आई || कथा भाग २ || Marathi Katha ||

भाग २

दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली.
“काय हे वागणं समीर ??”
समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं.
“दारू पिऊन आलायस समीर ??”
“हो !! पिऊन आलोय मी दारू !!” समीर दरवाजातून आत येत म्हणाला.
“बस एवढंच राहील होत आता !! “
“मग काय करू मी आता ?? तू सांग मी काय करू ??” समीर मोठ्या आवाजात बोलला.
समीर चा आवाज ऐकून आई बाबा आपल्या खोलीतून बाहेर आले. बाबांना काय घडतंय हे कळायला वेळ लागला नाही. ते लगेच समीरकडे जात म्हणाले,
“समीर दारू पिऊन आलायस !! लाज कशी वाटत नाही तुला !! “
“कसली लाज बाबा ?? लाज तर या तुमच्या सुनेला वाटायला हवी ना ?? “
“काय बोलतोयस समीर ?? शुद्धीवर आहेस का तू ?” मध्येच आई समीरला म्हणाली.
“कशाला राहू शुद्धीवर मी ?? सांग ना ?? मी बाप होणार आहे हे कळूनही मला त्याचा आनंद न होता दुःख होत असेल तर काय करू मी ??”
“काय ?? म्हणजे शीतल ?”
“हो आई मला दिवस गेलेत !!”
” पण मला मुल नकोय !! मला अबोर्शन करायचं आहे !! हे पण सांग !!”
“समीर !!” शीतल समीरकडे पाहत म्हणाली.
“सूनबाई काय ऐकतोय मी !! ” मध्येच बाबा बोलले.
“हो बाबा !! मला मुल नकोय !! “
“पण का ??”
“कारण मला यात पडायचं नाहीये !! चूल आणि मूल एवढच करायचं नाहीये मला!! मला मोठं व्हायचं !! काहीतरी करून दाखवायचं आहे !!”
“हो पण तुझं आईपण यामध्ये येथच कुठे ??” बाबा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागले.
“पण मी यामध्ये गुरफटून जाईल !!”
“आम्ही आहोतच ना शीतल !! तुझ्या बाळाची सगळी काळजी आम्ही घेऊ !! आमच्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्याला आम्ही सांभाळू !! मग तर झालं सगळं !!”
शीतल शांत झाली. समीर बाजूला खुर्चीवर बसून होता त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती.
“मी विचार करेन आई बाबा !!” शीतल एवढं बोलून आपल्या खोलीत समीरला सावरत घेवून गेली.

रात्रभर तिच्या डोक्यात फक्त तोच विषय होता. मुलाला जन्म देणं एवढंच तर मला करायचं आहे. नंतर त्याची काळजी घ्यायला आई बाबा , समीर आहेतच .पण मला मात्र ते जवळही नको. मी आणि माझं करिअर यामध्ये त्याची लुडबुड मी काही खपवून घेणार नाही. उद्या काही वाटलच तर समीरकडे सोपवून मी मोकळी होईल. मग समीर जाणो आणि ते आई बाबा. आणि जास्तच बोलले मला तर सरळ म्हणेन मी मुलाचा हट्ट तुमचा होता त्यामुळे त्याला सांभाळायची जबाबदारी तुमची. ठरलं तर मग , आणि असंही आता abortion हा विषय डोक्यातून काढून टाकावा लागेल कारण उद्या सकाळी माझ्या आईला माझ्या pregnancy बद्दल सासूबाई सांगतीलच. आणि असलं काही बोलले तर आई आणि बाबा एक गोष्ट माझी ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे आता या सर्वांचं ऐकेन मी आणि ऐकदा का मुल झालं की मग यांना माझं ऐकावं लागेल.

पाहता पाहता सकाळ झाली. समीर आणि शीतलच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात वाजवत होत. त्या आवाजाने शीतल जागी झाली. दरवाजा उघडताच समोर सासूबाईंना पाहून चकित झाली.
“आई !! तुम्ही ??”
“घे !! तुझ्यासाठी नाष्टा घेऊन आली आहे मी !! आता तू एकटी नाहियेस !! त्या बाळाची काळजी सुद्धा घ्यावी लागेल ना आता !! आता फक्त तू नाहीस !! तुम्ही आहात !! कळलं का ??”
शीतल काहीच न बोलता नाष्टा करू लागली. तेवढ्यात मुख्य दरवाजाची बेल वाजली.
” एवढ्या सकाळी कोण आल आता ??” शीतल सासुबाईंकडे पाहत म्हणाली.
“थांब बघते मी !!”
दरवाजा उघडताच शीतलला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचे आई बाबा समोर दिसताच ती पटकन जागेवरून उठली.
“आई !! ” शीतलने आईला पाहून मिठीच मारली.
“तुम्ही दोघे एवढ्या सकाळी इथे ??”
“अग तुझ्या सासूबाईंनी सकाळीच फोन करून आम्हाला आनंदाची बातमी सांगितली. मग म्हटलं कशाला फोन करा , तासाभराचा रस्ता आहे भेटायला यावं !! “
शीतल सासूबाईकडे पाहू लागली.
“मीच बोलावलं आहे त्यांना !!”
शीतल त्या तिघांकडे पाहत राहिली. लांबुनच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत मनातच विचार करत होती.
“काय एवढं आनंदून जायचं काय कळतं नाहीये मला !! या समीरने सगळा घोळ घालून ठेवलाय नाहीतर आज abortion करून मोकळी झाली असते मी!!! पण आता हा विचार जरी केला तर हे सगळे मला काय रागावतील !! विचारच करवत नाही !!! शीतल बाई व्हा तयार पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी !! “

“शीतल !! शीतल !! “
शीतल भानावर येत समोर पाहू लागली. समोर सासूबाई तिला हाक मारत होती.
“हो आई !! जा समीरला बाहेर ये म्हणावं !! “
शीतल खोलीत गेली. समीर अजूनही झोपलेला असतो. त्याला जोरजोरात आवाज देत ती उठवू लागली.

“समीर !! ये समीर !! उठ !! उठ ना!! उठ बघ तुझ्या प्रताप बाहेर जाऊन !! “
समीर हळू हळू जागा झाला. डोळे चोळत तो विचारू लागला.
“काय झालं आता ??”
“काय झालं !!! सांगते ना !! तू जो काल दारू पिऊन गोंधळ घातलाय ना !! त्याचे परिणाम मला आता पुढचे किती दिवस सहन करावे लागतील माहितेय तुला??”
“काय म्हणतेय तू !! कसला गोंधळ ??”
“काल दारू पिऊन का आलास ते सांग मला पहिले ??”
“का म्हणजे माझी मर्जी !!”
“हो ना !! मग माझ्या मर्जी विरूध्द आई बाबांना माझ्या pregnancy बद्दल कशाला बोललास तू ??”
“मला काही आठवत नाही !! “
“जा बाहेर !! बघ बाहेर पार्टी करतायत माझ्या pregnancy ची !! त्यात माझे आई बाबा सुद्धा सामील झाले!! जा !!”
“क्या बात है !! आता तर मला त्या पार्टीत सहभागी झालच पाहिजे !! क्या बात है !!”
समीर मिश्किल हास्य हरकत शीतलकडे पाहत खोलीच्या बाहेर आला. पाहतो तर त्याचे आई बाबा सासू सासरे सगळे मजेत होते. शीतलला मुल होणार हे ऐकून शीतल सोडून बाकी सारे खुश होते. पाहता पाहता तोही त्यांच्यात सामील झाला.

शीतल लांबून हे सारं फक्त पाहत होती.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *