क्षणिक यावे या जगात आपण
 क्षणात सारे सोडून जावे
 फुलास कोणी पुसे न आता
 क्षणिक बहरून कसे जगावे!!

 न पाहता वाट पुढची कोणती
 क्षणाक्षणास गंध उधळीत जावे
 कोणी ठेविले मस्तकी उगाच अन
 कोणी पायी त्यास तुडवून जावे!!

 कधी प्रेमाचे बंध जोडून येता
 त्यासवे प्रणयात हरवून जावे
 कधी मग अखेरच्या प्रवासातही
 निर्जीव देहाचे सोबती व्हावे!!

 कोणी बोलता मनातले खूप काही
 आठवणीत त्याच्या चुरगळून जावे
 फूलास न मग पुसले कोणी
 वेदनेतही सुगंध कसे देत रहावे!!

 अखेरच्या क्षणात राहिले जरी काही
 आयुष्याशी कोणते वैर नसावे
 सुकल्या पाकळ्या वरती मग तेव्हा
 आपल्या जाण्याचे ओझे नसावे!!

 राहता राहिले इथे न काही
 क्षणाक्षणाला आयुष्य जगत रहावे
 फुलास विचारून बघ तु एकदा
 क्षणिक बहरून कसे जगावे ..!!

 योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE

Comments are closed.