भाग ४
संध्याकाळची वेळ झाली. बाबा एकटेच चालत सदाच्या शाळेकडे येत होते. त्यांना सदाला सायकल बद्दल काय सांगावं तेच कळत नव्हतं. विचाराचं नुसतं वादळ उठलं होत. तसेच ते शाळे जवळ आले. सदा लांबूनच चालत येताना त्यांना दिसला. आल्या बरोबर त्याने विचारलं,
“बाबा सायकल कुठे आहे?”
“अरे ती राजूकडे आहे!! खराब झाली ना म्हणून नीट करायला दिली!!”
पण हे असं किती दिवस सांगत रहायचं. बाबांच्या मनानेच त्यांना विचारलं. पण सदाच्या चेहऱ्यावर आज त्यांना वेगळाच आनंद दिसत होता. तो अगदी खुश होता.
“काय रे सदा, काय झाले एवढे खुश व्हायला?”
“बाबा घरी गेल्यावर तुम्हाला सांगू , आई तुम्हीं दोघेही समोर असताना सांगेन!!”
“पण झाल तरी काय एवढं!!?” बाबा कुतूहलाने विचारत राहिले.
चालत चालत दोघेही घरी आले. सदा आत मध्ये गेला आणि हातपाय धुऊन दफ्तर आवरत बसला. बाबा स्वयंपाक घरात आईला बोलत होते.
“लता आज राजुला सायकल विकली मी!!” पहिले तर घेईचं ना विकत, मग म्हणाला विनायक शेठ ही सायकल मी पुन्हा तुम्हाला देणार जेव्हा पैसे परत देताल तेव्हा घेऊन जा !! बाबा आईला हातातले पैसे दाखवत म्हणाले.
पण तेवढ्यात सदाने आई आणि बाबांना हाक मारली. दोघेही लगबगीने बाहेर आले. आणि सदा बोलत म्हणाला.
“आई बाबा तुम्हाला माहितेय गेली ३- ४ दिवस मी कशाचा अभ्यास करत होतो??” सदा दोघांकडे बघत प्रश्न विचारत होता.
आई बाबा एकमेकांकडे पाहत नाही म्हणत होते.
“आई , त्या ताऱ्यांचा अभ्यास करत होतो ना मी !! त्याच चांदण्यांनी मला त्याचं घर शोधायचीं संधी दिलीये मला !! आई बाबा मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो !! आणि मला बक्षिस मिळाले !!ती म्हणजे माझी आवडती “दुर्बीण”!!”
बाबाना काय बोलावं तेच कळेना . त्यांच्या डोळ्यात कित्येक आनंदाचे अश्रूं दाटले.
“सदा!!!!” म्हणत बाबांनी त्याला आपल्या मिठीत घेतले.
आईला काय बोलावे तेच कळत न्हवते.
“आता तरी आणताल ना सायकल ??” आई बाबांकडे पाहत म्हणाली.
“सायकल??” सदा बाबांना विचारतं म्हणाला.
“तुला दुर्बीण हवी म्हणून तुझ्या बाबांनी सायकल विकली!! पण तू तुज स्वप्न स्वतःच पूर्ण केला सदा!” आई सदाला जवळ घेत म्हणाली.
“बाबा मी म्हणालो होतो की दुर्बीण हवी आहे पण मला ती मिळवायची होती. या आकाशाला जिंकायचं होत बाबा मला.!!” चला बाबा आधी आपण तुमची सायकल आणु!!
सदा आणि बाबा चालत राजू कडे आले आपली सायकल घेऊन जाताना त्या दुर्बिणी साठी घेतलेले पैसे परत देऊन गेले.
जाताना एकच सुख होत दोघांमध्ये , सदा ने आकाशाला गवसणी घालण्याचा आणीं त्याला त्या आकाशा एवढं स्वप्न दाखवण्याचं समाधान मिळालं याच त्याच्या बाबांचं.
दोघेही घरी आले. रात्रीच्या समयी दुर्बिणीतून त्या चांदण्या पाहू लागले. चांदण्या पाहताना सदा एकदम म्हणाला.
“बाबा कविता म्हणा ना ..!! ”
“कोणती रे सदा!!”
“स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये !! ” सदा बाबांकडे पाहत म्हणाला. बाबाही आकाशाकडे पाहत कविता म्हणू लागले …
” स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घेतले..!!
ब्रह्मांडा सम ध्येय माझे
स्वतःस मग मी शोधून पाहिले
अनंत स्वप्नात कुठे दिसता
माझेच मी मला न दिसले
का असे होते मला आज
ध्येय कोणते मनास लागले
दूरवरच्या त्या घरात का
उगीच मग मी स्वतःस पाहिले..!! “
“बाबा हि पृथ्वी आपल घर ना??” सदा मिश्कीलपणे म्हणाला
“हो रे !!” बाबाही त्याच्याकडे पाहत म्हणाले.
“मग हे घर कोणाचं??”
असे म्हणताच सदा आणि बाबा एकमेकांकडे पाहून मनसोक्त हसले…