प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो..
  मी कोणी राजकारणी नाही. किंवा कोणी राजकीय विश्लेषक ही नाही. मी तुमच्यातला एक सामान्य माणूस आहे. गेला महिना दीड महिना महाराष्ट्रात चाललेला पोरखेळ पाहून वाईट वाटण्या पलिकडे मी काहीच करू शकत नाही. तुम्ही मत कोणालाही दिलं असेल पण त्याचा परिणाम काय झाला हेही आपण पाहत आहात. आपल्यातले काहीं कट्टर हिंदू विचारांचे असतील, आपल्यातले कित्येक शिवसैनिक असतील कोणी डाव्या विचारांचे असतील आणि कोणी धर्मनिरपेक्ष असतील. पण एक लक्षात ठेवा तुम्ही आज तुमच्या विचारांचा उडणारा पोरखेळ पाहून हताश होऊन बसण्या पलिकडे काहीच करू शकत नाही.

लक्षात ठेवा तुम्ही आपल्या विचारांसाठी कित्येक लोकांशी वादही घातला असेल. मग आज आपले नेते आपल्या विचारांची पुडी गंगेत सोडून तुमच्या विपरीत विचारांच्या लोकांशी जेव्हा सलगी करून सत्ता स्थापन करू शकत असतील तर एक मतदार म्हणून तुमची आमची आज लायकी तरी काय आहे सांगा ना?? आज सत्ता पेच समोर आल्या नंतर खुद्द कोर्टालाही या मतदार बंधू आणि भगिनींचा विसर पडावा ही कोणती लोकशाही?? आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी चाललेला हा सावळा गोंधळ पाहून आपण करायचं तरी काय सांगा ना ?? जस आपल्या परिसरातील खासदार , आमदार नगरसेवक निवडून द्यायचा अधिकार आपल्याला आहे तसेच या राज्याचा मुख्यमंत्री जनतेने निवडून द्यावा ही सुधारणा का होऊ नये??

 भाजपा एक कट्टर हिंदुत्ववादी ,शिवसेना एक कट्टर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी मोठ्या विचारधारेची पार्टी , काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष पार्टी या असल्या गोष्टी या पुढे कोणत्याही पार्टींनी केली तर तुम्ही आणि मी हसणार यात काहीच वाद नाही. कारण आज महाराष्ट्रात जे चाललं आहे त्याचा फायदा गल्लीबोळात आपले भविष्य सोडून राजकीय नेत्यांच्या मागेपुढे फिरून स्वतःच वाटोळे करून घेणाऱ्या लोकांना नक्कीच कळल असेल. पण एक भीतीही यामुळे मनात येत आहे की पुढे येणारा तरुणवर्ग या लोकशाहीकडे पाठ वळवून जावू नये म्हणजे झालं. कारण तुम्ही येणाऱ्या पिढीला या राजकारणात, या लोकशाहीत उदासीन करत आहात हे लक्षात ठेवा. आणि याचा दोष सगळ्याच प्रतिभावंत राजकीय पार्ट्यांना मी तरी देईन(आणि तसंही या लोकशाहीत माझ्या मताला किँमत आहे तरी कुठे !!बरोबर ना ??)

आपल्याच नेत्यावर विश्वास नाही म्हणून डांबून ठेवणं, सत्ता स्थापन होत नाही म्हणून घोडेबाजार करणं याला म्हणायचं तरी काय ?? ज्या आमच्या आमदाराला आम्ही एका विशिष्ठ विचारधारेचा म्हणून निवडून दिलं त्याच्यावरच जर तुमचा विश्वास नाही.तर मग आम्ही पुढच्या वेळी त्याला निवडून तरी का द्यायचं सांगा ना ?? आणि घोडेबाजार करून कोणते विचार उगवणार तेही एकदा सांगा ?? एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. आणि असही तुम्हाला वेळ आहे तरी कुठे ना !करा कोणाचीही सत््ता स्थापन करा !! आम्ही काय आहोत नाहीतर नाही!! ! असो पण या सर्व बाबी लक्षात घेऊन एक मात्र गोष्ट लक्षात आली. सत्ता कोणाचीही असो सामान्य माणूस हा असाच भरडत राहणार, शेतकरी असाच आत्महत्या करत राहणार, तुम्ही आम्ही असेच रस्त्यावर खड्डे चुकवत चुकवत एखाद्या खड्ड्यात पडून मरून जाणार. कारण सामान्य लोकांची लायकीच ती आहे, हो ना ?? 

तात्पर्य: सत्तेसाठी काहीपण !! मतदाराला विचारते कोण ?

✍️©योगेश खजानदार

 

SHARE