तुझ्याचसाठी || TUJYACHSATHI MARATHI KAVITA ||

"तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे!!
  तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे!!

 सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे!!
  राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे!!

 कोऱ्या कागदावर उगाच मग, तुझ्याचसाठी लिहावे!!
  शब्दास त्या ओळख तुझी, पण अनोळखी होऊन जावे!!

 बोलेल ती रात्र खूप काही, सारे गुपित लपवून ठेवावे!!
  चांदण्यात उगाच फिरुनी तेव्हा, नकळत तुला शोधावे!!

 एकांती उगाच लाजून का,तुझेच चित्र काढावे!!
  पहावे कित्येक वेळ त्याकडे आणि, स्वतःच मग पुसावे!!

 नजरेत या भाव कित्येक, तुलाच न दिसावे!!
  दूर तू जाता मग , अलगद मी अश्रू टीपावे!!

 कळले हे प्रेम मंद त्या वाऱ्यास, पण तुला न ते बोलावे!!
  कळली ती ओढ त्या पावसास, पण तुला न त्याने भिजवावे!!

 अधीर त्या वाटेवरती, तुलाच मी पहावे!!
  तुझ्याचसाठी श्वास हा सारा,पण तुलाच न कळावे …!!"

 ✍️© योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *