उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून दुपारची वेळ, एक निवांत मिळालेला क्षण आणि पुढे काय करावं हा प्रश्न. मग लॅपटॉप ऑन करून त्यावर एखादा चित्रपट पहायचं ठरलं. मनाशी तस ठरवलं सुद्धा. पण मन कुठेतरी वेगळीकडेच हरवून गेल होत. सगळं काही ट्राय करून बसलो, मित्रांशी फोनवर बोललो, चॅटिंग केली. इंस्टाग्राम वर रिल्स पाहिले तरीही मन काही केल्या लागेना. पाहता पाहता उन्हाची तीव्रता कमी झाली. संध्याकाळची वेळ झाली. फ्रिझ मधील थंडगार पाणी पिऊन गच्चीवर मोकळी हवा खायला चाललो आणि जाताना अडगळीत पडलेला कॅरम बोर्ड पाहिला. क्षणात मनाला जुन्या आठवांचा स्पर्श झाला आणि माझी पावले नकळत कॅरम बोर्डकडे वळली. मनाची घालमेल का होते आहे याच उत्तर मला मिळालं होत. त्या संध्याकाळी तो कॅरम बोर्ड चांगल्या फडक्याने पुसून स्वच्छ केला. माळ्यावर एका कोपऱ्यात पडलेल्या सोंगट्या दिसल्या आणि मनाला एकच आनंद झाला. सगळं काही स्वच्छ करून ठेवलं. मित्रांना व्हॉट्सॲप वर त्याचे फोटो टाकले आणि उद्या भेटण्याचं ठरलं.
हे नेहमी असंच होत, रोजच्या आयुष्यात आपल्याला कंटाळा आला की अडगळीतल्या त्या गोष्टी पुन्हा आनंद देऊन जातात. एरवी वाटतात त्या पडीक गोष्टी किंवा घरातली अडचण. पण आठवांचा बाजारात आजही त्या गोष्टी किती अनमोल आहेत हे उगाच वाटतं राहताना, मन नकळत आठवांच्या बाजारात काय काय भेटत हे पाहायल जात आणि हातात मावणार नाही इतकं सारं घेऊन येत. कुठे कुठे आपण थांबावं असही त्याला वाटायला लागत. अगदी लहानपणीच्या आठवणी ते स्वतः समोर जिवंत करत.

साधा अडगळीत पडलेला कॅरम बोर्ड मला नकळत माझ्या जुन्या आठवणीत घेऊन गेला. जेव्हा मी सहा सात वर्षाचा असेल. तेव्हा एवढी कुठे कनेक्टिव्हिटी नव्हती, ना लोकांकडे घरोघरी लॅन्डलाईन फोन नव्हते. तेव्हा कोणा नातेवाईकांचा फोन हा कोणा शेजारच्या घरी जर लॅन्डलाईन असेल तर यायचा. त्याच्याकडील कोणी चुणचुणीत पोर पळत येऊन सांगायचं. फोन आपल्यासाठी आहे हे कळल्यावर घरातले पळत सुटत आणि फोनवर बोलत. बोलणं पाचच मिनिट होई पण पुढच्या महिनाभराचा आनंद त्यात सामावलेला असायचा. कोणाचं लग्न ठरलं , कोणाची थब्येत कशी आहे , कोण कुठे गेला हे त्यातून कळायचं. पुढे मग काही वर्षानंतर आमच्याही घरी लॅन्डलाईन फोन आला आणि या सर्व गोष्टी जुन्या झाल्या. कालांतराने मोबाईल फोन आले त्याचीही तऱ्हा अशीच काही असायची. आमच्यात पहिला फोन बाबांसाठी घेतला होता जेव्हा त्यांची पुण्याला बदली झाली होती तेव्हा. तेव्हा त्याच्या हातात मोबाईल फोन पाहून एवढं नवल वाटायचं की कधी एकदा मोबाईल हातात घेऊन पाहतोय अस व्हायचं. मग स्मार्ट फोन आले आणि आता त्याच कोणाला काहीही देणंघेणं नाही. अस म्हणा ना हवं तर की मोबाईल फोन हा आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
पुढच्या दिवशी दुपारी कॅरम खेळायला सगळे जुने मित्र आले. निघाल्या मग जुन्या गप्पा आणि नकळत ते उन्हाळ्याचे दिवस. आठवले ते दिवस जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही काय काय मजा करायचो ते. सकाळी लवकर उठून आम्ही सगळे मित्र शाळेच्या ग्राऊंडवर खेळायला जायचो. इतर वेळी हवीहवीशी वाटणारी ती शाळा उन्हाळ्यात मात्र एकटी आणि भकास वाटायची. सगळे वर्ग कुलूपबंद, सगळीकडे शांतता आणि त्या शांततेत शाळेच्या जवळचे पिंपळाचे झाड वाऱ्याने आवाज करायचे. अश्या वेळी माझ्या मनात एकटेपणाची जाणीव का होत असे मला कधीच कळल नाही, पण शाळा सुटली आणि त्याच गुड माझेच मला नकळत काल कळले, की ती एकटेपणाची जाणीव त्या शाळेलाही आम्हा विद्यार्थ्यांमुळेच जाणवतं होती. शेवटी शिष्याविना गुरूही अपूर्णच नाही का ? असो पण आजही ती शाळा मला हवीहवीशी वाटते हे मात्र नक्की. गप्पा रंगात आल्यावर आम्ही कित्येक वेळ कॅरम खेळत खेळत त्या आठवणी गोळा करत राहिलो. त्यावेळी जो कॅरम मध्ये हरेल त्याला सगळ्यांना पेप्सी खायला घालावी लागत असे. आता तुम्ही म्हणाल पेप्सी तर पेय आहे ते खायचं कस ? तर त्याच अस की आमच्या लहानपणी पन्नास पैशाला पेप्सी कांडी मिळायची आणि ती खायची मजाच वेगळी असायची. त्यावेळी आनंद पन्नास पैशाला भेटायचा. किती स्वस्त होतं ना सगळं?
पुढे मग काही दिवस मी मामाकडे राहायला जायचो. मामाच गाव अस काही लांब नव्हतं आजच बार्शी पासून दहा किलोमिटर अंतर म्हणजे निव्वळ चक्कर मारून आल्या सारखं आहे . हल्ली मी आगळगावला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला फिरत फिरत अगदी सहज जातो. पण १९९७-९८ मध्ये म्हणजे मी त्यावेळी सहा सात वर्षाचा असेल तेव्हा मात्र हे अंतर म्हणजे डोंगर चढून गेल्यासारखं लांब वाटायचं. त्याकाळी सुद्धा सायकल प्रवास करत गावावरून बार्शीला यायचे. पण आम्हा लहानांना अस काही करता येत नसे. टिळक पुतळा म्हणून बार्शीत एक चौक आहे तिथून गावाला जायच्या बस मिळत असतं. तिथे तासनतास थांबल्यावर बस् मिळायच्या त्यातही तुफान गर्दी असायची. हे दहा ते पंधरा किलोमीटरच अंतर बस थाबत थांबत अर्ध्या पाऊण तासात पूर्ण करायची. गावाला गेलो रे गेलो की सगळीकडे नुसता आंब्याचा सुगंध पसरलेला असायचा. अख्खी एक खोली आंब्यानी भरलेली असायची. हे शहरातल एक डझन दोन डझन असल तिथे काही नसायचं. वाटला आंबा खावासा की जायचं खोलीत घ्यायचा एक मस्त आंबा आणि बसायचं खात. तसच खात खात बाहेर जायच गावाकडच्या मित्रांसोबत चावडीवर खेळायला. बैलगाडीत फिरायला, मज्जा मस्ती करायला. मग त्यातही दुपारच्या वेळी आलेल्या गॅरेग्यार वाल्याकडून मस्त गॅरेग्यार खायचं, गॅरेग्यार म्हणजे बर्फाचा गोळा. त्यावेळी आम्ही त्याला गॅरेग्यार म्हणायचो. का म्हणायचो विचारू नका पण म्हणायचो.
बघता बघता दिवस असे निघून जायचे आज्जी आजोबा ,मामा मामी यांच्या सोबत दिवस कसे मजेत जायचे.मग मजेत अजून भर म्हणून मामा व्हिसिआर् आणायचा तेही भाड्याने. मग त्यावर आम्ही जुन्या लग्नाच्या कॅसेट्स बघायचो एखादा चित्रपट बघायचो. जोपर्यंत तो व्हीसिआर परत देत नाही तोपर्यंत त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा. मग सुट्टी संपायला आली की बाबा आणि आई बार्शीला आम्हाला पुन्हा घेऊन जायला यायचे. जाताना अक्षरशः पाय निघत नसायचा. मामेभाऊ तर माझ्यासोबत यायचा हट्ट करायचा. आणि आमची उन्हाळ्याची सुट्टी जवळ जवळ संपायची.
हे सगळं आठवताना नकळत आजचे ते दुरावलेले नाते आठवले जे स्मार्ट फोनच्या एका क्लिकवर कनेक्ट आहेत. आता कोणाकडे सहसा जाणं होत नाही. काहीतरी निम्मित असेल तरच जायचं होत. मेसेज सोडा भेटण सुद्धा दुर्मिळ झालं आणि म्हणूनच की काय हल्ली उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या उन्हाच्या झळां जास्त तीव्र वाटतात. असेल कदाचित ही काळाची महिमा की त्याने क्षणात सगळे जवळ तर आणले पण तितकेच सगळे दुरावले ही. मी म्हणेन दुरावले ते प्रत्येकाच्या गरजेमुळे , प्रतकेजण व्यस्त झाला आपल्या रोजच्या गोष्टीत आणि म्हणूनच कदाचित तो अडगळीत पडलेला कॅरम बोर्ड मला इतका जवळचा वाटला. कारण आता त्याच्याभोवती बसणारी माणसं भेटणं इतकं सोपं राहिलेलं नाही. आवर्जून भेटाव लागत त्यांना. नाहीतर माणसेही अडगळीत पडतात आठवणींच्या.
✍️© योगेश खजानदार

आपल्याही उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.