आटपाट नगर होते. तेथे एक गरिब ब्राह्मण राहात होता. त्याला एक मुलगी व सात मुलगे होते. त्याच्या पत्नीचे नांव धनवंती तर मुलीचे नांव गुणवंती असे होते. त्याच्या घरी एका परंपरेप्रमाणे आलेल्या ब्राह्मणाची पूजाकरुन सगळ्यांनी त्याला भिक्षा घालण्यालून नमस्कार करण्याची प्रथा होती.
एके दिवशी सूर्यदेवासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगल्यांनी त्याची पूजा केली. सातही सुनांनी त्याला भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मणाने त्यांना आशिर्वाद दिला. संपत्ती वाढो, संतती वाढो, तुमचे सौभाग्य अक्षयी राहो. धनवंतीने आपल्या मुलीलाही सांगितले की, तू भिक्षा घाल. गुणवंतीने त्या ब्राह्मणाला भिक्षा घातली. नमस्कार केला. त्याने तिला आशिर्वाद दिला, धर्मिणी हो. गुणवंतीने आईला सांगितले की, त्या ब्राह्मणाने वहिनींना जसा आशिर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली चल पाहू, तू परत भिक्षा घाल. मुलीने परत भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मणाने आशिर्वाद दिला. धर्मिणी हो ! तेव्हां धनवंतीने विचारले हीला असा आशिर्वाद कां दिला ? ब्राह्मण म्हणाला हिला लग्नांत वैधव्य येणार आहे.
धनवंतीने ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाली जो ” अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. ” माझ्या एकुलत्या एक मुलीचे असे होऊ नये, म्हणून कांही उपाय सांगा.
ब्राह्मणाला तीची दया आली. तो म्हणाला बाई तुम्ही रडू नका. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. साता समुद्रा पलीकडे एका बेटावर सोमा नावाची एक परटीण तीच्या कुटुंबासह राहते. तिला तुमच्या मुलीच्या लग्नाला बोलवा. म्हणजे तुमच्या मुलीवर येऊ पहाणार वैधव्य टळेल. लग्न झाला की सोमाची चांगली बोळवण करा.
धनवंतीने ही गोष्ट आपल्या नवर्याला सांगितली. कोणीतरी सोमा परटीणाला जाऊन आणल पाहिजे. त्याने आपल्या सातही मुला बोलावले व सांगितले की, बहीणीच्या सौभाग्यासाठी साता समुद्रापलीकडे जाऊन सोमा परटीणीला घेऊन यायला कोण तयार आहे. परंतु सातही मुलांपैकी कोणीही तयार झाला नाही. ते म्हणु लागले की, तुमची माया गुणवंतीवर- आपल्या मुलीवरच आहे आमच्यावर नाही.. झाले धनवंतीला वाईट वाटले व ती रडू लागली. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, तू कांही काळजी करु नकोस व रडू नकोस.न मी गुणवंतीबरोबर जाऊन सोमा परटीणीला घेऊन येतो. आपल्याला मुलगे असून आपण निपुत्रिकच आहोत.
सर्वांत धाकट्या मुलास वाईट वाटले. तो म्हणाला बाबा आपण असे म्हणू नका. मी सोमाला आणायला जातो. असे बोलून तो गुणवंतीबरोबर आई-वडिलांना नमस्कार करुन गुणवंतीबरोबर निघाला.
जाता जाता समुद्र आला. वार्याचा सोसाटा चालू झाला. समुद्रावर मोठ मोठ्या लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसे जावे समजेना. जवळ कांही खायला नाही, प्यायला नाही. सारे त्रिभुवन दिसू लागले. भगवंताचे स्मरण केले, देवा, देवा आता तूच या संकटांतून सोडव. असा देवाचा धावा केला. तिथे एक वडाचे झाड होते. त्याच्याखाली जाऊन दोघे बसली. सारा दिवस उपवास घडला. त्या झाडावर गृद्ध पक्षांचे एक घरटे होते. त्या घरट्यांत त्यांची पिल्ले होती. संध्याकाळी गृद्ध पक्षी घरी आले. पिलांना चारा देऊ लागले. पिल्ले कांही चारा खाईनात. त्यांनी आपल्या आई-बापाला सांगितले. आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत. ते झाडाखाली उपाशी बसले आहेत. त्यांना टाकून आम्ही चारा खाणाार नाही. गृद्धपक्षी झाडावरुन खाली आले. ते ब्राह्मणाला विचारु लागले. तुम्ही दोघे असे काळजींत कां आहात ? तुमच काय काम असेल ते आम्हाला सांगा. आम्ही ते करु. उपाशी राहू नका. आम्ही कांही फळे देतो. ती खा. ब्राह्मणाला आनंद झाला. त्याने देवाचे आभार मानले. त्या गृद्धपक्ष्यांना त्याने त्यांचा हेतु सांगितला. पक्षी म्हणाले तुम्ही काळजी करु नका. उद्या उजाडल्यावर आम्ही तुम्हाला घेऊन जातो. सोमा परटीणीच्या घरी नेऊन सोडतो. मग बहिण-भावानेग फळे खाल्ली व झाडाखाली झोपी गेली.
उजाडल्यावर पक्षी आले. बहिण-भावाला पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडले. मग ते निघून गेले. बहिण-भावाने एकमेकांशी काही ठरवले. रोज पःहाटे ते उठू लागले, सोमा परटिणीचे अंगण झाडू लागले, शेण आणून अंगण सारवू लागले, असे करता करता बरेच दिवस होऊन गेले. एके दिवशी सोमापरटिणीने आपल्या मुलांना व सुनेला विचारले, रोज सकाळी उठून अंगण झाडून कोण सारवून ठेवते. ते म्हणाले आम्ही नाही.
मग सोमाने दुसर्या दिवशी रात्री पहारा केला. तेव्हा चौथ्या प्रहरी ब्राह्मणची मुलगी व मुलगा अंगण झाडतांना व सारवतांना दिसले. सोमाने त्यांना जवळ बोलावले व विचारले की तुम्ही कोण आहात व हे कां करत आहात? त्यांनी तीला सर्व हकिगत सांगितली. तेव्हा सोमा म्हणाली तुम्हा ब्राह्मणांकडून परटांनी सेवा घ्यावी हे पाप आहे. तेव्हा मुलाने सांगितले की या माझ्या बहिणीच्या लग्नास तुम्ही यावे म्हणून आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत. तुम्ही लग्नास आलात तर हिचे वैधव्य टळेल. तेव्हा सोमा म्हणाली चला मी येते. घरांत जाऊन मुला-सुनांना सांगितले मी या मुलीच्या लग्नास जात आहे. लग्न झाल्यावर येईन. तोपर्यंत आपल्या घरांत किंवा सोयर्यांच्या घरी कोणी मेल तरी त्याच दहन करुं नका. असे सांगून ती गेली. समुद्राच्या पलीकडे मुलगा व मुलीला पार करविले. स्वतः आकाशमार्गाने समुद्र पार करुन आली. ब्राह्मणाच्या घरी ते सर्व पोहोचले. ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सोमा परटीण लग्नास आली म्हणून फार आनंद झाला. मग भावांनी बहिणीला योग्य असा नवरा शोधला मोठ्या आनंदांत लग्न झाले. अचानक नवरा धाडकन मंडपांतच पडला. दुःखाची अवकळा सगळीकडे पसरली. तेव्हा सोमा परटीणीने नवर्या मुलीजवळ येऊन सांगितले. मुली घाबरु नकोस मी तुला माझे सोमवतीचे पुण्य देते तुझा नवरा जिवंत होऊल. मग सोमाने हाती उदक घेऊन संकल्प करुन आपले पुण्य गुणवंतीस (नवर्या मुलीस) दिले. तसा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला.
मग दोन दिवसांनी सोमा परटीण घरी निघाली. सर्वांनी मोठ्या थाटाने तिची बोळवण केली. इकडे सोमाच्या घरी काय घडले होते? अगोदर तिचा मुलगा मरण पावला होता. नंतर नवरा मरण पावला. मग जावईसुद्धा मेला. सोमा आपल्या घराची वाट चालतच होती. मार्गावर एके दिवशी सोमवती अंवस पडली. त्या दिवशी एक म्हातारी तिला भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. ती सोमाला म्हणाली एवढा भारा खाली उतर. आपण दोघी बरोबर जाऊं. सोमा म्हणाली आज सोमवती अवंस आहे. मला नेम आहे. धर्म आहे. मला कापसाला शिवायचे नाही. पुढे जाता जाता ती एका नदीच्या काठी आली. तिथे पिंपळाचे झाड दिसले. तीने नदीवर स्नान केले. श्रीविष्णूची पूजा केली. तिच्याजवळ काही नव्हते म्हणून एकशे आठ वाळूचे खडे घेतले व पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या. या एवढ्या पुण्याने काय झाले? सोमा परटीणीच्या घरी मरण पावलेले, तिचा मुलगा, नवरा व जावई जिवंत झाले.
मग सोमा परटीण मजल दर मजल करत घरी पोहोचली. घरी आल्यावर तिच्या सुनांनी तिला संगितले सासुबाई, सासुबाई तुम्ही लग्नाला गेल्यानंतर घरांतील सर्व मेले होते. त्यांना आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसेच ठेवले होते. तुमची वाट बघत बसलो होतो. आता तुम्ही येण्या अगोदरच सर्व जिवंत झाले. हा चमत्कार कशाने झाला? मी माझे सोमवतीचे पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिले, तिचा नवरा जिवंत झाला. माझे सर्व पुण्य संपले म्हणुन इथे माझ्या घरी असे अशुभ घडले. मी येत असतांना मला सोमवती अवंस पडली, मी परत व्रत केले. कापसाला शिवले नाही. मुळ्याला शिवले नाही. नदीवर अंघोळ करुन श्रीविष्णुची पूजा केली आणि पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या. या व्रताच्या पुण्याने माझी मेलेली माणसे परत जिवंत झाली. तुम्हीही ह्या व्ताचे आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य येणार नाही. संतत संपत अक्षयी राहील.
तेव्हां सुनांनी विचारले, हे व्रत कसे करावे ? तशी सोमा म्हणाली, सोमवती अवसेला सकाळी लवकर उठावे. स्नान करावे. मुक्याने म्हणजे कांही न बोलता वस्त्र नेसावे. पिंपळाच्या पारावर जावे. श्रीविष्णुची पूजा करावी. श्रीमंतांनी हिरे, माणके घ्यावी, पोवळी घ्यावी, सोन्या-रुप्याची भांडी घ्यावी, गरीबांनी आपल्या ऐपतीप्रमाणे सर्व घ्यावे. चांगली पुष्पे, फळे घ्यावी. हे सर्व एकशे आठ घ्यावे. तितक्याच प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात. आपण घेतलेले सर्व ब्राह्मणाला दान द्यावे. सवाष्ण-ब्राह्मण जेवू घालावे. आपण मुक्याने जेवावे. असे व्रत केल्यास वैधव्य येत नाही.इच्छित फळ मिळते. संतत संपत्ती वाढते. तशीच आपलीही वाढो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.