Share This:

भाग १०

कित्येक वेळ शीतल आणि समीर बोलत बसले. त्रिशाने शीतलला ओळखलं नाही याचं दुःख वाटत होत. ती पुन्हा पुन्हा त्रिशाकडे जाण्याचा हट्ट करत होती. पण समीर तिला थांबवत होता. तेवढ्यात आई त्रिशाला घेऊन आली. समोर तिला पाहून शीतल तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागली
“मी तुझी आई आहे बाळा !! येना माझ्याकडे !! ” शीतल आपले डोळे पुसत म्हणाली.
“जा बाळा !! आपल्या आईकडे जा !! ” आई त्रिशाकडे पाहून म्हणाली.

त्रिशाने क्षणभर शीतलकडे पाहिलं ती अलगद तिच्याकडे गेली. शीतलला याचा आनंद झाला. पुन्हा कित्येक वेळ ती तिच्यासोबत खेळत राहिली. मध्येच ती तिला आपल्या मिठीत घेत होती. समीर आणि आई लांबुनच कित्येक वेळ हे पाहत होते. तेवढ्यात समीरच्या बाजूला ठेवलेला फोन वाजला. समीर फोन उचलताच समोरून कोणी स्त्री बोलत होती,

“हॅलो !! दीक्षितांचा नंबर आहे ना हा ??”
” हो !! आपण ??”
“नमस्कार , मी मेघा जोशी बोलते आहे ! शीतल मॅमच्या ऑफिस मधून !!”
“ओके !! एक मिनिट हा !! त्यांना देतो मी फोन !!”
समीरने फोन बाजूला ठेवला. समोर त्रिशा सोबत खेळत असलेल्या शीतलला त्याने हाक मारली. तिच्या ऑफिसमधून फोन आल्याचं तिला सांगितलं. शीतलने फोन घेतला.

“हॅलो !! हा मेघा बोल ना !!”
“मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??”
“अग हो हो !! मेघा ॲक्च्युली मी थोड्या वेळाने ऑफीसमध्ये फोन करणारच होते की आज मी येणारच नाही म्हणून !! माझ्या मुलीची अचानक तब्येत बिघडली म्हणून रात्रितूनच मला इकडे यावं लागलं !!”
“ओके !! मॅम मग काल रात्री तरी मला सांगायचं !! एक फोन केला असता तरी चाललं असतं !!”
“नाही ग !! खूप उशीर झाला होता म्हणून नाही केला मी फोन !! “
“बरं ठीक आहे !! तुम्ही घ्या काळजी !! तुमचा निरोप मी बॉसना कळवते !! त्याही सकाळपासून मला विचारतं होत्या अचानक कुठे गेल्या तुम्ही म्हणून !! “
” नक्की सांग त्यांना !! आणि माझ्याकडून त्यांना सॉरी पण सांग !! मी अशी न काही कळवता आले त्यांना वेगळंच काही वाटेनं पुन्हा !! “
“डोन्ट वरी मॅम !! त्या सहसा फॅमिली प्रोब्लेम असेल तर काही म्हणत नाहीत !! मी सांगते त्यांना !!”
“थॅन्क्स मेघा !! “

शीतल आणि मेघाच बोलणं झाल्यावर शीतल थोडा वेळ आपल्याच विचारात गुंग होते. हे पाहताच समीर तिच्या जवळ येतो,
“काय झालं शीतल ?? काही प्रोब्लेम तर नाही ना ??”
” नाही समीर !! प्रोब्लेम अस म्हणता येणार नाही !! पण उद्या परवा मला पुन्हा ऑफिसला जाव लागेल !! म्हणजे पुन्हा त्रिशापासून दूर जावं लागेल !! “
“तेव्हाच तेव्हा पाहुयात ना !! आतातरी मस्त वेळ घालव तिच्यासोबत !! ती बघ तुझ्याकडे कशी पाहते आहे ती !!”
समीर मिश्किल हसत म्हणाला. शीतलही गालातल्या गालात हसली. त्रिशाकडे धावत गेली. कित्येक वेळ तिच्यासोबत खेळत बसली. समीर एकटक त्या दोघींकडे पाहत राहिला,

“शीतल आणि त्रिशा या दोघी जणू माझ्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत, आई बाबां नंतर माझ्या आयुष्यात माझं अस म्हणावं जिथं हक्कान मी माझं सर्वस्व अर्पण कराव अस एक अढळ स्थान म्हणजे या दोघी. ज्यांच्यासाठी घाम गाळावा, अहोरात्र कष्ट करावे, जगातलं हवं ते सुख यांच्या पायी आणून ठेवावं असच मला वाटतं. शीतलने जेव्हा पहिल्यांदा मला ती आई होणार आहे हे सांगितलं !! तेव्हा जेव्हढा आनंद झाला होता त्याहीपेक्षा जास्त आनंद मला आज होतोय त्या दोघींना हसत खेळत पाहताना. एका सुखी संसारात अजून ते दुसर काय हवं होत. पहिल्यांदा जेव्हा शीतल मुल नको अस म्हणाली होती तेव्हा पुढे काय?? हा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता. पण आज त्या सर्व प्रश्नांची जणू उत्तरेच मला मिळाली आहेत. ” समीर शीतल आणि त्रिशाकडे पाहून हसला. त्याच्या मनात विचारांचं तेव्हा द्वंद्व सुरू होत.

समीर ,शीतल ,आई आणि बाबा चौघेही रात्री एकत्र जेवायला बसतात. तेव्हा शीतल आपल्या ऑफिसमधील कित्येक गप्पा गोष्टी सांगते. सगळं घर आनंदाने बहरून जात. त्यात त्रिशाचा किलबिलाट वेगळच वातावरण निर्माण करत होते.
तेवढ्यात बाबा शीतलला बोलतात,
“शीतल ,पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू ?? तुलाही ऑफिस आहेच ना उद्या !! मग कधी निघणार आहेस ??”
“बाबा !! मला वाटतं मी नाही जात ऑफिसला !! “
“काय ??” समीर अचानक बोलतो.
“हो !! “
“पण का ??” मध्येच आई बोलते.
“कारण मला नाही राहता येणारं तुमच्या सगळ्यांपासून लांब !!”
“हो पण !! ऑफिस सोडण हा पर्याय नाही शीतल !!” बाबा शीतलकडे पाहत बोलतात.
शीतल क्षणभर शांत बसते. तिच्या मनातले बाबा ओळखतात आणि पुन्हा बोलतात.
“मला सांग शीतल !! तुला तुझं करिअर पुढे करायचं आहे ना ??”
“हो बाबा !! “
“पण घर, संसार, आपली माणसं सोडवत नाहीत तुला !! बरोबर ना ??”
शीतल होकारार्थी मान हलवते.
“मग आपण त्यावर पर्याय शोधुयात !! असंही तो मी शोधला आहेच !! यापूर्वीही मी हे तुझ्या सासूबाईंशी बोललो आहे त्यांचा होकारही आहे !! “
“कोणता उपाय बाबा ??” समीर मध्येच बोलतो.
“समीरची आई , त्रिशा आणि शीतल यापुढे पुण्यात राहतील. मी आणि समीर इथेच राहू, समीरलाही अगदीच एकटं वाटू नये म्हणून मी त्याच्या सोबत असेल. सुट्ट्यात कधी ते इकडे येतील ,कधी आम्ही तिकडे येऊ !! बोला आहे मंजूर ??”
समीर ,शीतल क्षणभर एकमेकांकडे पाहू लागतात. आणि समीर बोलतो
“हो बाबा !! आहे मंजूर !! “
“शीतल ??”
“पण बाबा , माझ्यामुळे तुम्ही आणि आई वेगळे का रहाल ??”
“जसं तू आणि समीर त्रिशासाठी राहणार तसच !!”
“हे बघ शीतल , समीर लहान होता तेव्हा माझीही ट्रान्स्फर वेगळवेगळ्या गावी व्हायची !! इथे माझे आई बाबा आणि ही तिघेच राहायचे !! समीरच्या शिक्षणासाठी प्रत्येक वेळी शहर बदलून पुन्हा नव्याने संसार थाटण्याचा पर्याय योग्य नव्हता. मग मीच महिन्यातून एकदा दोनदा ये जा करायचो !! पण त्यामुळे माझ्यात आणि हीच्यात कधी दुरावा नाही आला. उलट अजून प्रेम घट्ट होत गेलं !! “
“बाबा खरंच तुमचं हे सगळं ऐकून मला आता मी किती चूक केली हे कळून येत आहे !!”
“चूक नाही म्हणता येणार शीतल !! पण बोलण्याने मार्ग भेटतात !! तू कधी माझ्याशी याविषयी चर्चाच केली नाहीस !! आणि तुमच्या दोघांच्या मध्ये बोलणं मला योग्य वाटलं नाही !!”
“बाबा पण तुम्ही हक्काने सांगायचं होत आम्हाला !!आम्ही आपल्या शब्दाच्या बाहेर आहोत का ?” समीर मध्येच बोलला.
” हो बाबा !! तुम्ही म्हणाल तसेच होईल !! ” शीतल म्हणाली.
” मग आता मी म्हणतो तसेच करा !! यामध्ये मला काय वाटतं !! तुझ्या आईला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये !! तुमच्या दोघांच करिअर महत्त्वाचं आहे !! आणि प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी आईने आपला जॉब , करिअर का सोडावं ?? मीही याच्या विरोधात आहे !! स्त्रीलाही तितकाच अधिकार आहे आपलं आयुष्य घडवण्याचा !! “
शीतलला बाबांचं बोलणं ऐकून काय बोलावं हेच कळत नव्हतं. लग्न, मुल ,संसार यामध्ये गुरफटून गेल की आयुष्यात स्त्रीने काहीतरी करावं हा विचारच सहसा ती विसरून जाते. पण स्वतः बाबा तिला भरारी घेण्यासाठी प्रेरित करत होते.
“उद्या सर्व आवरा आवर करा आणि पर्वा पुण्याला निघा !! “
“ठीक आहे बाबा !!”

बाबांच्या या निर्णयाने शीतल खूप खुश झाली. तिने मेघाला लगेच फोन करून परवा येत असल्याचे कळवले, समीरही बाबांच्या विचारांनी प्रभावित झाला. जेवण केल्या नंतर शीतल आणि समीर दोघेही खोलीत आले. कित्येक वेळ एकमेकांच्या मिठीत राहिले.

समीर आणि शीतल एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले

क्रमशः

आई || कथा भाग ९ || आई || कथा भाग ११ ||