आई || कथा भाग ९ || Mother Daughter Story ||

भाग ९

शीतल घाईघाईत एअरपोर्टवर येते , लवकरात लवकर कोणती फ्लाईट आहे का यासाठी विचारणा करते.
“सॉरी मॅम , पण फ्लाईटला अजून दोन तास तरी लागतील. “
“या आधी एकही फ्लाईट नाही का ??”
“नाही !!”

पुढे काय करावं या विचारात असताना ती बसने प्रवास करण्याचा विचार करते. थोडा जास्त वेळ लागेल पणं हळूहळू मी घराच्या दिशेने पुढे तरी जात राहील या विचाराने शीतल बसने जाण्यासाठी निघते.

” हे सगळं माझ्यामुळे होत आहे. त्रिशाच्या अशा परिस्थितीला मीच जबाबदार आहे , मला पुढे जायचं होत , पंख पसरून आभाळात झेप घ्यायची होती. पण हे सारं काही एकटी मी करू शकते या वेड्या गैरसमजातून मला आज इथे आणून ठेवलं आहे. कशासाठी केला मी हा अट्टाहास , चांगलं घरी राहिले असते , त्रिशाची काळजी घेतली असती , पण नाही !! मला मात्र वेगळंच राहायचं होत. पण मला कधी कळलच नाही की मी अपूर्ण आहे , त्रिशा शिवाय, मी अधुरी आहे समीर शिवाय !! हो मी अधुरी आहे !! समीरला मी नकळत म्हणाले होते की अनाथ मुले सुद्धा जगतात, वाढतात आयुष्य घालवतात, पण आईशिवाय तेही तितकंच अपूर्ण आहे. सगळं काही माझ्यासाठी मी पाहिलं !! पण नशिबाने माझ्या आयुष्यात आलेल्या त्रिशाला मी एकट सोडलं !! हो मी एक सोडलं !! मी खरंच खूप वाईट आहे !! मी जन्म देऊन तिची आई झाले पणं आईची कर्तव्य पूर्ण करण्यात मी कमी पडले !! खरंच माझं खूप चुकलं !! “
भरधाव वेगाने निघालेल्या बसमध्ये शीतल शांत बसून होती तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालु झाला होता. तिचं मन केव्हाच त्रिशा जवळ आले होते.

समीर शीतल येणार म्हणून तिची वाट पाहत बसला होता. आईला हे सांगताच तीही शीतलची काळजी करत होती.
“समीर अरे मध्यरात्र उलटून गेली. शीतल अजून कशी आली नाहीये !! एवढी काय घाई केली तिने यायची !! सकाळी निघाली असती तर बरं झालं असतं!!”
“आई बसने येतेय ती !! फ्लाईट मिळाली नाही तिला !! वेळ तर लागणारच ना !! “
“एवढ्या रात्री बसने यायची काही गरज होती का ?? शीतल ऐकत म्हणून नाही कोणाचं !! आल्यावर तिला चांगली रागावणार आहे मी !! “
“हो आई रागावच तू तिला !! पण आधी येऊ तरी दे तिला !! “
“हो !! बरं अरे जेवण तरी करुन घे तू आता !! का आज उपाशीच राहायचा विचार आहे तुझा ??”
“आई मला ना भूकच नाहीये आता !! शीतल येईपर्यंत मला काही दुसर सुधरणार नाही बघ !!”

समीर आणि आई दोघेही शीतलची वाट पाहत बसले. आता समीरला शीतलची काळजी वाटू लागली होती. पहाट व्हायला लागली होती तरीही शीतल अजून आली नव्हती. समीर सारखा दरवाजाजवळ जाऊन बाहेर डोकावून पाहत होता. तेवढ्यात मागून शीतल आल्याचा आवाज झाला. समीरने मागे वळून पाहीले ती शीतल होती. शीतलने क्षणाचाही विचार न करता समीरला मिठी मारली. तिच्या डोळ्यात क्षणात पाणी आले, समीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. बाजूला उभ्या आईलाही क्षणभर भरून आलं. समीर पासून लांब होताच शीतलने आईला मिठी मारली.
“पोरी !! किती दिवसांनी पाहिलं मी तुला !!”
शीतलने सासूबाईंना घट्ट मिठी मारली.
“आई !! “

समीर सगळं बाजूला उभा राहून पाहत होता. शीतल क्षणभर शांत राहिली स्वतःला सावरत ती घरात आली. घरात येताच तिने समीरला विचारलं ,
“त्रिशा ??”
“आईच्या बेडरूममध्ये आहे !!”
हातातलं सामान बाजूला ठेवत ती धावत खोलीत गेली. समीरही तिच्या मागे आला. समोर पाहते तर त्रिशा शांत झोपली होती. शीतल तिच्या जवळ गेली. तिला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला, त्रिशाला पाहून तिला खूप आनंद झाला , तिच्या गालाचे चुंबन घेत तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. समीरकडे पाहत ती बोलू लागली,
“त्रिशा! समीर आपली त्रिशा!!! “
समीरने होकारार्थी मान हलवली. तिच्या जवळ जाताच पुन्हा शीतलने समीरला मिठी मारली.
“मी चुकले समीर !! मी अस तुम्हाला सोडून जायला नव्हतं पाहिजे !! “
“शीतल !! काही झालेलं नाहीये एवढं !! तू पहिले शांत हो बर !! बस बर इथे !!”
समीर शीतलला बाजूच्या खुर्चीवर बसवत म्हणतो.
“मी गेले तेव्हा किती लहान होती ना !! आता बघ ना मोठी झाली आहे त्रिशा !!”
“हो ना !! अगदी तुझ्यासारखी दिसत आहे आता !!” समीर शीतलकडे पाहत म्हणाला.
“नाही रे !! तुझ्यासारखी दिसते आहे !! ” शीतल त्रिशाकडे पाहत म्हणाली.
“शूऽऽऽऽऽ !!उठेन ती झोपेतून !! ” आई खोलीत आली, आई शीतलच्या हातात पाण्याचा पेला देत बोलू लागली.
“समीर शीतल !! आता जाऊन झोपा बर दोघे !! सकाळ व्हायला जेमतेम तास उरलाय आता !! “
“आई कधी एकदा त्रिशाला मिठीत घेतेय अस झालंय मला !! त्याशिवाय मला झोप लागणारच नाही !!”
” हो शीतल !! पण तरीही आता थोड सासूबाईंचही ऐकलं पाहिजे ना ?? बॉसच ऐकतस तस !!”
आई मिश्किल हसत म्हणाली. शीतलच्याही ओठांवर हसू आले.

समीर आणि शीतल दोघेही आपल्या खोलीत आले. शीतल कित्येक वेळ समीरच्या मिठीत राहिली.
“अरे हो हो !! शीतल ! आहे मी इथेच !! “
“गप रे !! ” शीतल समीरला अजून घट्ट मिठी मारत म्हणाली.
“शीतल !! माझी आठवण येतं होती की नाही तिकडे ??”
“अजिबात नाही !! ” शीतल हसत म्हणाली.
“हो का ?? !!मलापण तुझी आठवण अजिबात आली नाही बरं !!”
“माहितेय मला !! तू आहेसच दगडाचा !! तुला काही फरक पडत नाही !! “
“दगड म्हणालीस तू मला ??दगड ??”
“हो !! मला एकदा सुद्धा भेटायला आला नाहीस तू पुण्यात !! मी एकटी कशी राहते !! काय खाते !! कुठे राहते !! काही काही पाहिलं नाहीस तू !! “
“माझी बायको आहेच ना तशी !! माहितेय मला !!एकदम स्मार्ट ,हुशार , निर्भिड त्यामुळे नाही विचारलं मी !!”
“हो का ?? “
“हो तर !! बरं आता झोप बर !! तासभर तरी झोप घे !! प्रवासातून आली आहेस !! थकली आहेस तू !! “
“नाही समीर !! मला नाही झोप येणार !! त्रिशाला जोपर्यंत मी माझ्या मिठीत घेत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही !!”
” हो पण !! तरीही !!”
“नाही समीर !! तू झोप हवं तर !! “
“शीतल !! मला तरी कशी झोप येईल !! “

समीर आणि शीतल कित्येक वेळ गप्पा मारत बसले. पण शीतलचे मन त्रिशाला भेटण्यासाठी आतुर झाले होते, त्रिशा झोपेतून उठण्याची ती वाट पाहू लागली. समीरही तिच्या सोबत कित्येक वेळ बसून राहिला. शीतलने समीरला ऑफिसबद्दल सांगितलं, समीरनेही आपल्या मनातल्या कित्येक गोष्टी शीतलला सांगितल्या.या गप्पा गोष्टी चालु असतानाच शीतल आणि समीरला आईच्या खोलीतून त्रिशाचा दंगा करतानाचा आवाज आला,
“समीर !! त्रिशा उठली बहुतेक !! हो समीर !!”
शीतलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. ती पटकन जागेवरून उठली, धावतच ती आईच्या खोलीत गेली. समोर त्रिशा बेडवर झोपेतून उठून खेळत होती. क्षणभर तिने शीतलकडे पाहिले , शीतलही क्षणभर त्रिशाकडे पाहत राहिली. शीतलच्या डोळ्यात पाणी आले, ती धावतच त्रिशा जवळ गेली. तिला मिठीत घेतले, तिच्या चेहऱ्यावर तिने कित्येक वेळा चुंबन केले. हे सगळं होताना त्रिशा एकटक शीतलकडे पाहू लागली. तिच्या बाल मनाला काहीच कळतं नव्हते.
“त्रिशा !! मी तुझी आई !! ओळखलस मला !! “
समीर आणि आई मागे उभा राहुन हे सगळं पाहत होते.
अचानक शीतल जवळून त्रिशा रांगत रांगत आज्जीकडे गेली. आज्ज्जीच्या जवळ जाऊन ती शीतलकडे अनोळखी असल्या सारखे पाहू लागली.
“ये बाळा !! ओळखलं नाहीस ना मला तू !! मी तुझी आई आहे ग !!”
शीतल जणू आपलं भान हरपून बोलत होती. समीर शीतल जवळ जाऊन तिला सावरू लागला.
“शीतल !! शीतल !! ओळखेल ती थांब जरा !! खूप दिवसांनी तू समोर आलीस म्हणून बावरली आहे ती !! “
“नाही समीर !! रागावली आहे ती माझ्यावर !!! मी अस तिला एकटं सोडून गेले ना म्हणून !! “
“त्रिशा ऐक ना !! आता नाही हा मी तुला सोडून जाणार कुठं !! ये ना !! जवळ ये आईच्या !! “
शीतल त्रिशाकडे हात पुढे करून बोलते. त्रिशा मात्र अनोळखी असल्या सारखे शीतलला फक्त पाहत राहते.

समीर शीतलला कसेबसे मनवून आपल्या खोलीत घेऊन येतो, शीतलला समजवण्याचा प्रयत्न करतो.
“शीतल !! शांत हो !! हे बघ !! खूप दिवसांनी तुला पाहिलं ना !! त्यामुळे तशी करते आहे ती !! बघ थोड्या वेळाने रांगत रांगत तुझ्याकडे येते की नाही ते !! “
” नाही समीर !! त्रिशा विसरून गेली रे मला !! आपल्या आईला विसरून गेली ती !! ज्यावेळी मी तिच्या सोबत होते तेंव्हा तिला काहीच समजत नव्हतं !! आता ती माणसं ओळखायला लागली आणि तेव्हाच मी तिच्या जवळ नव्हते !! “
“अस काही नाहीये !! “

समीर कित्येक वेळ शीतलची समजूत काढत राहिला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *