सख्या तुझी ही ओढ अनामिक, मज का उगा छळते !! तुझ्या असण्याची जाणीव मला, क्षणाक्षणात देते !! बरसतात कित्येक सरी, चिंब मी भिजते !! भिजल्या त्या मिठीत माझ्या, उगा तुला शोधते !! सांग कसे समजावू मना, ना कोणा ऐकते !! कोऱ्या कागदावर सहज ते , चित्र तुझे रेखाटते !! बहरून गेल्या वेलीस का ?? उगा ते सांगते !! तुझ्या गंधात गंध मिसळून, जणू ते दरवळते !! वेड्या मना उगा ते बोलणे, ना कोणा पाहते !! तुझ्या आठवांच्या जगात का जणू, सहज मी हरवते !! असे कसे हे अबोल प्रेम ,तुलाच न कळते !! तुझ्याचसाठी लिहिली कविता, तुलाच न बोलते !! येशील परतून पुन्हा त्या वाटेवर, वाट तुझी पाहते !! तुझ्या येण्याची ओढ ती अनामिक, मज का उगा छळते !! ✍️© योगेश खजानदार
