image

दिवाळीच्या सुट्ट्या आणि मी!!!

  दिवाळी आली की घराकडे जायची ओढ लागायची. शिक्षणासाठी ,जॉब मुळे बाहेर राहत असलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट. मी पुण्यात होतो आणि माझ गाव बार्शी. दिवाळी जवळ आली की बार्शीला जायची ओढ व्हायची. मग काय दिवाळीच्या 4 ,8 दिवस आधी तिकडे जाणं व्हायचं. प्रत्येक वेळी काही तरी नवीन असा अनुभव ही सुट्टी द्यायची. थंडीची सुरुवात अलगद या दिवाळीचा सुखद आनंद द्यायची.

  या सुट्ट्या मधे कित्येक जुन्या मित्रांना भेटन व्हायचं. कोण पुणे , कोण कोल्हापूर,कोण मुंबई कुठे कुठे असायचे. त्यांचे तिथले अनुभव गोष्टी ऐकायला मिळायचे. सगळे बार्शीला आले की आमचे भेटायचे अड्डे सुधा ठरलेले , भगवंत मैदानवर सगळ्यांनी यायचं आणि तेही न चुकता. मग काय!!!  कित्येक गप्पा गोष्टी व्हायच्या , सगळ्यांचे कुठे काय चालू तेही कळायचे. गप्पा आणि चेष्टा मस्करी यात हे दिवाळीचे 8 दिवस कसे जायचे ते कळतही नसायचे.

  आईला मात्र हे दिवस म्हणजे मुलाला किती खायला देऊ असे. फराळाचं खायचं , आणि तिकडे मेस मधे नीट खायला मिळत नाही म्हणून रोज नवीन पदार्थ. असे हे दिवाळीचे दिवस म्हणजे नुसते मस्ती आणि धमाल. आधी लहानपणी सुट्ट्या मिळाल्या की मामाच्या गावाला जायचो आता स्वतच्या गावाला जाण होत. पण हे दिवस तितकेच आठवणीत राहणारे असतात. परत जाताना कित्येक गोष्टी सोबत घेऊन जातात. मनात एक ओल या सुट्ट्याची  नेहमीच राहते.

  आजही ह्या दिवाळीचे दिवस म्हणजे मनात पुन्हा आठवणीचा दिवा लावण्या सारखं असत.  आता कित्येक मित्र आपल्या कामात व्यस्त झालेत. काही मित्र तर बार्शीकडे येतही नाहीत असं कळलं.  दिवस बदलत गेले पण आठवणी मात्र तशाच आहेत. आता पहिल्या सारखे फटाके वाजवावे वाटत नाहीत. पण दिव्यांची आरास आजही मनात त्या मित्रास आठवते हे मात्र नक्की. कोण कुठे आहे हे आता शोधावं लागत. काळा नुसार सर्व बदलत जाते. तसेच झाले !!! आज दिवाळीच्या सुट्टीत काही जुने मित्र भेटले , पण काही कुठेतरी हरवले हे मात्र नक्की.

    पुन्हा परत जाताना या सर्व आठवणी सोबत असतीलच. तिकडे पुण्याला गेल्यावर पुन्हा पुढचे महिनाभर ही सुट्टी डोळ्या समोर राहते. मित्रांची उणीव भासत राहते. आईने दिलेला फराळ या पुण्यातल्या मित्रांसोबत खाताना पुन्हा त्या सगळ्या आठवणी आठवल्या जातात आणि मित्रही पुण्यातले त्यांच्या आठवणी सांगत कधी महिना उलटून जातो कळतच नाही. प्रत्येकाच्या आठवणी ज्याला त्याला अनमोल असतात. मला माझ्या बार्शी आणि दिवाळीच्या आठवणी मनात सतत बोलत राहतात. तर मित्रांना त्यांच्या गावाकडच्या !!! पुण्यातही या दिवाळीच्या सुट्टीची चर्चा होत होत दिवस असेच जातात. आईने दिलेले फराळ कधी संपून जातात कळतं ही नाही. मित्र भेटतात पण whatsapp नाही तर facebook वर .. पण जोपर्यंत ही सुट्टी चालू आहे तोपर्यंत ती मनसोक्त आनंदात घालवायची हे मात्र नक्की… हो ना !!!😊😊😊


-योगेश खजानदार

1 thought on “दिवाळीच्या सुट्ट्या आणि मी!!!”

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा