Share This:

भाग ४

शीतल आणि बाळाची वाट पाहत समीर बाहेरच फेऱ्या मारू लागला. त्याला कधी एकदा बाळाला पाहतो आहे असे झाले होते. आणि क्षणात त्याची ओढ संपली शीतल आणि बाळ दोघेही येताना त्याला दिसले. त्यांना पाहून तो धावत त्याच्या जवळ गेला. त्याच्या सोबत तो पुन्हा खोलीत आला. हलकेच बाळाला हातात घेत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलू लागले. बाळ आईकडे देत तो शीतलच्या जवळ आला. शीतल फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आणि मागून आई समीरला बोलू लागली.
“समीर जन्माला आला होता त्यावेळी असाच दिसत होता..!! तेच ते डोळे , ते नाक !! “
तेवढ्यात मागून बाबा लगेच म्हणाले.
“नाक मात्र आईवर गेलंय !! “
शीतल हळुच हसली ती काहीच बोलत नव्हतं पण मनातून खूप काही बोलत होती.

“मला कधीच आई व्हायचं नव्हतं पण तरीही मी आई झाले. नकळत म्हणा किंवा संसाराच्या गाडीत बसल्यावर पुढे येणारा हा थांबा म्हणा !! पण नकळत मी तिथे आलेच !! या नऊ महिन्यात माझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळाबद्दल मला अचानक ओढ का निर्माण झाली माझं मलाच कळलं नाही !! पण मला आता यात जास्त अडकूनही चालणार नाही !! मी माझं कर्तव्य पूर्ण केलं !!एक स्त्री म्हणून ,एक बायको म्हणून , एक सून म्हणून !! पण आता मला माझ्या मार्गावर पुढे जावच लागणार आहे !! मला थांबून नाही चालणार !! “

तेवढ्यात तिला आईने हाक मारली, शीतल भानावर येत आईकडे पाहू लागली. तिला आई बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. ती पुन्हा बाळाला आपल्या जवळ घेत आईला बोलू लागली.

“आई इथून कधी घरी जायचं ??”
“डॉक्टर पाठक निघा म्हणाले की निघायचं !!” आई मिश्किल हसत म्हणाली.
बाबा तेवढ्यात म्हणाले.
“शीतल काळजी घे आता स्वतःची आणि बाळाचीपण !!”

शीतल फक्त होकारार्थी मान हलवून बाबांकडे पाहत राहिली. तिला बाबांच्या बोलण्यातला रोख कळल्यावाचून राहिला नाही. बाळाचीपण काळजी घे !!यामध्ये त्यांना नक्की शीतलला काय म्हणायचे आहे हे समजताच तिच्या मनातील कित्येक संभ्रम दूर झाले.

बाळाच्या त्या येण्याने दोन तीन दिवस असेच निघून गेले. डॉक्टर पाठक यांनी परवानगी देताच शीतल घरी आली. तिच्या मनात त्या बाळाचे जणू एक घर बनू लागले. ज्या घरात ती आणि ते बाळ दोघेच होते. ते बाळ कधी हसत होते ते बाळ अचानक रडत होते . मध्येच ते शीतलकडे एकटक पाहत होते तर मध्येच ते तिला जणू बोलण्याचा प्रयत्न करत होते. असं म्हणतात ना की लहान बाळाला आई कोण ते सांगावं लागत नाही. म्हणुच की काय शीतलच्या मांडीवर ते निर्धास्त झोपी गेले होते.

बाळाच्या आयुष्यात येण्याने शीतलला दुसरे काही सुचतच नव्हते. जणू ती तिच्यातच हरवून गेली होती. पण मध्येच एक मन तिला पुन्हा आपल्या मार्गाची आठवण करून देत होते. या सगळ्यात दिवस अगदी धावत सुटले होते. बाळही आता मोठे झाले होते , चालू बोलू लागले होते, शीतल आणि समीरने तिचे नाव त्रिशा ठेवले होते, आणि एके दिवशी पोस्टाने एक पत्र घरी येऊन पडले. आईने ते पत्र घेतले. शीतलचे पत्र आहे हे कळल्यावर त्यांनी ते शीतलला आणून दिले. त्या पत्रातील मजकूर वाचताना शीतल आनंदून गेली.

“काय झालं काय शीतल !!” आईनी आनंदाने नाचणाऱ्या शीतलला विचारलं.
“आई !! खूप मोठं काम झालंय !! माझी पुण्याची नोकरी फिक्स झालिये !! त्याचंच हे पत्र आहे !! त्यांनी पत्र मिळताच एक आठवड्यात जॉईन व्हायला सांगितलंय!! खूप मोठी बातमी आहेही !! आज खऱ्या अर्थाने आनंद झालाय मला !! “
आई काहीच म्हणाली नाही. ती फक्त पाहत राहिली. संध्याकाळी बाबा , समीर आल्यानंतर त्यांनाही ही बातमी कळाली !! सर्वांनी तीच मनापासून कौतुक केलं. पण समीरच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. शीतल आपल्या खोलीत आल्यावर तिला त्याने मनात कित्येक गोष्टी ठरवून विषय काढला.

“शीतल काही विचारायचं होत !! “
“विचार ना !!”
“पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??”
“तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! “
“पण ती राहील तुझ्याशिवाय !!”
“तिला राहावं लागेल !!” शीतल नकळत बोलून गेली.
समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही.
“समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!”
“पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! “
“समीर प्लिज !! नको ना उगाच इमोशनल करुस !! ज्यांना आई वडील नाहीत ती मुल जगत नाहीत का ??? आता उगाच मला यात अडकवून नकोस ठेवू !!”

समीर शांत झाला. त्याला पुढे काय बोलावं काहीच कळलं नाही. शीतल आपल्या कामात गुंग झाली. इकडे त्रिशा शांत झोपी गेली कारण तिला माहित होत आपल्या सोबत आपली आई आहे ते.

“जीवनाच्या प्रवाहात प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रयत्न करत असतो पोहण्याचा. कोणी सहज तो प्रवाह ओलांडून जातो तर काही मध्येच बुडून जातात, पण हे झाले सामान्य लोक पण जे लोक त्या प्रवाहात नकळत आपल्या सर्व बंधनाना तोडून, आपल्या मर्यादा विसरून फक्त तो प्रवाह ओलांडायचा आहे, जिद्द नव्हे तर तो जगण्याचा हेतू बनतो त्यांच्याबद्दल काय करावं खरंच काही कळत नाही. बरं असे लोक इतिहासही घडवतात पण नात्याच्या पाऊलखुणा कुठेतरी मागे राहून जातात हे त्यांना कळतच नाही. याला अपवाद असेल यात काही दुमत नाही. पण याच अट्टाहासाचा त्रास आपल्या आजूबाजूच्या लोकांना नकळतपणे होत नाहीना याचा विचार खूप कमी लोक करतात.” समीर जणू आपल्या मनाशी आपल्या नात्यांशी द्वंद्व करत होता.

“समीर !! तू मला miss करशील ना ??” शीतल समीरला विचारत होती. तिला पुण्याला जायची वेळ जवळच आली होती. ती आपल्या आवरा आवरीत बिझी होऊन गेली होती.
“नाही !!” समीरचा आवाज थोडा कठोर झाला होता. शीतलने असे एकटे पुण्याला जाणे त्याला पटले नव्हते हेच जणू त्यातून जाणवतं होते.
“समीर !! हा असा चेहरा करून मला ड्रॉप करायला येणार आहेस का ??” जवळचं बसलेल्या त्रिशाकडे पाहत शीतल म्हणाली.
समीर काहीच बोलला नाही.
“चल !! संध्याकाळी पाच वाजता फ्लाईट आहे माझी !! आता जास्त विचार करू नकोस !! सगळं नीट होईल !! थोडे दिवस थांब मग आपण सगळेच तिकडे जाऊ !! तूपण पुण्याला ट्रान्स्फर करून घे !! तिकडे ऑफीस आहेच ना तुझं !! “
“बघुयात !! ” समीर त्रिशाला जवळ घेत म्हणाला.

शीतल जायला निघाली. समीर तिला एअरपोर्टवर सोडायला चालला. आज मात्र त्रिशा काही केल्या शीतलला सोडायला तयार होत नव्हती. अडखळत अडखळत जणू ती शीतलला बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्रिशाला जणू आपण आज आईपासून लांब जाणार हे कळून चुकलं होत.

समीर आणि त्रिशाने शीतलला एअरपोर्टवर सोडले. दोघेही तिला जाताना पाहात राहिले. त्रिशा शांत होऊन समीरच्या कडेवर बसून राहिली. शीतल पुण्याला निघाली. तिला मनसोक्त जगण्यासाठी, पंख पसरून आभाळात झेप घेण्यासाठी.

क्रमशः