“अनोळखी वाटेवर
ती मला पुन्हा भेटावी
सोबत माझी देण्यास तेव्हा
ती स्वतःहून यावी

थांबावे थोडे क्षणभर तिथे
ती वाट वाकडी पहावी
माझ्यासवे चाललेली ती
आठवणींची पाऊलखुण दाखवावी

मनास सगळं कळुन जाता
ती नजर का चुकवावी
वाचलेच चुकुन नजरेचे भाव तर
तिची ओढ मज का दिसावी

सुटलेल्या क्षणात पहाता
ती वाट ही हरवुन जावी
चालता चालता दुर जावे
तेव्हा परतीची तमा नसावी

वेड्या मनात आता
आठवणीची सर यावी
चिंब जावी भिजुन वाट ती
प्रेमाची ती पालवी फुटावी

बहरलेली प्राजक्त ही आता
एकमेकांस मनसोक्त बोलावी
आणि अनोळखी वाटेवर तेव्हा
ती मला पुन्हा भेटावी!!”


-योगेश खजानदार

Scroll Up