दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड,  विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे आणि सुरु व्हायची किल्ले बांधणीची सुरुवात. मधुनच आईची एक हाक ऐकु यायची ‘जास्त मातीत खेळु नका रे !!’ आणि त्याला आम्ही ‘हो आई नाही खेळत!!’ म्हणुन उत्तर द्यायची. मग सकाळी जे सुरुवात करायची किल्ला बांधण्याची ती थेट 2 3 दिवस चालायची.

  सुरुवात व्हायची ती माती घेऊन येण्या पासुन. घरातील एक जुनाट पोत घ्यायच, आई नको म्हणत असताना ही आणायचं. ‘ही माती चांगली आहे.. घ्या रे .! ‘भैया ने सांगायच कारण आमचा मुखीया तोच असायचा. मग शेजारच्या मित्रानी आणि मी भराभर माती घ्यायची आणि घरा जवळ आणायची. पुन्हा सुरुवात ती मोठा दगड हुडकून आणायची. तो कुठे भेटलाच की कसा आणायचा ही एक मज्जाच असायची. कित्येक वेळा बोट सापडन, कापण , खरचटन असले प्रकार सर्रास व्हायचे.

  सगळ्या आवश्यक गोष्टी एकत्र केल्या नंतर भैया मातीत पाणी ओतुन त्याचा व्यवस्थित चिखल करुन किल्ला बांधणीचं उदघाटन करायचा. सर्वाच्या मताने किल्ला कसा झाला पाहिजे याची चर्चा सुरू व्हायची. एमताने नंतर शेवटचं ठरायच आणि मग सगळेच किल्ला बांधण्यात व्यस्त होऊन जायचे. एकदा सुरुवात झाली की किल्ला बांधनीसाठी अजुन आमचे मित्र कधी जमायचे कळायचंही नाही दोनाचे पाच व्हायचे. शेवटचा हात मार योग्या त्या बुरुजाच्या बाजुने!! अस भैया म्हटला की अखेर किल्ला बांधणीच काम पुर्ण झालं अस समजायचं.

  आता राहता राहिला प्रश्न सजावटीचा तर मग किराणा दुकानातुन लाल कलर त्याला काव म्हणायचे तो आणायचा आणि चुना. मग तटबंदीला मस्त लाल कलर लावुन चुण्याची सजावट म्हणुन उपयोग व्हायचा. किल्ला सुंदर आणि आकर्षक दिसावा म्हणुन आळीव आणि काही धान्य टाकायचं. दोन तीन दिवसात ते उगवुन यायचं. मग रोज त्याला वेळेवर पाणी घालायचं काम माझ्याकडे असायचं.

   किल्ला पुर्ण झाला की स्वच्छ हात पाय धुवुन थेट स्वयंपाक घरात जायचं. दिवसभर केलेल्या मेहनती मुळे प्रचंड भुक लागायची. आई तयारच असायची प्लेट भरुन फराळ देण्यासाठी. मी , भैया आणि आमचे मित्रमंडळी मस्त ताव मारायचो त्यावर. करंजी , चिवडा , चकल्या किती पहावं तेवढे फराळाचे प्रकार खाऊन पुन्हा किल्ल्या जवळ सगळे यायचो. आता किल्लावर शिवाजी महाराजांची मुर्ती आणि मावळे ठेवले जायचे. संध्याकाळी किल्लावर दिवे लावुन त्यासमोर आई रांगोळी काढायची. अशी एकूण सजावट झाली की किल्लाकडे नुसत पाहातच राहवस वाटायचं. त्या दिव्याच्या प्रकाशात किल्ला आणि शिवरायांची मुर्ती अगदी जिवंत वाटायची. साक्षात शिवरायच आपल्या घरी आले आहेत अस वाटायचं.

  अशी सगळी धमाल दिवाळीत व्हायची किल्ला , फटाके आणि फराळ यांनी नुसती भरुन जायची. तो आनंद तो उत्साह वेगळाच होता. लहानपण परतुन यावं म्हणतात ते यासाठीच अस मला वाटतं. इथे ना कोणत्या गोष्टींची चिंता होती ना ओढ. होतं ते फक्त छोट्या छोट्या गोष्टीत आनंदाच जगणं.. अगदी क्षणाक्षणात.. प्रत्येक मनातं… आज जुने फोटो पहाताना ते मनात पुन्हा जगल्या सारखं वाटलं..

© योगेश खजानदार

SHARE