गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||

गणपतीची पट्टी !!! बाहेरच्या मुख्य दरवाजापाशी तीन चार बाळ गोपाळांचा आवाज आला आणि गणपतीचा उत्सव जवळ आल्याचे जणू नकळत सांगून गेला. कुतूहलाने मी बाहेर गेलो, त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप काही सांगून गेला. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तेवढ्यात त्यातल्या एका मुलाने मला विनंती वजा सूचना केली , काका !! २१ रुपयांची तरी पट्टी फाडली पाहिजे बघा !! त्यातला दुसरा लगेच म्हणाला, नाही नाही !! कमीत कमी ५१ ची तरी पट्टी फाडली पाहिजे बघा काका ! मी सगळं हे आनंदाने पाहत होतो !! कारण मला त्या निरागस चेहऱ्यावरचा तो आनंद खूप काही सांगत होता. मग त्यातील एकाने १०१ पट्टी द्यावी लागेल म्हणून सांगितलं. त्यांचा गोंधळ जणू आमच्या शांत सोसायटीला नवी संजीवनी देत होता. सर्वांचं ऐकून झाल्यावर मी मुद्दाम खिशातून ११ रुपये काढले ,तेवढ्यात एकाने लगेच सांगितलं ११ रुपये नाही काका !! कमीत कमी १०१ तरी द्यावी लागेल, आपल्या गल्लीतल्या गणपतीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. एवढ्याशा त्या ओठातून प्रतिष्ठा हा प्रश्न मला क्षणभर चकित करून गेला. मग नाही हो नाही म्हणता म्हणता १०१ रुपये देण्याचे ठरले. मी दहाची नोट खिशात घातली आणि शंभराची नोट त्यांना दिली. त्यांच्या मंडळातला खजिनदार लगेच पुढे येऊन त्यांच्या पावती पुस्तकात माझं नाव लिहू लागला, योगेश अनिल खजा . खजिन … काका खजिनदार का खजानदार ?? मीही सहज म्हटलं अरे खजिनदार तर तू आहेस मी खजानदार. अस म्हणताच सगळे मोठ्याने हसू लागले. पावती माझ्या हातात देताना म्हणाले , काका रोज आरतीला या !! नाही आलात तर प्रसाद हा आणून देईल. त्यातल्या एकाकडे बोट करत पावती देणारा खजिनदार मला म्हणाला. मी बर ठीक आहे !! अस म्हटलं आणि त्यांना आनंदाने जाताना पाहिलं. कित्येक वेळ मी त्या बालगणेश मंडळाला पाहत बसलो, दरवाज्यातच क्षणभर अडखळून राहिलो, त्यानंतर २ ३ घरातील लोकांनी त्यांना लांबूनच हुसकावून लावल,कोणी उद्या देतो ,नंतर या असले कारण सांगून घालवून दिल, पण त्या बालचमुंचा उत्साह काही केल्या कमी होत नव्हता. प्रत्येक वेळी ते नव्या घरी जायचे आणि तेवढ्याच उत्साहाने गणपतीची पट्टी ….!! अशी जोरात हाक द्यायचे !!! दरवज्यात अडखळलेल्या मला मात्र हे बालचमु माझ्या जुन्या लहानपणीच्या आठवणी देऊन गेले. जणू क्षणभर मला वाटलं की कदाचित वयाने मोठ होताना आपल्या हातून हा आनंद नकळत निसटून गेला. सहज हरवून गेला. वयाने विरून गेला.

गणपती यायच्या महिना आधी एका छापखान्यात जाऊन ५- १० रुपयांचे पावती पुस्तक आणायचे , मग सगळ्या मित्रांनी ठरवायचं कुठे पट्टी मागायची ,कधी जायचं , कमीत कमी किती पट्टी जमा करायची, सगळं काही ठरवलं जायचं. मग कोणी ५ रुपये द्यायचे , कोणी ११ रुपये तर कोणी २१ , ओळखीतल कोणी असेल तर लगेच ५१ रुपये द्यायचे. सगळ्या पट्टीचा हिशोब एकाच मित्राकडे असायचा. त्याला मंडळाचा खजिनदार म्हणायचे. गल्लीत कोणाचंच घर सोडायचं नाही, आणि त्यावेळी लोक आवर्जून ५ रुपये का होईना पण बालगणेश मंडळाला पट्टी द्यायचे. असे जमा करून करून गणपती यायच्या २ 3 दिवस आधीपर्यंत १००० १२०० रुपये पट्टी जमा व्हायची. मग गल्लीतल्या एका काकांना घेऊन सगळे आम्ही गणपती कोणता आणायचा हे ठरवायला जायचो. काका ओळखीतल्या गणपती तयार करणाऱ्या मुर्तिकारांकडे घेऊन जायचे त्यामुळे कमीत कमी आमच्या बालगणेश मंडळाचे ५० ते १०० रुपये वाचायचे. मग सुरुवात व्हायची ती गणपतीच्या मंडपाची, १००० १२०० मधले ४०० ते ५०० रुपये गणपती मूर्ति आणण्यातच जायचे त्यामुळे ५०० रुपये बजेट मध्ये अगदी भव्य मंडप घालू असे म्हणणं चुकीचं असायचं, पण दिवसाला १ २ रुपये भाड असलेले दहा वाशे , २ ३ रुपये भाड असलेले ३ ४ पत्रे मंडप बनवणाऱ्या काकांकडून आणायचे. मंडप त्यांनी घालून दिला तर खर्च अजून वाढेल म्हणून पुन्हा आपणच मंडप घालायचा, यावेळी सगळे कार्यकर्ते उपस्थित असायचे. नुसता गोंधळ असायचा गल्लीत , अशात मग कोणाची तरी आई मध्येच यायची आणि त्याच नाव घेऊन जोरात म्हणायची, अरे !! जेवायचं तरी भान आहे का रे तुला !! चल !! आधी जेवण करून घे आणि परत काम करत बस !! अशात जर चुकून आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला तर सगळ्या बालगणेश मंडळात एकच हशा पिकायचा. पण कितीही झालं तरी पटपट जेवण उरकून हा कार्यकर्ता पुन्हा मंडळाच्या कामास लागायचा.

नुसते वाशे आणि पत्रे घालून मंडप काही पूर्ण होतं नाही हे दरवर्षी लक्षात यायचं मग सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जाऊन जुनी आईची साडी घेऊन यायची हे ठरायच. त्यादृष्टीने सगळे आईकडे धाव घ्यायचे, आईला हळूच जाऊन म्हणायचे, आई !! मंडपात पडदा घालायला तुझी एखादी जुनी साडी असेल तर दे !! आईचं उत्तर अगदी यावेळी वेगळच असायचं !! आम्हा बाल कार्यकर्त्यांना वाटायचं आई आता रागवेन पण उलट व्हायचं. आई लगेच कपाटातली एक जुनी साडी काढून द्यायची, आणि देताना म्हणायची, मला माहित होत म्हणूनच मी आधीच साडी कपाटात शोधून ठेवली होती. साडी मिळाल्यावर धावत मंडपाजवळ यायचो ,कोणी कोणती , कोणत्या रंगाची साडी आणली ते पाहायचं, कोणी निळी ,कोणी लाल तर कोणी पिवळी साडी आणलेली असायची. सगळे पुन्हा त्या साड्या मंडपाच्या बाजूंनी लावण्याच्या कामी लागायचे. कोणी घरातला बल्ब आणायचा, तर कोणी घरातला टेबल फॅन आणायचा, कशाला तर बाप्पाला गर्मी लागू नये म्हणून. अस करत करत सगळी तयारी केली जायची. गणपती आगमनाच्या १ २ दिवस आधी सगळं काही व्यवस्थित आहे ना हे पाहिलं जायचं. मग प्रतीक्षा गणपती आगमनाची करायची.

गणपती आगमनाच्या दिवशी सर्वांनी उत्साहात गल्लीतल्या काकांना सोबत घेऊन गणपती आणायला निघायचं, जाताना लगबग लगबग करत, घाईगडबीने कधी एकदा बाप्पाला पाहतोय असं व्हायचं , तिथे पोहचल्यावर मग काका गणपती हातात घ्यायचे , त्यावर गुलाल उधळून त्याच स्वागत करायचे, मग गणपतीला मोत्यांचा हार आणि कुंची घातली जायची , जवळच उभ्या एका गाडेवाल्याला आणि हलगी वाल्याला पैसे किती द्यायचे हे काका ठरवायचे. कुठे जायचं हे सांगितलं जायचं. मग एकदा सगळं ठरलं की सुरू व्हायची गणपती आगमनाची मिरवणूक , त्या हलगीच्या आवाजात सगळे बाल कार्यकर्ते नुसते हरवून जायचे हळूहळू करत आपल्या गल्लिकडे निघायचे. मध्येच मग एखाद्या मोठ्यां लोकांच्या मंडळाचा गणपती मिरवणूक काढून चाललेला असला की त्याच्याकडे पाहून क्षणभर शांत व्ह्याचे, भांबावून जायचे ते पुढे निघून गेले की पुन्हा नाचायला सुरू करायचे. असं करत करत २ 3 तास नाचून नाचून ही मिरवणूक गल्लीत यायची सगळ्या कार्यकर्त्यांच्या आई , वडिलांची मंडळाच्या मंडपात हजेरी लावलेली असायची. आई ,काकू गणपतीचं मोठ्या आनंदाने स्वागत करायच्या आणि मग गणपतीची प्रतिष्ठापना झाली की सगळ्यांनी मोठ्या सुरात आरती म्हणायला सुरुवात करायची, सगळं कसं आजही डोळ्यासमोर जसास तस मला दिसत आहे.

गणपतीची आरती झाली की सर्वांना प्रसाद वाटला जायचा, उरलेला प्रसाद कार्यकर्ते गल्लीतल्या सगळ्या घरात थोडाथोडा देऊन यायचे. मग सगळे हळूहळू आपापल्या घरी गेले की उरल्या कार्यकर्त्यांसोबत गणपतीच्या देखाव्याची चर्चा सुरू व्हायची. कोणी म्हणायचं नरकासुराचा देखावा करू ,तर कोणी म्हणायचं सीता हरण केल्याचा देखावा करू असे विविध विषय ऐकल्यावर मूर्तिकार काकांकडे ज्या देखाव्यांच्या लहान मुर्त्या शिल्लक आहेत त्या आणल्या जायच्या त्याची योग्य मांडणी केली जायची , सगळं व्यवस्थित ठेवलं जायचं. पण त्या हालत्या देखाव्यांना सतत हलत ठेवायची मशीन मात्र काही या बालगणेश मंडळाला परवडण्यासारखी नव्हती , मग त्या मुर्त्याना लावलेल्या दोऱ्या आलटून पालटून सर्व कार्यकर्त्यांनी अगदी मंडळाच्या अध्यक्षांनी सुद्धा मंडपाच्या खाली जाऊन ओढायच ठरवायच. आणि मग तो देखावा जिवंत व्हायचा. मग असच रोज चालू राहायचं. पण दिवसभर मंडपात कोणी नसायचं , कारण सगळे शाळेत जायचे पण शाळा सुटली की संध्याकाळी मात्र ९ १० वाजेपर्यंत सगळे मंडपात बसून असायचे. कोणी गणपतीला दुर्वा वाहायच, कोणी मंडपाची लाईट नीट करायचं, कोणी देखावे नीट चालतात ना ते पाहायचं. विशेष म्हणजे सगळे आवर्जून उपस्थित राहायचे.

पण कधी कधी बाप्पाही जणू या बालगणेश कार्यकर्त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवतो, गणपती उत्सव येतो तो नेमका त्यावेळी पावसाळा असतो, यावेळी अगदी तकलुबी बांधलेल्या या मंडपाची परीक्षा असायची. कधी जोरात पाऊस आलाच तर चारी बाजूने पाणी गळायच , पण बाप्पावर पाणी पडू नये म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांची एकच धडपड असायची. मला आजही आठवत एकदा असाच जोराचा पाऊस सुरू झाला. मी लगेच आमच्या गणपती मंडपात धाव घेतली ,पाहतो तर नेमक गणपती बाप्पाच्या समोरच पाण्याची धार लागली होती, समोर लावलेली उदबत्ती ,रांगोळी सगळं काही अस्ताव्यस्त झाल होत मी लगेच शेजारी लावलेली ताडपत्री गणपती बाप्पाच्या डोक्यावर धरली. फक्त एकच मनात की बाप्पाला पाउस लागू नये , त्यावेळी २ ३ तास पाऊस काही उजाडलाच नाही, भिजत भिजत सगळेच कार्यकर्ते मंडपात जमा झाले. सगळ्यांनी आलटून पालटून ताडपत्री धरली. दुसऱ्या दिवशी पाऊस उजाडल्यावर कुठून पाणी गळतय हे पाहून आम्ही त्याची नीट व्यवस्था केली की जेणेकरून पुन्हा बाप्पाला पाउस लागू नये.

असे करत करत एक दिवस गणपती मंडपात सत्यनारायणाची पूजा केली जाते, त्यावेळी सगळे प्रसादाला येतात. तो आनंद खूप वेगळाच असतो. त्यानंतर २ ३ दिवसांनी अनंत चतुर्थी येते आणि गणपती बाप्पाच्या निरोपाची वेळ येते, वाजत गाजत मिरवणूक काढून गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या!! असं म्हणत निरोप दिला जातो. पण बाप्पा गावाला गेले की कार्यकर्त्यांना पुढचे कित्येक दिवस त्यांची उणीव जाणवत राहते. उत्साहाने सजवलेला मंडप पुन्हा काढताना मन भरून येतं. मग आणलेले वाशे पत्रे परत केले जातात, त्याचा हिशोब पूर्ण केला जातो आणि या बालगणेश कार्यकर्त्यांचा उत्सव पुढच्या वर्षी पर्यंत स्वल्पविराम घेतो कारण पुन्हा नव्याने पुढच्या वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू करण्यासाठी.

आज कित्येक वर्षानी मागे वळून पाहताना या सगळ्या आठवणी या बालगणेश कार्यकर्त्यांना पाहून मनात येतात, त्यामुळे आपण सर्वांनी या बालचमुंचा उत्साह वाढवणं तितकंच गरजेचं आहे. गणपतीची पट्टी !!! हे आवाज आता थोडे कमी होत आहेत हेही तितकंच खरं आहे !! म्हणजे आजचे कित्येक लहान मूल या सुंदर आनंदाला मुकतात. काही लोकांना आपल्या मुलाने पट्टी मागायला जाणे कमीपणाचे वाटते. पण त्यांना एकच सांगणं आहे, गणपती बाप्पाच्या चरणी कोण मोठा आणि कोण लहान ?? सगळे सारखेच आहेत. आणि विशेष म्हणजे हे निस्वार्थ काम आहे !! आपल्या हिंदू संस्कृतीत या अशा सुंदर उत्सवांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपणच आपले सण विसरून कसे चालेल? आणि यातून एक गोष्ट लहान मुलांनाही शिकण्यासारखी आहे की प्रत्येक काम हे हेतू पाहूनच केलं पाहिजे अस काही नाही , कधी कधी निस्वार्थ सेवा ही कित्येक आनंदापेक्षा मोठी असते. यातूनच समाजात जगण्याचा एक धडा मिळतो की प्रत्येक दारावर तुम्हाला हवं ते मिळेल अस नाही, कधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल तर कधी कमी मिळेल, पण याचा अर्थ असा नाही की पुढच्या दरवाज्याकडे जायचंच नाही , तर अस नसतं यातून अस शिकायला मिळतं की, पुन्हा नव्याने उभ राहायचं, जे मिळेल ते आनंदाने घायच, आणि अखेर त्याचा उत्सव करताना , गोळाबेरीज करताना आनंदाने सगळं करायचं. त्यामुळे यानंतर तुमच्या घरासमोर मोठ्याने कोणी गणपतीची पट्टी !!!! अशी हाक बालगणेश कार्यकर्त्यांनी दिली तर आवर्जून मनापासून पट्टी द्या !! आणि त्या बालचामुंचा आनंद नक्की पहा !! त्यात नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

✍️©योगेश खजानदार

ALL RIGHTS RESERVED

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *