भाग ५
विमानाच्या वेगाने शीतल सगळं काही मागे सोडून निघाली. पुण्यात आली. सगळं काही नव्याने तिला भेटलं. कंपनीने राहायला फ्लॅट ही दिला.
आणि आपल्या जुन्या आठवणी ,नाती सोडून ती या नव्या फ्लॅटमध्ये आली. इथे सगळं काही तिला नव्याने भेटत होत. क्षणात ती या जगात हरवून जाऊ लागली. तिकडे त्रिशा आणि समीर आपल्या छोट्याश्या जगात राहायला लागले. पण दोन्हीकडे एक रिकामी पोकळी होती. ती शीतलला जाणवत होती, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करत होती अगदी ठरवून.
“का कोणास ठाऊक !! पण राहून राहून मला त्रिशाची ओढ का लागावी हेच मला कधी कळतं नाही. मला आई व्हायचं नव्हतं तरीही मी सगळ्यांच्या आनंदासाठी आई झाले. पुढे इकडे येऊन नोकरी करण्याच्या निर्णयाला सर्वांनी मनात नसतानाही परवानगी दिली. अगदी कोणतीही अडवणूक न करता. मग सर्व काही आज मी जे ठरवलं तसच होत असताना, काहीतरी राहून गेले अस का वाटत आहे. तो त्रिशाचा स्पर्श , तीच निरागस हास्य , ते बोलके डोळे मला का सारखी तिची आठवण करून देतात. अस वाटत सतत सोबत असावी ती , तिच्या अल्लड प्रेमाला साद घालावी अस का वाटतंय मला ?? ” शीतल कित्येक वेळ एकटीच खोलीत बसून विचार करत बसली होती. तेवढ्यात तिच्या समोर ठेवलेला फोन वाजला. शीतलने फोन उचलला.
“हॅलो !!कोण बोलतंय ??”
“नमस्कार मॅडम, मी मेघा जोशी बोलतेय ! आपल्या ऑफिसमधून !!”
“हो बोला ! “
“मॅडम , आपल्याला जो राहायला फ्लॅट दिला आहे तिथे काही अडचण तर नाही ना ??”
“नाही काही अडचण नाही !! सर्व ठीक आहे !”
“ठीक आहे !! मग भेटुयात ऑफीस मध्ये !!”
“हो नक्की “
शीतलने फोन ठेवला आणि आपल्या कामात व्यस्त झाली. आणि तेवढ्यात पुन्हा फोन वाजला.
“हॅलो !!”
“हॅलो !! समीर बोलतोय !!”
“समीर !! बोल ना !! कसा आहेस ?? आई कश्या आहेत आणि त्रिशा कशी आहे !! रडतीये कारे ती ?? सांग ना ?? बोल ना !!”
“त्रिशा खूप खुश आहे शीतल आत्ताच झोपी गेली !! सारखं माझ्या आणि तुझ्या फोटोकडे पाहून नकळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती!! “
शीतल काहीच बोलली नाही. पण नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू जणू खूप काही बोलून गेला.
“आणि माहितेय !! आई तर सारखं मला म्हणत होती की शीतल कशी असेन ,कुठे असेन !! बघ एकदा फोन करून !!पण म्हटलं नको !! तुला उगाच त्रास होईल !!शीतल !! शीतल !! ऐकते आहेस ना??”
शीतलचे मन हे सर्व ऐकून भरून आले. ती समीरला म्हणाली,
“मी नंतर बोलते समीर तुझ्याशी !!”
शीतलने फोन ठेवताच तिच्या डोळ्यातील आलेले पाणी तिने लगेच पुसले. क्षणभर ती हरवून गेली पण पुढच्या क्षणात मनाचा निर्धार करून ती स्वतःला समजावू लागली. नात्यांच्या या जगात अशीच जर मी गुरफटून राहिले तर पुढे कधीच जाऊ शकणार नाही. समीर मला असाच भावनिक साद देईल आणि मला तिकडे बोलावून घेईन पण मी आता या सगळ्या गोष्टींना भुलनार नाही.
शीतल पुण्यात आता रमु लागली. सगळं काही आवरून ती रोज ऑफिसला जाऊ लागली. तिच्या आयुष्याला जणू एक गती मिळाली होती. ती ,तीच ऑफीस आणि त्या ऑफिसमधील तिचे सहकारी जणू एक नवं जग दिला मिळालं होत. हळूहळू ती या सगळ्या बदलाला स्वीकारू लागली होती. पण एक मन कुठेतरी तिला नकळत काहीतरी राहून जातंय याची आठवण करून देत होते. त्या ऑफिसच्या जगात ते ती नकळत शोधण्याचा प्रयत्न करत होती.
“हॅलो मॅडम !! “
“मेघा!! बोल काय म्हणतेय ??”
“मॅम !! उद्या आपल्या ऑफीस मध्ये छोटा कार्यक्रम आहे !!”
“कार्यक्रम ?? कसला ??”
” यामध्ये ना सगळ्या ऑफीस स्टाफने आपल्या फॅमिली सोबत यायचं !! मग इथे मस्त एन्जॉय केला जातो !! सगळ्यांच्या ओळखी होतात !! खूप धम्माल येते !!”
“नाइस !! ” शीतल तुटक बोलली.तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव क्षणाक्षणाला बदलत गेले.
” मॅम येणार ना नक्की ??”
शीतलने फक्त होकारार्थी मान हलवली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिला तेव्हा कळाल की जी मनातली रुखरुख आहे ती कशासाठी होती. आपण इथे आहोत पण आपली फॅमिली कुठे आहे ?? ती पोकळी तिला क्षणात जाणवून आली.
फ्लॅटवर संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला.
“समीर !! “
“शीतल !! आलीस ऑफिसमधून ?”
“हो आत्ताच आले. !!”
शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला.
” शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??”
शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली.
” नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता.”
“बरं बरं !! “
“समीर त्रिशा कुठे आहे रे ?? मला बोलायचं आहे तिच्याशी !!” शीतल अगदिक होऊन म्हणाली.
“आहे ना माझ्या जवळच !! आज नुसता गोंधळ घातलाय तिने घरात!! रांगत रांगत सगळं घर फिरायच ठरवलंय तिने !”
“रांगते ती ?? “
“हो म्हणजे काय !! सगळ्या घरात फिरते !! आईला तर पाच मिनिट सुद्धा सोडत नाही. सारखं आज्जी आजोबा पाहिजेत तिला. “
” मोबाईल स्पीकरवर कर ना !! ती आहे ना तिथे ??”
” हो आहे ना !! बोल तू ती ऐकतेय सगळं !!”
“त्रिशा , ये बाळा !! कोण बोलतेय बघ तरी !! मी तुझी आई बोलतेय !! “
त्रिशा शीतलचा आवाज ऐकताच फोनकडे कुतूहलाने पाहू लागली. तिला आपल्या आईचा आवाज ओळखायला एक क्षणही लागला नाही.
“मला मिस करतेस ना बाळा !! “
त्रिशा आता शीतलला बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या त्या बारीक ओठातून जणू शब्द बाहेरच येत नव्हते. ती सतत त्या फोनमध्ये पाहत होती आपल्या आईला शोधत होती.
“समीर !! ती ऐकतेय ना रे ??”
“हो शीतल !!! ती तुला ऐकतेय !! तिच्या मनाची तुला पाहण्याची ओढही मला जाणवते आहे !! तुला माहितेय शीतल तिला बोलता येत नाही अजून पण तीच मन मला लगेच कळतं. तुला ती खूप मिस करते पण कधी तुझ्याकडे येण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत नाही. खूप हुशार आहे त्रिशा आपली. ” समीर शीतलला सगळं मनमोकळे पणाने सांगू लागला.
शीतलला अश्रू अनावर झाले.तिने फोन कट केला.
शीतल कित्येक वेळ त्रिशाच्या आठवणीत हरवून गेली. तिच्या मनाला त्रिशाला पाहण्याची जणू ओढ लागली.