कपाट (मनाचं) || KAPAT MARATHI KAVITA||

‘मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता येत नाही..!!या आठवणी कधी नकळत मनात समावल्या, तर कधी आवर्जून आठवणीत ठेवल्या ..!! अगदी कपाटात अस्ताव्यस्त कपड्यांचं बोचक ठेवावं तस ..!! त्यामुळे मनाच्या कपाटास उघडताना अलगद उघडाव .. नाहीतर आठवणी अगदी बोचक अंगावर पडावं तश्या पडतील !! नाही का ??’ ….

 "मनाचं कपाट, अगदी अलगद उघडाव
 नाहीतर नकळत आठवणींच..
 बोचक अंगावर येत.!!
 मग अस्ताव्यस्त होऊन सर्वत्र पसरत
 आणि उगाच मग गोंधळ होतो ..!!

 आवराव म्हटलं तरी मग ते ..
 उगाच गुंतत जातं ..!!
 कधी कोणाच्या प्रेमाची
 अलगद साक्ष देऊन जात ..!!
 कधी क्षणांना पुन्हा, मागे घेऊन जात ..!
 कधी स्वतःच एकटं, हसत राहतं ..!!
 हे आठवणींच बोचक आहेना ..!! 
 पुन्हा ते क्षण दाखवून जात !! 
 अगदी क्षणभर का होईना, दोन टिपूस गाळून येतं!!
 एकदा तरी त्या आठवणींना, घट्ट मिठी मारून येतं  ..!!
 कितीही आवराव म्हटलं तरी ..!!
 तितकंच ते पसरत जातं ..!!

 आणि मग,
 पुन्हा त्या  कपाटाकडे पाहताना,उगाच वाटत.!!
 हे आठवांच बोचक , एवढं कधी जमा केलं ..!!
 क्षण क्षण जगताना , लक्षही नाही दिलं!!
 एवढ्याश्या कपाटात, सारं आयुष्य रीत केलं ..!!!
 काही वाईट जपलं , काही आनंद देऊन गेलं..!
 कुठे क्षणभर विश्रांती ,तर कुठे रखरखत उन्ह दिलं ..!
 या आयुष्याने सार काही दिलं ..!!
 ज्यात हे मन आणि त्या मनात आठवणींच ..!!
 एक छोटंसं कपाट त्याने दिलं ...!!" 

 ✍️©योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *