दुर्बीण …! एक कथा
लेखक -योगेश खजानदार
भाग १
“बाबा , त्या ताऱ्यांच घर कुठे असतं हो?” सदाशिव अंगणात पडून रात्रीच चांदणं पाहत म्हणाला.
” अरे सदा, हे ब्रह्मांड म्हणजे या ताऱ्यांच घरचं ना रे !! आपल्या पृथ्वीच घरही हेच !! आणि आपलं घर ही पृथ्वी!! ” सदाशिवचे बाबा त्याच्याकडे पाहत म्हणाले. बाबा त्याला लाडाने सदा म्हणायचे.
“मग हे घर कोणाचं ??” स्वतःच्याच घराकडे मिश्कीलपणे हात करत सदा म्हणाला.
“चेष्टा नाही करायची बर सदा!! चला झोपा आता !! सकाळी लवकर उठून शाळेत जायचय ना??!!”
“हो बाबा , पण मला या ताऱ्याना जवळून पहायचंय त्या आमच्या वर्गातल्या जोशीकडे याला जवळून पहायची दुर्बिण आहे!! मलाही घ्यायचीय ती!!
“नक्की घेऊत!! झोप आता!!
बाबांकडे दुर्बीणची मागणी करून सदा झोपी गेला. कित्येक वेळ बाबा सदाच्या दुर्बिणीचा विचार करत बसले.
“सदाला दुर्बिण हवी आहे , उद्यापासून थोडे पैसे वाचवायला चालू करूयात म्हणजे काही दिवसात ती त्याला घेऊन देता येईल!! बाबा सदाच्या आई कडे पाहत म्हणाले.
“आ हो पण कशाला हवेत हे लाड??” आई बाबाना विचारत म्हणाली
“लता सदाने आपल्याकडे काय मागितल?? दुर्बिण ?? नाही लता !! त्याने स्वप्न मागितले आपल्याकडे!! आणि त्याला ते द्यायचे !! त्याला त्याची स्वप्न द्यायची !! त्या चांदण्याच घर शोधायचे त्याला !! आपण त्याला मदत करायची!” सदाचे बाबा झोपलेल्या सदाकडे पाहत म्हणाले.
“आहो पण आधीच किती खर्च आणि यात ही दुर्बीण!!”
“आपले खर्च कमी करूयात आपण पण त्याला स्वप्न पाहू दे !!
बाबा कित्येक वेळ आईशी या विषयावर बोलत होते. त्यांना फक्त दिसत होते ते सदाचे स्वप्न. सदाला घडवायचं त्याला मोठा शास्त्रज्ञ करायचं हेच बाबाना वाटत होत. आणि त्याच हे पहिलं पाऊल होत.
रात्रीच्या विचारात पहाट झाली. पूर्वेकडे सूर्याने आकाश गुलाबी केले होते. सदाची शाळेत जायची वेळ झाली होती. बाबांना कामावर जायचं होत. घरात नुसती सकाळची घाई चालू होती.
“सदा चल आवरल का ?? शाळेत जायला उशीर होतोय!!” बाबा घड्याळाकडे पाहत म्हणाले!!
“चला झाल मज अवरून!! ”
सदा आणि बाबा सायकल वरून निघाले. सदा सायकलच्या पुढच्या बाजूस बसला होता.
“बाबा तुम्ही मध्यंतरी मला एक कविता ऐकवून दाखवली होती आठवत!!
“कोणती ??” बाबा सदा कडे कुतूहलाने पाहत म्हणाले.
” स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घेतले..!!
ब्रह्मांड …!!! ब्रह्मांड …!! बाबा पुढे काय आहे हो ?? सदा डोकं खाजवत बाबांना विचारत होता.
“ब्रह्मांडा सम ध्येय माझे
स्वतःस मग मी शोधून पाहिले
अनंत स्वप्नात कुठे दिसता
माझेच मी मला न दिसले
का असे होते मला आज
ध्येय कोणते मनास लागले
दूरवरच्या त्या घरात का
उगीच मग मी स्वतःस पाहिले..!! “
बाबा सायकल चालवत कविता म्हणाले.
“बाबा तो दुरवरच्या घरात मीच आहे ना ??”
“हो तूच आहेस..!!”
“घरात बसून दुरवरच्या चांदण्यांच स्वप्न पाहणारा मी आहे अस वाटत मला ही कविता ऐकल्यावर!!” सदा बाबांकडे पहात म्हणाला.
“त्या स्वप्नातच ध्येय शोधायची असतात सदा!! ” बाबा सायकल थांबवत म्हणाले. सदा सायकल वरून उतरत म्हणाला.
“नक्कीच बाबा !!”
“शाळेतून लगेच घरी जा !! कुठे फिरत बसू नकोस बर !!
“हो बाबा !!! “
सदा शाळेत गेला. त्याला पाठमोरा कित्येक वेळ बाबा पाहत होते. जणु त्याला सांगत होते त्या स्वप्नांना जवळ करायची तयारी कर सदा! मी हवी तेवढी मेहनत करायला तयार आहे. बाबा तिकडून लगेच कामाला निघून गेले. सदाच्या स्वप्नासाठी स्वताला विसरून त्याला घडवायला गेले .