किती म्हणतोय ते!! पण काय ग लता हा सदा काय अभ्यास करतोय मोठमोठ्याने !! आज जागही त्याच्या आवाजानेच आली!! “
“काही कळत नाही आहो!! फक्त चंद्र नी तारे एवढंच काय ते कळलं मला !! ” सदाची आई मिश्किल हसत म्हणाली.
बाबा सदाला हाक मारत म्हणाले.
“सदा आज शाळेत नाही कारे जायचं??”
सदा शेजारच्या खोलीतून बाहेर येत म्हणाला,
“जायचय तर आज तर विशेष जायचं आहे!!”
“बरं बरं आटोप पटकन आता निघायचं आहे !! मला उशीर होतोय !!” बाबा घड्याळाकडे पाहत म्हणाले.
दोघेही आवरून निघाले. आज बाबांची सायकल नेहमी पेक्षा जरा हळूच चालली होती. कदाचित पुन्हा कधीच न परतून येण्यासाठी ती चालली होती. बाबा आज सदाला काही बोलतही न्हवंते. कित्येक वर्षांची सोबतीन आज सोडून जातानाही कायम सोबत रहायचं वचन देऊन जात तर नसेन ना , बाबांच्या डोळ्यात एक टिपूस आला होता. पण तो सदाला दिसायच्या आत बाबांनी पुसला.
“बाबा आज जातानाही आपण दोघे बरोबर जायचं?” तुम्ही येतान ना मला न्ह्यायला ??” सदा बाबांना विचारत होता.
“बाबा!!! बाबा !! काय झाल ???”
“काही नाहीरे सदा ?? ” येईन मी !! “
सदा सायकल वरून उतरत होता . बाबा कडे कित्येक वेळ पाहत होता. बाबा आता राजू सायकल वाल्याकडे आले.
“राजु , अरे कसा आहेस ??”
“काय विनायक शेठ, कसं काय येणं केलं आमच्याकडे आज ?? सायकल काय त्रास देते की काय ” अस म्हणून राजु दात सर्व दिसतील इतका मोठा हसला.
“विकायची आहे सायकल !!” बाबा जड शब्दाने बोलले.
“विनायक शेठ आहो , काय म्हणताय हे ?? पण का ??”
“पैशाचही गरज आहे थोडी!!” बाबा एकदम म्हणाले.
“विनायक शेठ या सायकलला तुम्ही किती जपता !! अशी एकदम विकून टाकायची म्हणजे ??”
“पर्याय नाहीरे दुसरा!!”
“हे बघा विनायक शेठ, हा व्यवहार आहे म्हणून, तुम्हाला मी पैसे देईल पण ही सायकल मी कोणाला विकू नाही शकणार!! तुमचं मन मी जाणतो!! तुम्ही पुन्हा मला माझे पैसे द्या आणि ही सायकल घेऊन जा !!! “
बाबा सायकल राजूकडे ठेवून पायीच कामावर गेले. मुलाच्या स्वप्नासाठी आपल मन तिथे ठेवून गेले.
आज दिवस तसा त्यांना जाता जात न्हवता. आज संध्याकाळी सदाला घेऊन जाताना सायकल नाही दिसली तर त्याला काय सांगावं हा प्रश्न त्यांना पडला. पण खिशातील पैश्याकडे पाहून त्यांना त्याच्या दुर्बिणी शिवाय दुसरे काही दिसलेच नाही …